15
अजर्‍याह यहूदाचा राजा
इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्‍याह राज्य करू लागला. तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती. त्याने त्याचा पिता अमस्याहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
याहवेहने राजाला पीडले आणि तो मरेपर्यंत त्याला कुष्ठरोग होता. तो वेगळ्या घरात*किंवा जिथून तो आपली जबाबदाऱ्या पार पाडत होता राहिला. राजाचा पुत्र योथामाकडे राजवाड्याचा कारभार होता आणि तो देशाच्या जनतेवर शासन करीत असे.
अजर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय? अजर्‍याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
जखर्‍याह इस्राएलाचा राजा
यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्‍याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले. आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
10 याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्‍याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. 11 जखर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय? 12 याहवेहने येहूला दिलेले वचन पूर्ण झाले: “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”
शल्लूम इस्राएलचा राजा
13 यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या एकोणचाळिसाव्या वर्षी याबेशाचा पुत्र शल्लूम इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले. 14 नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
15 शल्लूम राजाच्या इतर घटना आणि त्याने केलेला कट यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात केलेली नाही काय?
16 त्यावेळी, तिरजाहपासून निघालेल्या मनाहेमाने तिफसाह आणि शहरातील आणि सीमेच्या क्षेत्रातील सर्वांवर हल्ला केला, कारण त्यांनी आपली वेस उघडण्यास नकार दिला. त्याने त्यांना मार दिला आणि सर्व गरोदर महिलांना चिरून टाकले.
मनाहेम इस्राएलचा राजा
17 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी गादीचा पुत्र मनाहेम हा इस्राएलाचा राजा झाला, त्याने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले. 18 याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली, त्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.
19 तेव्हा अश्शूरचा राजा पूलदुसरे नाव तिग्लथ-पिलेसर ने देशावर हल्ला केला आणि मनाहेमने त्याचा पाठिंबा मिळावा आणि आपले राज्य स्थिर व्हावे यासाठी त्याला चांदीचे हजार तालांतअंदाजे 34 मेट्रिक टन दिले. 20 मनाहेमाने हा पैसा इस्राएलमधून वसूल केला. अश्शूरच्या राजाला द्यायला प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने पन्नास चांदीचे शेकेल§अंदाजे 575 ग्रॅ. द्यायचे होते. मग अश्शूरचा राजा मागे फिरला आणि देशात राहिला नाही.
21 मनाहेमाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले हे इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात नमूद करून ठेवलेले नाही काय? 22 मनाहेम आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र पेकाहियाह हा राज्य करू लागला.
इस्राएली राजा पेकाहियाह
23 यहूदीयाचा राजा अजर्‍याहाच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी मनाहेमचा पुत्र पेकाहियाह शोमरोनात इस्राएलवर राज्य करू लागला, त्याने दोन वर्षे राज्य केले. 24 पेकाहियाहने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली होती, तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही. 25 त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.
26 पेकाहियाह राजाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात लिहून ठेवलेले नाही काय?
पेकह इस्राएलाचा राजा
27 यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या बावन्नाव्या वर्षी रमाल्याहचा पुत्र पेकह शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने वीस वर्ष राज्य केले. 28 त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
29 इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर*तिग्लथ-पिलेसर याला तिग्लथ-पिल्नेसर म्हणूनही ओळखले जाते याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले. 30 नंतर एलाहचा पुत्र होशेने रमाल्याहचा पुत्र पेकहाच्या विरुद्ध कट रचला. त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले व त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. ही घटना उज्जीयाहचा पुत्र योथामाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी घडली.
31 पेकहच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले ते इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?
यहूदीयाचा राजा योथाम
32 इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह याच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा उज्जीयाह याचा पुत्र योथाम राज्य करू लागला. 33 तो पंचवीस वर्षांचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती. 34 आपल्या पिता उज्जीयाह प्रमाणे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले, 35 तथापि उच्च स्थाने काढली गेली नव्हती; लोकांनी त्यांची अर्पणे व धूप जाळणे सुरूच ठेवले. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला.
36 योथामाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय? 37 (त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.) 38 योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ, त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र आहाज राजा झाला.

*15:5 किंवा जिथून तो आपली जबाबदाऱ्या पार पाडत होता

15:19 दुसरे नाव तिग्लथ-पिलेसर

15:19 अंदाजे 34 मेट्रिक टन

§15:20 अंदाजे 575 ग्रॅ.

*15:29 तिग्लथ-पिलेसर याला तिग्लथ-पिल्नेसर म्हणूनही ओळखले जाते