14
अबशालोम यरुशलेमकडे परत येतो
जेरुइयाहचा पुत्र योआब याला माहीत होते की, अबशालोमला भेटावे असे राजाला मनापासून वाटते. तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर. मग राजाकडे जा आणि असे बोल.” आणि काय बोलावे ते योआबाने तिला सांगितले.
जेव्हा तकोवा येथून आलेली स्त्री राजाकडे गेली, राजाला सन्मान देण्यासाठी तिने तोंड भूमीकडे लवून दंडवत केले, आणि म्हणाली, “महाराज, माझी मदत करा!”
राजाने तिला विचारले, “तुला काय त्रास आहे?”
ती म्हणाली, “मी विधवा आहे; माझा पती मरण पावला आहे. आपल्या सेविकेला दोन मुले होती. शेतामध्ये ती दोघे भांडू लागली आणि ते भांडण मिटविण्यास तिथे कोणी नव्हते. एकाने दुसर्‍यावर वार केला आणि त्याला जिवे मारले. आता संपूर्ण कुटुंब आपल्या सेविकेविरुद्ध उठले आहे; ते म्हणतात, ‘ज्याने त्याच्या भावाला मारले त्याला आमच्या हाती सोपवून दे, म्हणजे त्याच्या भावाच्या जिवाबद्दल ज्याला त्याने मारून टाकले त्याचा आम्ही नाश करू; म्हणजे जो वारस राहिला आहे त्याच्यापासूनसुद्धा आमची सुटका होईल.’ याप्रकारे जो माझा एकमात्र निखारा राहिलेला आहे, तो सुद्धा ते विझवतील, व या भूतलावर माझ्या पतीचे ना नाव ना वारस राहील.”
राजा त्या स्त्रीला म्हणाला, “घरी जा, आणि मी तुझ्याबाजूने आदेश देईन.”
परंतु तकोवाची ती स्त्री राजाला म्हणाली, “माझ्या धनीराजाने मला आणि माझ्या कुटुंबाला क्षमा करावी, आणि राजा आणि त्याचे सिंहासन निर्दोष असो.”
10 राजाने उत्तर दिले, “तुला जर कोणी काही म्हटले, तर त्यांना माझ्याकडे घेऊन ये, आणि ते पुन्हा तुला त्रास देणार नाहीत.”
11 ती म्हणाली, “तर मग राजाने याहवेह आपल्या परमेश्वराला विनंती करावी, म्हणजे रक्ताचा सूड घेणार्‍याला हानी करण्यापासून प्रतिबंध करावा, म्हणजे माझ्या मुलाचा नाश होणार नाही.”
तो म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, तुझ्या मुलाच्या डोक्यावरील एक केसही जमिनीवर पडणार नाही.”
12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.”
राजाने म्हटले, “बोल,”
13 ती स्त्री म्हणाली, “तर मग परमेश्वराच्या लोकांविरुद्ध आपण अशी योजना का केली? जेव्हा राजा असे म्हणतो, कारण राजाने स्वतः घालवून दिलेल्या आपल्याच मुलाला परत आणले नाही, तेव्हा तो स्वतःलाच दोषी ठरवीत नाही का? 14 जसे जमिनीवर सांडलेले पाणी पुन्हा गोळा करता येत नाही, तसेच आपणही मेले पाहिजे. परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही; तर घालवून दिलेला व्यक्ती कायमचा त्यांच्यापासून घालवून दिला जाऊ नये अशी योजना परमेश्वर करतात.
15 “आणि आता मी माझ्या धनीराजाला हे सांगण्यासाठी आले आहे, कारण लोकांनी मला भयभीत केले आहे. आपल्या सेविकेने विचार केला, ‘मी राजाशी बोलेन; कदाचित ते आपल्या सेविकेची विनंती मान्य करतील. 16 कदाचित, राजा त्यांच्या सेविकेला त्या माणसाच्या हातून सोडविण्यास मान्य होतील, जो मला आणि माझ्या मुलाला परमेश्वराच्या वतनापासून वंचित ठेवेल.’
17 “आणि आता आपली सेविका म्हणते की, ‘माझ्या राजाचा, स्वामीचा शब्द माझे वतन सुरक्षित ठेवो, कारण माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूतासारखी चांगले आणि वाईट याची ओळख आहे. याहवेह आपला परमेश्वर आपल्याबरोबर असो.’ ”
18 तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तुला मी जे काही विचारणार आहे, त्याचे उत्तर माझ्यापासून लपवू नकोस.”
ती स्त्री म्हणाली, “माझ्या धनीराजाने बोलावे.”
19 राजाने विचारले, “या सर्व गोष्टींमध्ये योआबाचा हात नाही काय?”
त्या स्त्रीने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाच्या जीविताची शपथ, माझे धनीराजा जे सांगतात त्यापासून कोणीही उजवी किंवा डावीकडे वळू शकत नाही. होय, तो आपला सेवक योआब होता ज्याने मला हे करण्यास सुचविले व आपल्या सेविकेच्या मुखात शब्द घातले. 20 आपला सेवक योआब याने सध्याची परिस्थिती बदलावी म्हणून असे केले. माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूताप्रमाणे ज्ञान आहे; देशात जे काही घडते ते सर्व आपणास ठाऊक आहे.”
21 तेव्हा राजाने योआबाला म्हटले, “ठीक आहे, मी त्याप्रमाणे करेन, जा आणि त्या तरुण अबशालोमास परत घेऊन ये.”
22 योआबाने राजाला सन्मान व आशीर्वाद देण्यासाठी भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. योआब म्हणाला, “आज आपल्या सेवकास समजले की त्याच्या धनीराजाच्या नजरेत तो कृपा पावला आहे, कारण राजाने आपल्या सेवकाची विनंती मान्य केली आहे.”
23 मग योआबाने गशूरला जाऊन अबशालोमला यरुशलेमास परत आणले. 24 तेव्हा राजाने म्हटले, “त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे, त्याने माझे मुख पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहिला व त्याने राजाचे मुख पाहिले नाही.
25 सर्व इस्राएलात सुंदरतेविषयी प्रशंसनीय असा अबशालोमसारखा कोणी नव्हता. डोक्याच्या माथ्यापासून तळपायापर्यंत त्याच्या ठायी काही दोष नव्हता. 26 वर्षातून एकदा तो आपल्या डोक्यावरील केस कापत असे कारण ते त्याच्यासाठी फार भारी होत असत. जेव्हा तो केस कापीत असे; त्याचे वजन केले जात असे, आणि राजकीय मापानुसार त्याचे वजन दोनशे शेकेल*अंदाजे 2.3 कि.ग्रॅ. इतके भरत असे.
27 अबशालोमास तीन पुत्र व एक कन्या झाली. त्याच्या कन्येचे नाव तामार होते. ती फार सुंदर होती.
28 अबशालोम यरुशलेमात राजाचे मुख न पाहता दोन वर्षे राहिला. 29 तेव्हा योआबाला राजाकडे पाठवावे म्हणून अबशालोमाने योआबाला बोलाविणे पाठवले, परंतु योआबाने त्याच्याकडे येण्यास नकार दिला. त्याने दुसर्‍यांदा बोलाविणे पाठवले, परंतु पुन्हा योआबाने येण्यास नकार दिला. 30 तेव्हा अबशालोम आपल्या सेवकांस म्हणाला, “पाहा, योआबाचे शेत माझ्या शेताला लागून आहे, त्यात त्याने जव लावले आहे. जा आणि त्याला आग लावा.” त्याप्रमाणे अबशालोमच्या सेवकांनी शेताला आग लावली.
31 नंतर योआब अबशालोमच्या घरी गेला, आणि त्याला म्हणाला, “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला का आग लावली?”
32 अबशालोम योआबाला म्हणाला, “पाहा, मी तुला बोलाविणे पाठवित म्हटले, ‘येथे ये म्हणजे मी तुला राजाकडे हे विचारण्यास पाठवेन, “गशूरहून मी का आलो? मी अजूनही तिथेच असतो तर ते माझ्यासाठी बरे झाले असते!” ’ तर आता मला राजाला भेटावयाचे आहे, जर माझ्याठायी काही दोष असेल, तर त्यांनी मला जिवे मारावे.”
33 तेव्हा योआबाने राजाकडे जाऊन हे सर्व सांगितले. मग राजाने अबशालोमला बोलावून घेतले आणि तो आला व राजापुढे भूमीकडे लवून दंडवत घातले आणि राजाने अबशालोमचे चुंबन घेतले.

*14:26 अंदाजे 2.3 कि.ग्रॅ.