4
 1 परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की:   2 तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.   3 कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील.   4 ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.   5 परंतु या सर्व विषयांमध्ये सावध राहा; दुःख सहन कर; ईश्वरीय शुभवार्तेच्या प्रचारकाचे काम कर आणि आपली सेवा पूर्ण कर.   
 6 कारण मी आता पेयार्पणासारखा ओतला जात असून, माझी जाण्याची वेळ आली आहे.   7 मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे.   8 पुढे आता माझ्यासाठी जो नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे, प्रभू, आपले नीतिमान न्यायाधीश, त्या दिवशी मला देतील, आणि केवळ मलाच नाही, तर जे त्यांच्या परत येण्याची आवडीने वाट पाहत आहेत, त्या सर्वांना मिळेल.   
पौलाची परिस्थिती 
  9 शक्य तितक्या लवकर माझ्याकडे येण्याचा प्रयत्न कर,   10 कारण देमासाने जगावर प्रीती केल्याने, मला सोडून तो थेस्सलनीकास गेला आहे. क्रिसेन्स गलातीयास व तीत दालमतियास गेले आहेत.   11 केवळ लूकच माझ्याबरोबर आहे. येताना मार्काला घेऊन ये, कारण माझ्या सेवेत तो उपयोगी आहे.   12 मीच तुखिकास इफिसास पाठविले   13 माझा अंगरखा जो त्रोवासात बंधू कार्पूसजवळ राहिला आहे, तो तू येतांना घेऊन ये, सोबत माझी पुस्तके व विशेषकरून चर्मपत्रेही आण.   
 14 आलेक्सांद्र तांबटाने माझे फार वाईट केले. प्रभू त्याला त्याच्या कामाचे योग्य फळ देतील,   15 परंतु तू पण त्याच्यापासून सावध राहा; कारण आम्ही जे बोललो, त्या सर्व बोलण्यास त्याने जोरदार विरोध केला.   
 16 माझ्या पहिल्या सुनावणीच्या वेळी कोणीही माझ्याबरोबर नव्हते, प्रत्येकाने माझा त्याग केला; याचा दोष त्यांच्यावर येऊ नये.   17 परंतु प्रभू माझ्याजवळ उभे राहिले आणि धैर्याने माझ्या संपूर्ण संदेशाची घोषणा व्हावी व ती सर्व गैरयहूदीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला संधी दिली. सिंहापुढे टाकले जाण्यापासून मला सोडविले.   18 प्रभू सर्व वाईटापासून मला सोडवतील आणि मला त्यांच्या स्वर्गीय राज्यात सुरक्षित आणतील. परमेश्वराला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.   
अंतिम शुभेच्छा 
  19 प्रिस्किल्ला, अक्विला आणि अनेसिफराच्या कुटुंबीयांनी माझा सलाम सांग.   
 20 एरास्त करिंथमध्येच राहिला आणि त्रोफिम आजारी झाला. त्याला मिलेता येथेच ठेऊन मी आलो.   21 हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर.  
युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात.   
 22 प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हा सर्वांवर कृपा असो.