5
विलापगीत आणि पश्चात्तापासाठी आव्हान 
  1 हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो:   
 2 “इस्राएलची कुमारी पडली आहे,  
ती पुन्हा कधीही उठणार नाही,  
तिच्या स्वतःच्या भूमीत उजाड आहे,  
तिला उठविणारा कोणीही नाही.”   
 3 कारण सार्वभौम याहवेह इस्राएलास असे म्हणतात:  
“तुमच्या शहरातून एक हजार शूर निघतात,  
त्यातील शंभरच उरतील;  
तुमच्या शहरातून शंभर निघतात,  
त्यातील दहाच उरतील.”   
 4 याहवेह इस्राएलाच्या लोकांना असे म्हणतात,  
“मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.   
 5 बेथेलचा*बेथेल बेथ-आवेनचा संकेत शोध करू नका,  
गिलगाल येथे जाऊ नका,  
किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका.  
कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल,  
आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल”   
 6 याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल,  
नाहीतर याहवेह योसेफाच्या गोत्रावर अग्नीसारखे भडकतील;  
आणि त्याला भस्म करून टाकील,  
आणि बेथेलमध्ये त्याला विझवणारा कोणीही नसेल.   
 7 असे लोक आहेत जे न्यायाला कडूपणात बदलतात  
आणि नीतिमत्ता धुळीस मिळवितात.   
 8 ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले,  
जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात,  
आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात,  
जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात  
आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात—  
याहवेह, हे त्यांचे नाव आहे.   
 9 अंधारी आणणाऱ्या क्षणिक प्रकाशाने ते किल्ला उद्ध्वस्त करतात  
आणि तटबंदी असलेल्या शहराचा नाश करतात.   
 10 असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्यांचा द्वेष  
आणि सत्य बोलणार्यांचा तिरस्कार करतात.   
 11 तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता.  
म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील  
तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही,  
किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्या रमणीय  
जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला  
तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.   
 12 कारण तुमचे अपराध किती अधिक  
आणि तुमची पातके किती घोर आहेत हे मला माहीत आहे.  
निरपराधांवर अत्याचार करून लाच घेतात  
व गरिबांना न्यायालयात न्याय मिळण्यापासून वंचित करतात असेही लोक आहेत.   
 13 अशा वेळी जे शहाणे आहेत ते मौन धरतात,  
कारण वेळ वाईट आहे.   
 14 वाईट नको, तर चांगले ते शोधा,  
म्हणजे तुम्ही जगाल.  
तुम्ही जसे ते म्हणतात त्याचप्रमाणे  
याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर तुमच्यासोबत असतील.   
 15 दुष्टाईचा द्वेष करा, चांगल्यावर प्रीती करा;  
न्यायालयात न्याय स्थापित करा.  
मग कदाचित याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर  
योसेफाच्या उरलेल्या लोकांवर दया करतील.   
 16 यास्तव प्रभू, याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर असे म्हणतात:  
“सर्व रस्त्यांवर विलाप होईल  
आणि प्रत्येक चौकात आक्रंदन होईल.  
तुमच्याबरोबर शोक करण्यासाठी शेतकर्यांनाही बोलाविले जाईल;  
रडण्यासाठी शोक करणार्यांना बोलाविले जाईल.   
 17 प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल,  
कारण मी तुमच्यामधून जाईन,”  
असे याहवेह म्हणतात.   
याहवेहचा दिवस 
  18 जे याहवेहच्या दिवसाची इच्छा बाळगतात  
त्यांच्या धिक्कार असो!  
तुम्ही याहवेहच्या दिवसाची इच्छा का बाळगता?  
कारण तो दिवस प्रकाशाचा नाही तर अंधाराचा असेल.   
 19 जसे काय एखादा मनुष्य सिंहापासून पळाला  
आणि त्याला अस्वलाने गाठले,  
किंवा जसे काय आपल्या घरात येऊन त्याने  
हात भिंतीला टेकविला  
आणि त्याला साप चावला.   
 20 याहवेहचा दिवस हा प्रकाशाचा नसून अंधकाराचा दिवस असेल;  
गडद अंधकार, प्रकाशाचा एकही किरण नसेल?   
 21 “मला तुमच्या धार्मिक उत्सवांचा तिरस्कार वाटतो;  
तुमच्या सभा माझ्यासाठी दुर्गंधीप्रमाणे आहेत.   
 22 तुमची गोऱ्ह्यांची होमार्पणे व उपकारस्तुतीची अर्पणे आणली तरीही  
मी स्वीकारणार नाही.  
तुमच्या उत्तम शांत्यर्पणामुळे  
मी संतुष्ट होणार नाही.   
 23 तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा!  
मी तुमच्या वीणांचे संगीत ऐकणार नाही.   
 24 परंतु न्याय नदीप्रमाणे  
व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहू द्या!   
 25 “अहो इस्राएल लोकहो, रानात असताना  
चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे आणली व होम केले काय?   
 26 तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा,  
तुमच्या काइवान†काइवान किंवा किय्यून मूर्तीची बैठक,  
तुमच्या दैवताचा तारा‡दैवताचा तारा किंवा तुमचा राजा साक्कुथ आणि तुमचे दैवत रेफानचा तारा उंचाविला;  
जो तुम्ही तुमच्यासाठी बनविला.   
 27 म्हणून मी तुम्हाला, दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन,”  
असे याहवेह म्हणतात, ज्यांचे नाव सर्वसमर्थ परमेश्वर आहे.