2
तुमच्यासाठी आणि लावदिकीया रहिवाशांसाठी, आणि ज्या सर्वांशी माझी वैयक्तिक भेट झाली नाही अशांसाठी, मी किती झटून श्रम करीत आहे हे तुम्हाला समजावे. माझा उद्देश हाच आहे की त्यांच्या अंतःकरणास उत्तेजन मिळून ते प्रेमाने बांधले जावे, आणि त्यांना विपुलतेने पूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी की परमेश्वराची गुप्त योजना ख्रिस्त हे त्यांना समजावे, आणि त्यांच्यामधेच सर्व बुद्धीची व ज्ञानाची भांडारे गुप्त ठेवलेली आहेत. हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की प्रलोभन देणार्‍या भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये. कारण जरी मी शरीराने दूर असलो, तरी आत्म्याने तुम्हाजवळ हजर आहे. तुम्ही शिस्तबद्ध आहात व ख्रिस्तावर तुमचा दृढविश्वास आहे, यात मी आनंद मानतो.
ख्रिस्तामध्ये आत्मिक पूर्णता
तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा. त्यांच्यामध्ये मुळावलेले, बांधलेले, तुम्हाला शिकविलेल्या विश्वासात मजबूत असलेले आणि उपकारस्तुतीने भरून वाहणारे असा.
हे लक्षात असू द्या की पोकळ व फसवे तत्वज्ञान जे ख्रिस्तावर नव्हे तर मानवी परंपरा आणि ऐहिक तत्वांवर*किंवा मूलभूत धार्मिक तत्वावर आधारित आहे, याद्वारे कोणी तुम्हाला बंधनात पाडू नये म्हणून जपा.
कारण ख्रिस्ताच्या ठायी दैवत्वाची सर्व परिपूर्णता शरीररूपाने राहते; 10 आणि ख्रिस्तामध्ये तुम्ही परिपूर्ण केलेले आहात. ते सर्व सामर्थ्य आणि अधिकार यांचे मस्तक आहेत. 11 त्यांच्यामध्ये तुमची सुंता झाली आहे, मानवी हाताने केलेली नव्हे तर, ख्रिस्ताद्वारे तुमची जी सुंता झाली आहे त्याद्वारे तुमचा दैहिक पापी मूळस्वभाव काढून टाकण्यात आला आहे. 12 कारण तुम्ही बाप्तिस्म्यामध्ये त्यांच्यासह पुरला गेलात व ज्यांना त्यांनी मरणातून उठविले यांच्याबरोबर तुम्हीही परमेश्वराच्या कृतीवरील विश्वासाद्वारे उठविण्यात आले आहात.
13 जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली. 14 आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले, 15 आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला.
मानवी नियमांपासून मुक्त
16 तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका. 17 हे सर्व केवळ येणार्‍या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते. 18 जो कोणी व्यर्थ नम्रतेचा देखावा करण्यात संतोष पावतो आणि देवदूतांची उपासना करतो, त्यांनी तुम्हाला अपात्र ठरवू नये. असा मनुष्य पाहिलेल्या गोष्टींचे विस्तारपूर्वक वर्णन करतो आणि दैहिक विचारांनी, आत्मिक नसलेल्या हृदयाने उगीचच फुगून जातो. 19 त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.
20 तुम्ही ख्रिस्ताबरोबर जगाच्या प्राथमिक तत्वज्ञानास मरण पावलेले आहात, तरी देखील तुम्ही जणू काय जगाशी जोडलेले आहात व त्याच्या नियमांच्या अधीन आहात. 21 “हात लावू नको! चव घेऊ नको! स्पर्श करू नको!” 22 हे नियम मानवी शिकवण व आज्ञा यावर आधारित आहेत, ते वारंवार उपयोगात आणल्यामुळे नष्ट होणे स्वाभाविक आहे. 23 खरोखर या नियमांना ज्ञानाचा देखावा आहे, स्वनियमाने नेमलेली उपासना, खोटी नम्रता आणि देहाला कठोर कष्ट देणे या गोष्टी आहेत. परंतु दैहिक वासना नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचा काडी इतकाही उपयोग होत नाही.

*2:8 किंवा मूलभूत धार्मिक तत्वावर