2
रानात भ्रमण
1 नंतर आम्ही मागे वळून अरण्यामधून तांबड्या समुद्राकडे निघालो, कारण याहवेहनी मला तशी आज्ञा दिली होती आणि अनेक वर्षे आम्ही सेईर पर्वताच्या सभोवतालच्या प्रदेशात भ्रमण करीत राहिलो.
2 मग याहवेह मला म्हणाले, 3 “तुम्ही या पर्वताच्या सभोवती दीर्घकाल राहिला आहात, तर आता उत्तरेकडे वळा. 4 लोकांना आदेश दे: ‘सेईर येथे राहणार्या एसावाच्या वंशजाच्या, म्हणजे त्यांच्या एदोमी भाऊबंदांच्या देशातून ते पुढे जाणार आहेत. तुमची त्यांना भीती वाटेल, म्हणून तुम्ही खबरदारी घ्या. 5 त्यांना लढाईला प्रवृत्त करू नका, कारण त्यांची भूमी मी तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला तिथे पाऊल ठेवण्यासही जागा देणार नाही. मी सेईर पर्वताचा मुलूख एसावाला दिला आहे. 6 तुम्ही तिथे जे काही अन्न खाल व पाणी प्याल त्याच्या मोबदल्यात त्यांना चांदी द्या.’ ”
7 याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमच्या हाताच्या प्रत्येक कार्याला आशीर्वादित केले आहे. या विशाल अरण्यात तुमचे भटकणे त्यांनी पाहिले आहे, चाळीस वर्षे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर आहेत व तुम्हाला कशाचेही उणे पडले नाही.
8 म्हणून आम्ही सेईर येथे राहणाऱ्या एसावाच्या वंशातील भाऊबंदांच्या देशाला वळसा घालून दक्षिणेकडे एलाथ व एजिओन-गेबेरकडे जाणारा अराबाचा रस्ता पार करून उत्तरेकडे प्रवास करीत मोआब वाळवंटाकडे निघालो.
9 तेव्हा याहवेह आम्हाला म्हणाले, “मोआबी लोकांना उपद्रव किंवा लढाईसाठी प्रवृत करू नका, कारण मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग वतन म्हणून तुम्हाला देणार नाही. मी लोटाच्या वंशजांना आर प्रदेश वतन म्हणून दिला आहे.”
10 (एमी लोक त्या भागात राहात होते—बलवान व बहुसंख्य आणि अनाकी लोकांसारखे उंच असे होते. 11 एमी व अनाकी या दोन्हीही जमातीस पुष्कळदा रेफाईम असेही म्हणत, पण मोआबी मात्र त्यांना एमीच म्हणत. 12 पूर्वीच्या काळी होरी लोक सेईरमध्ये राहत असत, परंतु एसावाचे वंशज एदोमींनी त्यांना तिथून घालवून दिले व तिथे वस्ती केली. याहवेहने वतन दिलेल्या प्रदेशातून ज्याप्रमाणे इस्राएली लोकांनी तेथील लोकांना घालवून दिले होते त्याचप्रमाणे.)
13 आणि याहवेह म्हणाले, “आता उठा आणि जेरेद ओहोळ पार करून जा.” तेव्हा आम्ही ओहोळ पार केला.
14 पण कादेश-बरनेआहून निघून जेरेद ओहोळ ओलांडून जाण्यास आम्हाला तब्बल अडतीस वर्षे लागली, कारण याहवेहने घेतलेल्या शपथेमुळे लढाऊ पुरुषांची संपूर्ण पिढी छावणीतून नष्ट झाली होती. 15 त्या सर्वांचा नाश होईपर्यंत छावणीतून त्यांचा संहार करावा म्हणून याहवेहचा हात त्यांच्यावर उगारलेला होता.
16 आता जेव्हा या लोकांमधील शेवटचा योद्धा मरण पावला, 17 याहवेह मला म्हणाले, 18 “आज तुम्हाला आर येथे मोआबाची सीमा ओलांडून जायचे आहे. 19 जेव्हा तुम्ही अम्मोनी लोकांच्या भूमीत प्रवेश कराल, अम्मोनी लोकांना त्रास देऊ नका, कारण मी त्यांचा कोणताही प्रदेश तुम्हाला देणार नाही, तो सर्व मी लोटाच्या वंशजांना वतनादाखल दिला आहे.”
20 (तो देश तिथे राहाणाऱ्या रेफाईम लोकांचा देखील मानला जात होता; परंतु अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणत. 21 त्यांच्या वंशातील लोक धिप्पाड आणि संख्येने पुष्कळ होते. ते अनाकी लोकांइतके उंच होते, परंतु अम्मोनी लोकांपुढून त्यांना याहवेहने घालवून दिले व त्यांच्या नाश केला. त्यांच्या जागी अम्मोन्यांनी त्या देशात वस्ती केली. 22 जेव्हा तिथे राहणार्या होरी लोकांना त्यांनी घालवून लावले व त्यांचा नाश केला. त्यांनी त्यांना हुसकावून लावले आणि आजपर्यंत त्यांच्या जागी ते वस्ती करून राहत आहेत, त्याचप्रमाणे सेईर येथे राहाणाऱ्या एसावाच्या वंशजांसाठीही याहवेहने असेच केले. 23 गाझा शहरापर्यंत विखुरलेल्या गावातून वस्ती करून राहिलेल्या अव्वी लोकांवर कफतोरहून आलेल्या कफतोरी लोकांनी हल्ला चढवून त्यांचा संहार केला व त्या ठिकाणी वस्ती केली.)
हेशबोनचा राजा सीहोनचा पराभव
24 “आता उठा आणि आर्णोन नदी ओलांडून जा. पाहा, हेशबोनचा राजा अमोरी सीहोन आणि त्याचा देश मी तुमच्या हाती दिला आहे. तो देश ताब्यात घेण्यास सुरुवात करा व त्याच्याशी युद्ध करा. 25 आजपासून पुढे मी असे करेन की अखिल पृथ्वीतलावरील लोक तुमच्यापुढे भीतीने थरथर कापतील व तुमच्या आगमनाची चाहूल लागताच दहशत घेतील.”
26 नंतर शांततेची बोलणी करण्याकरिता मी केदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले, 27 “आम्हाला तुझ्या देशामधून जाऊ दे. आम्ही मुख्य रस्त्यावरच राहू; उजवीकडे वा डावीकडे वळणारही नाही. 28 आम्ही वाटेने जात असताना तुमचे अन्न व पाणी तुमच्याकडून चांदीच्या किमतीत विकत घेऊ. तुमच्या देशातून पायी चालत जाण्याची फक्त आम्हाला परवानगी द्या— 29 सेईरमध्ये राहणारे एसावाचे वंशज आणि आरवासी मोआबी यांनी आमच्यासाठी केले—आम्ही यार्देन ओलांडून याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला देत असलेल्या देशात जाईपर्यंत तुम्ही आमच्यासोबत करा.” 30 परंतु हेशबोनाच्या सीहोन राजाने आम्हाला जाण्यास परवानगी दिली नाही. याहवेह तुमच्या परमेश्वराने त्याला तुमच्या हातात देण्यासाठी त्याचा आत्मा हट्टी आणि त्याचे हृदय कठीण केले होते.
31 मग याहवेह म्हणाले, “सीहोन राजाचा देश तुम्हाला देण्यास मी आता सुरुवात केली आहे. जेव्हा तुम्ही तो देश ताब्यात घ्याल, तेव्हा तो कायमचा तुमच्या मालकीचा होईल.”
32 सीहोन आणि त्याची सर्व सेना आमच्यासोबत युद्ध करण्यास याहस येथे एकत्रित झाली, 33 परंतु याहवेह आमच्या परमेश्वराने त्याला आमच्या अधीन केले, आम्ही त्याला, त्याच्या पुत्रांसह संपूर्ण सेनेला चिरडून टाकले. 34 त्यावेळी आम्ही त्याची सर्व नगरे घेतली. त्यांच्या सर्वांचा नाश केला—पुरुष, स्त्रिया आणि मुले. आम्ही कोणालाही जिवंत सोडले नाही. 35 फक्त त्यांची गुरे जिवंत ठेवली. त्यांची नगरे काबीज करून ती सर्व संपत्ती आम्ही घेतली. 36 आर्णोन खोर्याच्या कडेला असलेल्या अरोएर शहरापासून खोर्यातील शहरापर्यंत व त्या शहरापासून गिलआदापर्यंत एकही दुर्गम शहर राहिले नाही. याहवेह आमच्या परमेश्वराने हे सर्व आमच्या अधीन करून दिले. 37 मात्र याहवेह आमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार अम्मोनी लोकांच्या प्रदेशापासून आम्ही दूरच राहिलो. तसेच यब्बोक नदी व त्या डोंगराळ प्रदेशात वसलेल्या शहरापासूनही आम्ही दूर राहिलो.