12
उपासनेचे एकमेव स्थान
1 याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने जो देश तुम्हाला ताब्यात घ्यावयास दिला आहे—तिथे तुम्ही या पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत हे विधी व नियम काळजीपूर्वकपणे पाळावेत. 2 ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात तेथील उंच पर्वतांवर, टेकड्यांवरील आणि प्रत्येक घनदाट पसरलेल्या झाडाखाली जे त्या दैवतांची उपासना करतात ती सर्व ठिकाणे पूर्णपणे नष्ट करा. 3 तुम्ही त्यांच्या वेद्या पाडून टाकाव्या, त्यांचे पवित्र दगड फोडून टाकावे, त्यांचे अशेरास्तंभ अग्नीत जाळून टाकावे, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्ती फोडून टाकाव्या आणि त्या ठिकाणातून त्यांची नावे पुसून टाकावी.
4 याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना त्यांच्या पद्धतीने करू नका. 5 उलट, तुमच्या सर्व गोत्रांच्या जागेतून याहवेह तुमचे परमेश्वर निवडील व त्या जागेला ते स्वतःचे नाव देतील, त्या ठिकाणी तुम्ही जावे; 6 तिथेच तुम्ही आपली होमार्पणे, यज्ञार्पणे, तुमचे दशांश व विशेष भेटी, नवस फेडण्यासाठी आणलेली अर्पणे आणि तुमची स्वेच्छार्पणे आणि तुमच्या गुरांची व शेरडामेंढरांची प्रथम वत्सांची अर्पणे आणावीत. 7 त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने भोजन करावे आणि तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद कराल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे.
8 आजपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे वागत आला आहात, पण आता तसे करता येणार नाही, 9 कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी दिलेल्या विश्रामस्थानी आणि वचनदत्त ठिकाणी अजून तुम्ही पोहोचला नाही. 10 पण तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात राहू लागाल तेव्हा ते तुमच्या सभोवती असलेल्या सर्व शत्रूपासून सुरक्षित ठेवून तुम्हाला विश्रांती देतील. 11 तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत. 12 आणि त्या ठिकाणी तुम्ही, तुमचे पुत्र आणि कन्या, तुमचे दास व दासी आणि तुमच्या नगरातील लेवी, ज्यांना स्वतःचा कोणताही वाटा किंवा वतन नाही, या सर्वांसह—याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर आनंदोत्सव करावा. 13 तुमची होमार्पणे तुम्ही इतर कुठेही अर्पण करणार नाही याची खबरदारी घ्या. 14 तुमच्या एका गोत्रातील याहवेहने नेमून दिलेल्या ठिकाणीच तुमचे होमबली अर्पावेत आणि मी तुम्हाला जे आज्ञापिले ते सर्वकाही करावे.
15 तरीसुद्धा, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही तुमच्या नगरात तुमचे पशू ज्याप्रमाणे सांबर व हरिण मारून खाता त्याप्रमाणे पाहिजे तेवढे खा. विधिनियमानुसार अशुद्ध आणि शुद्ध असे दोघेही ते खाऊ शकतात. 16 पण तुम्ही रक्ताचे सेवन कधीही करू नये; तर ते जमिनीवर पाण्यासारखे ओतून द्यावे. 17 धान्य, द्राक्षारस व तेलाचे दशांश, गुरांचे प्रथमवत्स, नवसफेडीच्या वस्तू, स्वेच्छार्पणे व इतर अर्पणे या परमेश्वराला वाहिलेल्या अर्पणातून काहीही आपल्या नगरात खाऊ नये. 18 पण ही सर्व अर्पणे याहवेह तुमचे परमेश्वर निवडील त्या ठिकाणी तुमचे पुत्र, कन्या, तुमचे दास व दासी व तुमच्या शहरात राहणारे लेवी, या सर्वांसह तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर खावीत. तुम्ही जे करता त्या प्रत्येक सेवेबद्दल परमेश्वरापुढे आनंद करावा. 19 जेव्हापर्यंत तुमचे या भूमीवर वास्तव्य असेल तेव्हापर्यंत लेवी वंशजांकडे दुर्लक्ष न करण्याची काळजी घ्यावी.
20 याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या वचनाप्रमाणे तुमच्या देशाची सीमा वाढविल्यावर, तुम्हाला मांस खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही म्हणाल, “मला मांस खावयाचे आहे,” तेव्हा तुम्ही मनसोक्त मांस खावे. 21 याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या नावासाठी निवडलेले स्थान तुमच्या घरापासून खूप दूर असेल, तर तुम्हाला जेव्हा इच्छा होईल, तेव्हा याहवेहने तुम्हाला दिलेल्या पशूंमधून किंवा मेंढरांमधून तुम्ही काहीही मारून खावे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते मांस तुम्ही तुमच्या शहरात तुम्हाला हवे तेवढे खावे. 22 जो कोणी विधिनियमानुसार शुद्ध किंवा अशुद्ध असेल त्यानेही हे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात, त्याप्रमाणे खावे. 23 परंतु रक्त सेवन न करण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी, कारण रक्त हे जीवन आहे, म्हणून तुम्ही मांसाबरोबर जीवन सेवन करू नये. 24 तुम्ही रक्ताचे सेवन करू नये; त्याऐवजी ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे. 25 त्याचे सेवन करू नये, तर त्याने तुमचे आणि तुमच्यानंतर तुमच्या संततीचे सर्व बाबतींत कल्याण होईल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य वाटणार्या गोष्टीच तुम्ही कराल.
26 परंतु जी पवित्र अर्पणे करावयाची असतील व नवसाची दाने द्यावयाची असतील, ती घेऊन तुम्ही याहवेह जे स्थान निवडील, त्या स्थानी जावे. 27 तिथे आपल्या होमबलीचे मांस व रक्त याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करावे. तुमच्या यज्ञपशूंचे रक्त याहेवह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर ओतावे आणि मांस खावे. 28 या सर्व आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे उत्तम आणि योग्य ते तुम्ही केले, तर तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
29 ज्या भूमीत तुम्ही राहणार आहात तेथील राष्ट्रांचा याहवेह तुमचे परमेश्वर नाश करतील. मग त्यांना तिथून घालवून दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वस्ती करावी, 30 आणि तुमच्यासमोर ते नष्ट झाल्यानंतर, तुम्ही त्यांच्या दैवतांची चौकशी कराल “ही राष्ट्रे त्यांच्या दैवतांची उपासना कशी करीत होती? आपणही तसेच करावे,” तसे करण्याचा तुम्हाला मोह होईल, तेव्हा त्यांच्या दैवतांच्या मोहात अडकू नये याची खबरदारी घ्या. 31 त्यांच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना कदापि करू नये, कारण त्यांच्या दैवतांच्या उपासनेमध्ये ते अशी घृणित कृत्ये करतात, ज्यांचा याहवेह तिरस्कार करतात. ते आपल्या पुत्रांना जाळतात आणि कन्यांचा त्यांच्या दैवतांना होम करतात.
32 मी देत असलेल्या सर्व आज्ञांचे तुम्ही पालन करावे; त्यात काहीही भर घालू नये किंवा त्यातून काही कमी करू नये.