25
 1 लोकांमध्ये वाद उपस्थिती झाला आणि न्याय मागण्यासाठी त्यांनी न्यायालयात जावे व न्यायाधीशाने त्यांचा निवाडा करावा. जो निर्दोष असेल त्याला निर्दोषी ठरवावे व जो दोषी असेल त्याला दोषी ठरवावे.   2 दोषी मनुष्य जर फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला, तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडावे आणि आपल्यादेखत त्याच्या अपराधाप्रमाणे मोजून फटके मारावेत,   3 परंतु न्यायाधीशाने त्याला चाळीस पर्यंतच फटके मारावेत, अधिक फटके मारू नयेत. नाहीतर, अधिक फटके मारल्यास, तुमच्या बंधूंची तुमच्यादेखत अप्रतिष्ठा होईल.   
 4 बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.   
 5 भाऊ एकत्र राहत असतील व त्यातील एकजण निपुत्र मरण पावला, तर त्याच्या विधवेने कुटुंबाबाहेर परक्याशी विवाह करू नये. तिच्या पतीच्या भावाने तिच्याशी विवाह करावा आणि तिचा स्वीकार करावा आणि तिच्याप्रती दिराचे कर्तव्य पूर्ण करावे.   6 तिला जन्मलेल्या पहिल्या पुत्राला मृत भावाचे नाव द्यावे, जेणेकरून त्याचे नाव इस्राएलमधून पुसले जाणार नाही.   
 7 परंतु याबाबतीत मृत माणसाच्या भावाने त्याच्या मृत भावाच्या विधवेशी विवाह करण्यास नकार दिला, तर तिने त्या नगराच्या वेशीवर वडीलजनांकडे जाऊन त्यांना म्हणावे, “माझ्या पतीचा भाऊ आपल्या भावाचे नाव इस्राएलात पुढे चालविण्यास तयार नाही. माझ्याप्रति तो आपले दिराचे कर्तव्य पार पाडणार नाही.”   8 तेव्हा त्याच्या नगरातील वडीलजनांनी त्याला बोलावून घ्यावे आणि त्याच्याशी बोलणी करावी. “मला त्या बाईशी लग्न करावयाचे नाही,” असे जर तो हट्टीपणाने म्हणाला.   9 तर त्या विधवेने सर्व वडीलजनासमोर त्याच्याकडे जावे, त्याच्या पायातील पायतण काढून घ्यावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, “जो मनुष्य आपल्या भावाचे घर चालविण्यास नकार देतो, त्याची अशीच गत होते.”   10 त्याच्या घराण्याचा उल्लेख इस्राएलातील पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असा केला जाईल.   
 11 समजा दोन पुरुष एकमेकात मारामारी करीत असताना त्या दोघांपैकी एकाची पत्नी आपल्या पतीला मदत करण्यासाठी येते आणि दुसर्या मनुष्याचे वृषण पकडते,   12 तर काहीही दयामाया न दाखविता तुम्ही तिचा हात कापून टाकावा.   
 13 तुमच्या झोळीत तुम्ही वेगवेगळी वजने ठेऊ नये—एक जड व एक हलके.   14 तुमच्या घरात दोन वेगवेगळी मापे वापरू नये—एक मोठे व एक लहान.   15 तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.   16 कारण याहवेह तुमचे परमेश्वर या गोष्टी अप्रामाणिकपणे करणार्यांचा तिरस्कार करतात.   
 17 तुम्ही इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर अमालेक लोक तुमच्याशी कसे वागले, हे स्मरण ठेवा.   18 जेव्हा तुम्ही दुर्बल व थकलेले होता, तेव्हा त्यांनी तुम्हाला मार्गात गाठले आणि मागे राहिलेल्यांवर हल्ला केला; त्यांना परमेश्वराचे भय नव्हते.   19 जेव्हा वतन म्हणून देणार्या देशातील तुमच्या सर्व शत्रूपासून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला विश्रांती देतील, तेव्हा तुम्ही या अमालेक लोकांचे नाव पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष केले पाहिजे. हे तुम्ही कधीही विसरू नये!