32
 1 अहो आकाशमंडळांनो, ऐका आणि मी बोलेन;  
हे पृथ्वी, माझ्या मुखातील शब्दांकडे लक्ष दे.   
 2 माझे शिक्षण तुमच्या कानावर पावसाच्या सरीप्रमाणे पडो,  
माझ्या शब्दांची दवाप्रमाणे पखरण होवो,  
नव्या गवतावर पडणार्या पावसाप्रमाणे,  
कोवळ्या रोपांवर पावसाच्या सरींप्रमाणे वृष्टी करोत.   
 3 मी याहवेहचे नाव जाहीर करेन.  
आपल्या परमेश्वराच्या महानतेची स्तुती गा!   
 4 तेच आमचे खडक आहेत, त्यांचे कार्य परिपूर्ण आहे.  
आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य असतात.  
विश्वासयोग्य परमेश्वर, जे कधीच चूक करीत नाही,  
ते न्यायी आणि सत्यनिष्ठ आहेत.   
 5 ती आता त्यांची लेकरे राहिली नाहीत, कारण ती भ्रष्ट झाली आहेत;  
त्यांना लाज वाटेल की ते एक विकृत आणि कुटिल पिढी आहेत.   
 6 अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो,  
याहवेहची परतफेड करण्याची ही रीत आहे काय?  
ते तुमचे जनक, तुमचे पिता नाहीत काय?  
त्यांनीच तुम्हाला बनविले व घडविले नाही काय?   
 7 पूर्वीच्या काळातील दिवस आठवा;  
तुमच्या गत पिढ्यांची वर्षे स्मरणात आणा.  
तुमच्या वडिलांना विचारा व ते तुम्हाला सांगतील.  
तुमच्या वडीलजनांकडे विचारणा करा, ते याचा खुलासा करतील.   
 8 जेव्हा सर्वोच्चांनी पृथ्वीवरील राष्ट्रांना त्यांचे वतन दिले,  
तेव्हा त्यांनी सर्व मानवजातीची विभागणी केली,  
इस्राएलाच्या पुत्रांच्या संख्येनुसार  
त्यांच्या सीमारेषा आखून दिल्या.   
 9 कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती,  
याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.   
 10 एका मरुभूमीत त्यांना ते भेटले  
ते घोर व भयाण अरण्य होते.  
त्यांनी त्याचे जतन व संरक्षण केले;  
त्यांच्या डोळ्यातील बाहुलीसारखे त्याचे रक्षण केले,   
 11 गरुडपक्षीण आपले घरटे हालविते  
आणि पिलांवर घिरट्या घालते,  
आपले पंख पसरून,  
आपल्या पिलांना आपल्या पंखावर सुरक्षित वाहून नेते.   
 12 तसे फक्त याहवेहच याकोबाला चालवित होते;  
इतर कोणतेही परदेशी दैवत त्याच्यासोबत नव्हते.   
 13 याहवेहने त्याला देशातील उंचीवर स्वार केले,  
आणि शेतातील फळे खायला दिली.  
खडकातून पाझरणारा मध,  
आणि डोंगर कपारीतून तेलाचा पौष्टिक आहार पुरविला,   
 14 त्यांनी त्याला कळपातील गाईंचे दही-दूध,  
पुष्ट शेळ्या आणि मेंढरे,  
आणि बाशानाचे अस्सल मेंढे,  
आणि सर्वोत्तम गहू पुरविला,  
तुम्ही गडद लाल फेसाळणारा द्राक्षारसही प्यालात.   
 15 लवकरच यशुरून*हा इस्राएलसाठी पर्यायी शब्द आहे आणि त्याचा अर्थ नीतिमान असा होतो. स्वस्थ झाला आणि लाथा झाडू लागला;  
खाऊन पिऊन धष्टपुष्ट व आकर्षक झाला.  
उन्मत्त होऊन त्याने त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा तिरस्कार केला,  
आणि आपल्या तारणदुर्गाचा त्याग केला.   
 16 त्यांनी परदेशी दैवतांच्या नादी लागून याहवेहला ईर्षेस पेटविले  
आणि घृणित मूर्तींमुळे अतिशय संतप्त केले.   
 17 जे परमेश्वर नाहीत अशा खोट्या दैवतांना अर्पणे वाहिली—  
जी दैवते अनोळखी होती,  
जी दैवते नवीनच अस्तित्वात आली होती,  
ज्या दैवतांचे तुमच्या पूर्वजांना कधीच भय वाटले नाही.   
 18 ज्या खडकाने तुम्हाला जन्म दिला, त्याचाच तुम्ही त्याग केला;  
ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले, त्यांनाच तुम्ही विसरला.   
 19 हे याहवेहने बघितले आणि त्यांनी त्यांना नाकारले  
कारण त्यांच्या पुत्र व कन्यांच्या द्वारे ते संतप्त झाले.   
 20 तेव्हा ते म्हणाले, “मी त्यांच्यापासून माझे मुख लपवेन,  
आणि मग त्यांचा कसा अंत होतो ते पाहीन;  
कारण ही विकृत पिढी आहे,  
जी विश्वासयोग्य संतती नाही.   
 21 जे देव नाहीत त्याद्वारे त्यांनी मला ईर्षेस पेटविले आहे  
आणि त्यांच्या तुच्छ मूर्तींनी मला संताप आणला आहे.  
जे लोक नाहीत त्यांच्याद्वारे मी त्यांना ईर्षेस आणेन;  
ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी त्यांना क्रोधास आणेन;   
 22 कारण माझा क्रोधाग्नी प्रदीप्त होत आहे,  
तो थेट अधोलोकापर्यंत खोलवर पेटणार आहे.  
तो पृथ्वी व तिच्यावरील सर्व पिके जाळून टाकील,  
आणि तिच्या पर्वतांच्या पायांना अग्नी लावील.   
 23 “मी त्यांच्यावर संकटांची रास रचेन,  
माझ्या बाणांनी त्यांच्यावर प्रहार करेन.   
 24 मी पाठविलेल्या दुष्काळाने ते दुर्बल होतील,  
महामारी व घातक रोग त्यांच्यावर येतील;  
आपल्या दातांनी त्यांना फाडून खाणारी हिंस्त्र श्वापदे मी त्यांच्यावर पाठवेन,  
मातीत सरपटणारे विषारी सर्पही त्यांच्यावर पाठवेन.   
 25 घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल;  
आणि घराच्या आत ते भयाक्रान्त होतील.  
तरुण पुरुष व तरुण स्त्रिया,  
वृद्ध आणि बालके नाश पावतील.   
 26 मी असे म्हटले असते, मी त्यांना दूरच्या देशात पांगविणार  
आणि त्यांची आठवणसुद्धा मानवी स्मरणातून पुसली जाईल,   
 27 पण मला शत्रूच्या फुशारक्यांची धास्ती वाटली,  
ते कदाचित गैरसमज करतील,  
आणि म्हणतील, ‘आम्ही आमच्या बाहुबलानेच विजय मिळविला आहे;  
याहवेहने यातील काहीही केले नाही.’ ”   
 28 ते एक असमंजस राष्ट्र आहे,  
त्यांच्यात काही विवेक नाही.   
 29 हे लोक सुज्ञ असते आणि जर त्यांना हे कळले असते तर किती बरे झाले असते,  
आणि त्यांचा अंत कसा होणार हे त्यांना समजले असते!   
 30 हे कसे शक्य आहे, केवळ एक मनुष्य हजार लोकांचा,  
किंवा दोन लोक दहा हजार लोकांचा पाठलाग करू शकतात,  
जर इस्राएलांच्या खडकाने त्यांना विकून टाकले नसते,  
जर याहवेहने त्यांना टाकले नसते, तरच असे होऊ शकले असते?   
 31 कारण त्यांचा खडक आमच्या खडकासारखा नाही,  
आमचे शत्रू देखील हे मान्य करतात.   
 32 त्यांची द्राक्षलता सदोमाच्या द्राक्षलतेमधून येते,  
आणि गमोराच्या मळ्यातून येते.  
त्यांचे द्राक्ष विषाने भरलेले आहेत,  
आणि द्राक्षाचे घड कडू चवीचे आहेत.   
 33 त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष,  
ते नागांचे घातक विष आहे.   
 34 “यांना मी राखून ठेवलेले नाही काय,  
आणि यांना माझ्या तिजोरीत सुरक्षित ठेवले नाही काय?   
 35 सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन.  
ठरल्या वेळेवर त्यांचे पाय घसरतील;  
त्यांच्या नाशाचा दिवस जवळ आलेला आहे,  
आणि त्यांचा सर्वनाश वेगाने त्यांच्या दिशेने सरसावत आहे.”   
 36 याहवेह आपल्या लोकांचा न्याय करतील,  
आणि त्यांच्या सेवकांसाठी त्यांच्या मनाला पाझर फुटेल  
जेव्हा त्यांच्यातील सर्व शक्ती संपून जाईल,  
आणि दास किंवा स्वतंत्र असे कोणीही उरणार नाहीत.   
 37 मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत,  
त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?   
 38 ज्या दैवतांनी त्यांच्या यज्ञातील चरबीचे सेवन केले  
आणि त्यांच्या द्राक्षारसाचे रसपान केले, ती दैवते आता कुठे आहेत?  
त्या दैवतांनी तुमच्या मदतीसाठी आता जागे व्हावे!  
त्यांनी त्यांचे आश्रयस्थान व्हावे!   
 39 “आता पाहा मीच एकमेव आहे तो आहे!  
माझ्याशिवाय इतर कोणताही ईश्वर नाही.  
माझ्या आदेशानेच मृत्यू येतो आणि जीवनही मीच प्रदान करतो.  
मी जखम केली आणि मी ती बरीही करेन,  
माझ्या हातून सोडविणारा कोणीही नाही.   
 40 मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो  
आणि म्हणतो: शपथ माझ्या जीवनाची,   
 41 जेव्हा मी माझी लखलखणारी तलवार पाजळेन  
आणि न्याय देण्यासाठी ती माझ्या हातात घेईन,  
मी माझ्या शत्रूचा सूड घेईन,  
आणि जे माझा तिरस्कार करतात त्यांची परतफेड करेन.   
 42 वधलेल्या व कैद केलेल्यांच्या रक्ताने,  
शत्रूंच्या सरदारांच्या मस्तकाच्या रक्ताने  
मी माझे बाण मदमस्त करेन,  
आणि माझी तलवार मांस गिळून टाकेल.”   
 43 अहो राष्ट्रांनो, त्यांच्या लोकांबरोबर जयजयकार करा,  
कारण आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा ते सूड उगवतील;  
आणि शत्रूंचा प्रतिशोध घेतील,  
आणि आपला देश आणि आपले लोक यांच्याकरिता प्रायश्चित करतील.   
 44 मोशे नूनाचा पुत्र होशा†होशा अर्थात् यहोशुआ सोबत आला आणि या गीताचे सर्व शब्द लोकांना ऐकू जातील असे म्हणून दाखविले.   45 जेव्हा मोशेने गीताचे हे सर्व शब्द सर्व इस्राएलींसमोर बोलून संपविले,   46 तेव्हा तो त्यांना म्हणाला: “आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा.   47 कारण हे केवळ पोकळ शब्द नाहीत—तर ते तुमचे जीवन आहे. त्याद्वारे यार्देनेच्या पलीकडे असलेला जो देश तुम्ही ताब्यात घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल जगाल.”   
नबो पर्वतावर मोशेचा शेवट होणार 
  48 त्याच दिवशी याहवेह मोशेला म्हणाले,   49 “तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.   50 तुझा भाऊ अहरोन होर पर्वतावर मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला, तसा तू देखील नबो पर्वतावर चढून गेल्यावर व कनान देश पाहिल्यावर मरशील आणि आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील.   51 कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.   52 तर तो देश तू दुरून पाहशील; पण मी जो देश इस्राएली लोकांना देणार आहे, त्यात तू प्रवेश करणार नाहीस.”