12
 1 तुझ्या तारुण्याच्या दिवसात  
तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर,  
आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत  
आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल,  
“मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”—   
 2 जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश,  
आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत,  
पावसानंतर ढग परत जात नाहीत;   
 3 जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील,  
आणि बलवान पुरुष वाकून जातील,  
दळण करणार्या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील,  
आणि खिडक्यांमधून पाहणार्यांची नजर अंधुक होईल;   
 4 जेव्हा रस्त्याच्या वेशी बंद असतील  
आणि जात्याचा आवाज मंद होईल;  
जेव्हा लोक पक्ष्यांच्या आवाजाने उठतील,  
परंतु त्यांची सर्व गीते शांत होतील;   
 5 जेव्हा लोकांना उंच ठिकाणांची  
आणि वाटेतील धोक्याची भीती वाटते;  
जेव्हा बदामाची झाडे फुलतात  
आणि नाकतोडा त्याबरोबर फरफटत जातो  
आणि कोणतीही अभिलाषा जागृत होत नाही.  
तेव्हा लोक आपल्या सनातन घराकडे जातात  
आणि शोक करणारे रस्त्यावर येतात.   
 6 आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी,  
आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी;  
झर्यावरील घागर फुटण्याआधी,  
आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,   
 7 आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी,  
आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याकडे  
परतण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर.   
 8 उपदेशक*किंवा उपदेशक हे वचन 9 आणि 10 मध्ये आहे म्हणतो, निरर्थक! निरर्थक!  
सर्वकाही निरर्थक!   
विषयाचे प्रतिपादन 
  9 उपदेशक केवळ सुज्ञच नाही, तर त्याने लोकांनाही विद्या शिकवली. त्याने विचार करून शोध केला आणि अनेक म्हणी रचल्या.   10 उपदेशकाने योग्य शब्दांचा शोध केला आणि त्याने जे काही लिहिले ते यथार्थ व सत्य होते.   
 11 सुज्ञानाची वचने पराणीप्रमाणे आहेत, त्यांच्या शब्दांचा संग्रह एका मेंढपाळाने दिलेल्या घट्ट रोवलेल्या खिळ्यांप्रमाणे आहेत.   12 याव्यतिरिक्त असलेल्या शिक्षणापासून माझ्या मुला सावध राहा.  
अधिक पुस्तके लिहून ठेवायला अंत नाही आणि पुष्कळ अभ्यास केल्याने शरीर थकते.   
 13 आता सर्व ऐकून झाले;  
सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच की:  
परमेश्वराचे भय बाळग आणि त्यांच्या आज्ञा पाळ,  
कारण सर्व मानवजातीचे हेच कर्तव्य आहे.   
 14 कारण प्रत्येक गुप्त गोष्टीबद्दल,  
ती चांगली असो किंवा वाईट,  
त्याचा परमेश्वर न्याय करतील.