पौलाचे इफिसकरांस पत्र
1
परमेश्वराच्या इच्छेने झालेला ख्रिस्त येशूंचा प्रेषित पौल याजकडून,
इफिस शहरातील ख्रिस्त येशूंमधील विश्वासू असलेल्या परमेश्वराच्या पवित्र लोकांना,
परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
ख्रिस्तामधील आध्यात्मिक आशीर्वादासाठी स्तुती
परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आम्ही त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रीतीमुळेच निवडले. त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून*किंवा त्यांच्या प्रीतीनुसार येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती; त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी. त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धीने, त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे. 10 ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.
11 कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो.किंवा वारस केले गेलो 12 यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे. 13 जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला, 14 आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.
उपकारस्तुती आणि प्रार्थना
15 या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून 16 माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही. 17 माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. 18 मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे. 19 जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे 20 ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले, 21 जे स्थान सर्व शासन आणि अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुत्व व सध्याच्या युगात व येणार्‍या युगातील कोणत्याही नावांपेक्षाही सर्वोच्च आहे, 22 आणि परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आणि मंडळीसाठी प्रत्येक गोष्टींमध्ये मस्तक म्हणून नियुक्त केले. 23 मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.

*1:5 किंवा त्यांच्या प्रीतीनुसार

1:11 किंवा वारस केले गेलो