9
पशूंमध्ये मरीची पीडा 
  1 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा व त्याला सांग, ‘इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात, “माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी.”   2 जर तू त्यांना जाण्यास नकार दिला आणि त्यांना धरून ठेवलेस,   3 तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल.   4 परंतु याहवेह इस्राएलची जनावरे व इजिप्तची जनावरे यात फरक करतील, असा की इस्राएली लोकांची जनावरे मरणार नाहीत.’ ”   
 5 याहवेहने समय नेमून ठेवला व म्हणाले, “याहवेह हे उद्या देशभर घडवून आणतील.”   6 आणि दुसर्या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही.   7 फारोहने शोध घेतला व जाणून घेतले की इस्राएलातील एकही जनावर मेले नाही, तरीसुद्धा फारोहचे मन बदलले नाही व त्याने इस्राएली लोकांना जाऊ दिले नाही.   
गळवांची पीडा 
  8 नंतर याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले, “भट्टीतून मूठभर राख घेऊन मोशेने ती फारोहच्या देखत हवेत उधळावी.   9 व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.”   
 10 तेव्हा त्यांनी भट्टीतील राख घेतली व फारोहसमोर उभे राहून मोशेने ती राख हवेत उधळली, तेव्हा मनुष्यांवर व सर्व जनावरांवर गळवे फुटली.   11 मांत्रिक मोशेसमोर उभे राहू शकले नाहीत, कारण त्यांच्याही अंगावर व सर्व इजिप्तच्या लोकांवर गळवे फुटली होती.   12 पण याहवेहने फारोहचे मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.   
गारांची पीडा 
  13 मग याहवेह मोशेला म्हणाले, “अगदी पहाटेच ऊठ, फारोहची भेट घे आणि त्याला सांग, इब्री लोकांचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे.   14 नाहीतर यावेळी मी तुम्हा सर्वांवर म्हणजेच तू व तुझे अधिकारी व तुझे लोक या सर्वांवर भयानक पीडा पाठवेन, ज्यामुळे तुझी खात्री होईल की, सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा इतर कोणी नाही.   15 वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते.   16 परंतु मी तुला याच एका उद्देशाने राखून ठेवले की, मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव अखिल पृथ्वीवर जाहीर व्हावे.   17 तू अजूनही माझ्या लोकांच्या विरोधात राहून त्यांना जाऊ देत नाहीस.   18 म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन.   19 म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.”   
 20 फारोहच्या ज्या अधिकार्यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली.   21 पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले.   
 22 मग याहवेहने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशाकडे उंच कर म्हणजे संपूर्ण इजिप्त देशावर—मनुष्य, जनावरे व शेतात जे काही आहे त्यावर—गारा पडतील.”   23 जेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे लांब केली, तेव्हा याहवेहने ढगांच्या गडगडाटांसह गारा पाठविल्या व विजा भूमीवर पडल्या. अशाप्रकारे याहवेहने इजिप्तवर गारांची वृष्टी केली.   24 गारा पडून चहूकडे विजा लखलखत होत्या, इजिप्त देशाची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाले नाही असे भयंकर वादळ उठले.   25 गारांनी इजिप्त देशाच्या शेतातील सर्वकाही; मनुष्य असो वा जनावरे यांचा नाश केला; शेतात पिकत असलेले पीक व रानातील प्रत्येक झाड नाहीसे केले.   26 फक्त एकच असे ठिकाण होते जिथे गारा पडल्या नाही; तो गोशेन प्रांत, ज्या ठिकाणी इस्राएली लोक राहत होते.   
 27 मग फारोहने मोशे व अहरोन यांना बोलावून घेतले, व तो त्यांना म्हणाला, “यावेळी मी पाप केले आहे, याहवेह न्यायी आहेत, परंतु मी व माझे लोक चुकलो.   28 याहवेहला विनंती करा, कारण मेघांचा हा गडगडाट*मेघांचा हा गडगडाट अक्षरशः परमेश्वराने वाजवलेली टाळी व गारा आता असह्य झाले आहे. मी तुम्हाला जाऊ देईन व तुम्हाला इथे राहण्याची गरज नाही.”   
 29 मोशे म्हणाला, “शहराबाहेर जाताच प्रार्थनेत याहवेहकडे मी माझे हात पसरेन. मग गडगडाट थांबेल व गारांचा वर्षावही होणार नाही. यावरून तुला कळेल की, पृथ्वी याहवेहची आहे.   30 पण मला माहीत आहे की, तू व तुझे सेवक अजूनही याहवेह परमेश्वराचे भय बाळगत नाहीत.”   
 31 (आता जवस व सातू या पिकांचा पूर्णपणे नाश झाला होता, कारण सातू कापणीला आला होता व जवसाला फुले आली होती.   32 पण गहू व खपल्याचा गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अजून पिकले नव्हते.)   
 33 मग मोशे फारोहपासून निघून शहराबाहेर गेला व त्याने आपले हात याहवेहकडे पसरले; मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला व संपूर्ण देशावर पडणारा पाऊस बंद झाला.   34 पण फारोहने जेव्हा पाहिले की मेघगर्जना, गारा व पाऊस हे थांबले आहे, त्याने पुन्हा पाप केले: त्याने व त्याच्या सरदारांनी आपले हृदय कठीण केले.   35 याहवेहने मोशेला सांगितल्याप्रमाणे फारोहने इस्राएली लोकांना जाऊ देण्याचे नाकारले, कारण त्याचे हृदय कठीण झाले होते.