2
संदेष्टा होण्यास यहेज्केलला पाचारण
1 तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, तुझ्या पायांवर उभा राहा, म्हणजे मी तुझ्याशी बोलेन.” 2 तो बोलत असताना, आत्म्याने माझ्यामध्ये प्रवेश केला व मला माझ्या पायांवर उभे केले आणि तो माझ्याशी बोलताना मी ऐकले.
3 तो म्हणाला, “हे मानवपुत्रा, ज्या राष्ट्राने माझ्याविरुद्ध बंड केले, अशा बंडखोर इस्राएल राष्ट्राकडे मी तुला पाठवित आहे; ते व त्यांचे पूर्वज यांनी आजपर्यंत माझ्याशी फितुरी केली आहे. 4 ज्या लोकांकडे मी तुला पाठवित आहे ते उद्धट व हट्टी आहेत. त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात.’ 5 ते ऐको किंवा न ऐकोत—कारण ते बंडखोर लोक आहेत—त्यांना कळेल की त्यांच्यामध्ये एक संदेष्टा आहे. 6 आणि हे मानवपुत्रा, त्यांना किंवा त्यांच्या शब्दांना घाबरू नकोस. तुझ्याभोवती झुडपे व काटे असतील आणि तू विंचवांमध्ये राहशील तरी घाबरू नकोस. जरी ते बंडखोर लोक आहेत तरी ते काय बोलतात त्याला तू घाबरू नकोस किंवा त्यांना भयभीत होऊ नकोस. 7 तू माझे शब्द त्यांना सांगितले पाहिजे, मग ते ऐको किंवा न ऐकोत, कारण ते बंडखोर आहेत. 8 परंतु तू हे मानवपुत्रा, मी तुला जे सांगतो ते ऐक. त्या बंडखोर लोकांप्रमाणे तू बंड करू नकोस; तुझे तोंड उघड आणि मी तुला जे देतो ते खा.”
9 तेव्हा मी पाहिले, की एक हात माझ्याकडे पसरलेला होता आणि त्यात एक गुंडाळी होती, 10 ती त्याने माझ्यापुढे उघडली. त्याच्या दोन्ही बाजूंना विलाप आणि शोक आणि दुःखाचे शब्द लिहिलेले होते.