7
अंत आला आहे 
  1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:   2 “मानवपुत्रा, इस्राएल देशाला सार्वभौम याहवेह असे म्हणतात:  
“ ‘अंत! देशाच्या चारही कोपर्यांवर  
शेवट आला आहे!   
 3 आता तुमचा शेवट आला आहे,  
आणि तुमच्याविरुद्ध मी माझा राग मोकळा सोडेन.  
तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन  
आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.   
 4 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही;  
मी तुमची गय करणार नाही.  
मी खचितच तुमच्या कृत्यांचे  
आणि तुमच्यातील अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.  
तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’   
 5 “सार्वभौम याहवेह असे म्हणतात:  
“ ‘विपत्ती! कधी ऐकली नाही*काही मूळ प्रतींनुसार विपत्तीवर विपत्ती अशी विपत्ती  
पाहा, ती येत आहे!   
 6 अंत आला आहे!  
अंत आला आहे!  
तो स्वतः तुझ्याविरुद्ध उठला आहे.  
पाहा, तो येत आहे!   
 7 तुम्ही जे देशात राहतात,  
त्या तुमच्यावर विनाश आला आहे.  
समय आला आहे! दिवस जवळ आहे!  
डोंगरावर आनंद नाही, तर गोंधळ आहे.   
 8 मी आपला क्रोध तुमच्यावर लवकरच ओतीत आहे  
आणि माझा राग तुमच्याविरुद्ध भडकणार आहे.  
तुमच्या कृत्यांनुसार मी तुमचा न्याय करेन  
आणि तुमच्या सर्व अमंगळ कृत्यांचे प्रतिफळ तुम्हाला देईन.   
 9 मी तुमच्याकडे दयेने पाहणार नाही;  
मी तुमची गय करणार नाही.  
मी तुम्हाला तुमच्या कृत्यांचे  
आणि तुमच्यातील अमंगळ कार्याचे प्रतिफळ देईन.  
“ ‘तेव्हा तुम्ही जाणाल की मी याहवेहने तुमच्यावर वार केला आहे.   
 10 “ ‘पाहा, तो दिवस!  
पाहा, तो येत आहे!  
विनाशाचा भडका उठला आहे,  
काठीला अंकुर फुटला आहे,  
अहंकार फुलला आहे!   
 11 हिंसा उदय पावली आहे,  
दुष्टाला शिक्षा करण्यास काठी उठली आहे.  
त्या लोकांतून कोणीही,  
त्या समुहातील कोणीही सुटणार नाही;  
त्यांच्या संपत्तीतील,  
कशाचे काहीही मोल राहणार नाही.   
 12 समय आला आहे!  
दिवस येऊन ठेपला आहे!  
विकत घेणार्याने आनंद करू नये  
किंवा विकत देणार्याने दुःखी होऊ नये,  
कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे.   
 13 जोपर्यंत विकत घेणारा व देणारा जिवंत आहे  
तोपर्यंत जी संपत्ती विकण्यात आली होती;  
त्याची फेड होणार नाही.  
कारण संपूर्ण समुहाविषयी असलेला दृष्टान्त  
पलटणार नाही.  
त्यांच्या पापामुळे त्यांच्यातील एकही व्यक्ती  
आपला जीव वाचविणार नाही.   
 14 “ ‘त्यांनी कर्णे वाजविली आहे,  
त्यांनी सर्वकाही सज्ज केले आहे,  
परंतु कोणी युद्धात जाणार नाही,  
कारण संपूर्ण समुहावर माझा क्रोध आहे.   
 15 बाहेर तलवार आहे;  
व आत पीडा व दुष्काळ आहे.  
जे देशात राहतात  
ते तलवारीने मरतील;  
जे शहरात आहेत  
ते दुष्काळ व पीडांनी नाश पावतील.   
 16 आश्रयासाठी पळ काढणारे  
डोंगराकडे पळतील.  
खोर्यातील पारव्यांप्रमाणे,  
आपल्या स्वतःच्या पापाकरिता,  
ते सर्व शोक करतील.   
 17 प्रत्येक हात ढिले पडतील;  
प्रत्येक पाय लघवीने भिजेल.   
 18 ते गोणपाट नेसतील  
आणि भयाचे वस्त्र घालतील.  
प्रत्येक चेहरा लज्जेने झाकला जाईल,  
आणि प्रत्येक डोक्याचे मुंडण केले जाईल.   
 19 “ ‘ते आपली चांदी रस्त्यावर फेकतील,  
आणि त्यांचे सोने अशुद्ध मानले जाईल.  
याहवेहच्या क्रोधाच्या दिवशी  
त्यांचे चांदी व सोने  
त्यांची सुटका करू शकणार नाही.  
ते त्यांची भूक मिटवणार नाही  
किंवा त्यांचे पोट भरणार नाही,  
कारण त्यांच्या संपत्तीनेच त्यांना पापात पडण्यास भाग पाडले आहे.   
 20 त्यांनी त्यांच्या सुंदर दागिन्यांविषयी गर्व केला  
आणि त्यांच्या अमंगळ मूर्ती बनवण्यास त्यांचा उपयोग केला.  
त्यांनी त्यांच्या व्यर्थ प्रतिमा बनविल्या;  
म्हणून ते दागिने मी त्यांच्यासाठी अशुद्ध करेन.   
 21 मी त्यांची संपत्ती परदेशीयांना लूट अशी देईन  
आणि पृथ्वीतील दुष्ट ते लुबाडून घेतील,  
व ते भ्रष्ट करतील.   
 22 लोकांपासून मी आपले मुख वळवेन,  
आणि मी जतन केलेले माझे मौल्यवान स्थळ लुटारू अपवित्र करतील.  
ते त्यात शिरतील  
आणि त्यास भ्रष्ट करतील.   
 23 “ ‘साखळ्या तयार करा!  
कारण देश रक्तपाताने,  
आणि शहर हिंसेने भरले आहे.   
 24 सर्वात दुष्ट राष्ट्रांना मी आणेन  
जे त्यांच्या घरांचा ताबा घेतील.  
बलवानाच्या गर्वाचा मी शेवट करेन,  
आणि त्यांची पवित्रस्थाने भ्रष्ट होतील.   
 25 जेव्हा आतंक येतो,  
ते व्यर्थच शांतीचा शोध करतील.   
 26 विपत्तीनंतर विपत्ती,  
आणि अफवांवर अफवा येतील.  
संदेष्ट्याकडून दृष्टान्ताचा शोध करतील,  
नियमशास्त्रातील याजकीय सूचना थांबतील,  
वडील लोकांच्या बोधप्रद मसलतीचा शेवट होईल.   
 27 राजा शोक करेल,  
राजकुमार निराशेची वस्त्रे पांघरेल,  
आणि देशातील लोकांचे हात थरथर कापतील.  
त्यांच्या कृत्यांनुसार मी त्यांच्याशी वागेन,  
आणि त्यांच्या स्वतःच्या मापानुसार मी त्यांचा न्याय करेन.  
“ ‘तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”