15
यरुशलेम एका निरुपयोगी द्राक्षवेलीसमान
1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले: 2 “मानवपुत्रा, द्राक्षवेलीचे लाकूड व वनातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये काय फरक आहे? 3 काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी तिचे लाकूड कधी घेतले गेले काय? वस्तू टांगून ठेवण्यासाठी लोक तिच्या खुंट्या बनवतात काय? 4 आणि जेव्हा तिला अग्नीत टाकले जाते व तिचे दोन्ही टोक जळून जातात आणि मधला भाग भस्म होतो, तेव्हा ते कोणत्या कामास योग्य असतात? 5 ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल?
6 “म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्या लोकांशी मी वागेन. 7 मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे. 8 ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”