18
जे पाप करतील ते मरतील 
  1 याहवेहचे वचन माझ्याकडे आले:   2 “याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही इस्राएल देशात ही म्हण वापरता:  
“ ‘आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली,  
आणि लेकरांचे दात आंबले’?   
 3 “सार्वभौम याहवेह जाहीर करतात, माझ्या जिवाची शपथ यापुढे तुम्ही इस्राएलमध्ये या म्हणीचा उपयोग करणार नाही.   4 कारण सर्वजण माझे आहेत, आईवडील व लेकरे; दोघेही एकसारखे माझेच आहेत. जे पाप करतील तेच मरतील.   
 5 “समजा एक नीतिमान मनुष्य आहे  
जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.   
 6 तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही  
किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही.  
तो आपल्या शेजार्याच्या पत्नीला भ्रष्ट करीत नाही  
किंवा मासिक पाळीच्या वेळी स्त्रीबरोबर लैंगिक संबंध करीत नाही.   
 7 तो कोणावर अत्याचार करीत नाही,  
तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो.  
जो लुटत नाही  
तर आपले अन्न भुकेल्यांस देतो  
आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.   
 8 व्याजावर कोणाला उसने देत नाही  
त्यांच्याकडून आपला नफा करून घेत नाही.  
वाईट करण्यापासून आपला हात आवरतो  
आणि दोन गटांमधील न्याय सत्याने करतो.   
 9 तो माझे विधी पाळतो  
आणि विश्वासूपणे माझे नियम राखतो.  
तो मनुष्य*तो मनुष्य म्हणजेच ते स्त्रियांना सुद्धा लागू होते न्यायी आहे;  
तो निश्चित जगेल,  
असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.   
 10 “समजा त्याच मनुष्याचा एक हिंसक मुलगा आहे, जो रक्तपात किंवा त्यासारख्या इतर गोष्टी†किंवा आपल्या भावास करतो   11 (जरी त्याच्या पित्याने त्यापैकी एकही केले नव्हते):  
“तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खातो.  
तो आपल्या शेजार्याची पत्नी भ्रष्ट करतो.   
 12 गरीब व गरजवंतावर तो अत्याचार करतो.  
तो इतरांना लुटतो.  
उसने देताना घेतलेले गहाण परत करीत नाही.  
तो मूर्तींकडे आपली नजर लावतो.  
तो अमंगळ कृत्ये करतो.   
 13 तो व्याजाने उसने देतो आणि नफा घेतो.  
असा मनुष्य जगेल काय? तो जगणार नाही! कारण त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत, तो मारला जाईल; आणि त्याचे रक्त त्याच्याच माथ्यावर राहील.   
 14 “परंतु समजा, या मनुष्याला एक मुलगा आहे जो आपला पिता करीत असलेली ही सर्व पापे पाहतो आणि जरी तो पाहतो, तरी त्या गोष्टी तो स्वतः करीत नाही:   
 15 “तो डोंगरावरील पूजास्थानातील प्रसाद खात नाही  
किंवा इस्राएलच्या मूर्तींकडे पाहत नाही.  
तो आपल्या शेजार्याची पत्नी भ्रष्ट करीत नाही.   
 16 तो कोणावर अत्याचार करीत नाही  
किंवा उसने देण्यासाठी गहाण ठेवून घेत नाही.  
तो लुटत नाही  
तर भुकेल्याला आपले अन्न देतो  
आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.   
 17 तो गरिबांचे वाईट करण्यापासून आपला हात आवरतो  
आणि त्यांच्याकडून व्याज किंवा नफा घेत नाही.  
तो माझे नियम आचरतो व माझे विधी पाळतो.  
तो आपल्या पित्याच्या पापासाठी मरणार नाही; तर तो खचितच जगेल.   18 पण त्याचा पिता स्वतःच्या पापामुळे मरेल, कारण त्याने फसवणूक केली, आपल्या भावाला लुटले आणि जे चुकीचे ते आपल्या लोकांत केले.   
 19 “तरीही तुम्ही विचारता, ‘मुलगा आपल्या पित्याचा दोष का वाहत नाही?’ मुलाने जे सरळ व योग्य ते केले व काळजीपूर्वक माझे सर्व विधी आचरले, म्हणून तो खचितच जगेल.   20 जो पाप करतो तोच मरेल. आपल्या आईवडिलांचा दोष त्यांची संतती वाहणार नाही किंवा आईवडील आपल्या संततीचा दोष वाहणार नाहीत. नीतिमानाचे नीतिमत्व त्यांच्यासाठी मोजले जाईल आणि दुष्टाची दुष्टता त्यांच्याविरुद्ध मोजली जाईल.   
 21 “पण जर एखादा दुष्ट मनुष्य त्याने केलेल्या सर्व पापांपासून मागे फिरला आणि माझ्या सर्व विधींचे पालन केले आणि जे न्याय्य व योग्य ते केले, तो व्यक्ती खचित जगेल; तो मरणार नाही.   22 पूर्वी केलेल्या कोणत्याही पापांची त्याच्याविरुद्ध आठवण केली जाणार नाही. जी नीतिमान कृत्ये त्याने केली आहे त्यामुळे तो खचितच जगेल.   23 दुष्टाच्या मरणात मी आनंद पावतो काय? परंतु आपल्या मार्गापासून वळून ते जीवन जगतात त्यात मी संतुष्ट नाही काय? असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.   
 24 “परंतु जर कोणी नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतील आणि त्यांनी दुष्ट व्यक्तीसारखे पाप करून अमंगळ कृत्ये केली, तर ते जगतील काय? त्या व्यक्तीने केलेली कोणतीही नीतीची कृत्ये आठवली जाणार नाहीत. अविश्वासूपणामुळे ते दोषी आहेत आणि त्यांनी केलेल्या पापामुळे, ते मरतील.   
 25 “तरीही तुम्ही म्हणता: ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकांनो ऐका: माझा मार्ग अन्यायी आहे काय? जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?   26 जर कोणी नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्तेपासून वळतात आणि पाप करतात, त्यामुळे ते मरतील; जे पाप त्यांनी केले आहे, त्यामुळे ते मरतील.   27 परंतु जर एखादा दुष्ट व्यक्ती त्यांनी केलेल्या दुष्टाईपासून वळेल आणि जे न्याययुक्त व योग्य ते करेल, तर ते त्याचा जीव वाचवेल.   28 त्याने केलेली आपली सर्व पापे लक्षात आणून त्यापासून तो वळला, म्हणून ती व्यक्ती खचितच वाचेल; आणि मरणार नाही.   29 तरीही इस्राएल लोक म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग न्यायाचा नाही.’ अहो इस्राएल लोकहो, जे अन्यायी मार्ग आहेत ते तुमचेच नाहीत काय?   
 30 “म्हणून, सार्वभौम याहवेह जाहीर करतात, तुम्ही अहो इस्राएल लोकहो, मी तुम्हा प्रत्येकाचा तुमच्या स्वतःच्या कृत्यांनुसार न्याय करेन. पश्चात्ताप करा! तुमच्या सर्व पापांपासून दूर वळा; म्हणजे तुमचे पाप तुमच्या पतनाचे कारण होणार नाही.   31 तुम्ही केलेले सर्व अपराध दूर टाकून द्या आणि नवीन हृदय व नवीन आत्मा घ्या. इस्राएल लोकहो, तुम्ही का मरावे?   32 कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!