27
सोरसाठी विलापगीत
याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “मानवपुत्रा, सोरसाठी विलाप कर. सोरला सांग, तू जी समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेली, अनेक समुद्रतटावर लोकांशी व्यापार करणारी, ‘त्या तुझ्याविषयी सार्वभौम याहवेह म्हणतात:
“ ‘अगे सोर, तू म्हणतेस,
“मी सौंदर्याने परिपूर्ण आहे.”
उंच समुद्रांवर तुझे राज्य होते;
तुला बांधणार्‍यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.
त्यांनी तुझ्या फळ्या
सनीरच्या*म्हणजेच हर्मोन पर्वत देवदारूच्या बनविल्या;
त्यांनी लबानोनचे गंधसरू घेतले
आणि डोलकाठी बनविली.
त्यांनी तुझी वल्ही
बाशानच्या एला झाडाची बनविली;
त्यांनी तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातील सुरूच्या लाकडाच्या बनविल्या
आणि त्यांना हस्तिदंताने सजविले.
तुझे शीड इजिप्तचे नक्षीदार रेशमी ताग होते
ते तुझा झेंडा होते;
तुझे छत एलिशाह द्वीपातील
निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे होते.
सीदोन व आरवदचे पुरुष तुझे वल्हेकरी होते;
हे सोर, तुझ्यातील कुशल लोक, जहाजावर तुझे खलाशी म्हणून होते.
गबालचेकिंवा त्याला बिब्लोसही म्हटले जात अनुभवी वडील
जहाजाची फूट दुरुस्ती करण्यास जहाजावर होते.
समुद्रावरील सर्व जहाजे व त्यांचे खलाशी
तुझ्या मालाचा व्यापार करण्यास तुझ्याजवळ आले.
 
10 “ ‘पर्शिया, लूद आणि पूत व कूशच्या माणसांनी
तुझ्या सैन्यात योद्धे म्हणून सेवा केली.
त्यांनी त्यांच्या ढाली व शिरटोप तुझ्या भिंतीवर टांगून
तुला वैभवी बनविले.
11 आरवद व हेलेकच्या माणसांनी
चहूकडून तुझ्या तटांचे रक्षण केले;
गम्मादचे पुरुष
तुझ्या बुरुजावर होते.
त्यांनी त्यांच्या ढाली तुझ्या भिंतींवर चोहीकडे टांगल्या;
त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णतेस आणले.
12 “ ‘तुझ्या महान संपत्तीमुळे तार्शीशने तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाच्या मोबदल्यात त्यांनी चांदी, लोखंड, कथील व शिसे दिली.
13 “ ‘ग्रीस, तूबाल व मेशेख यांनीही तुझ्याबरोबर व्यापार केला; त्यांनी तुझ्या मालाच्या मोबदल्यात मानवप्राणी व कास्याच्या वस्तू दिल्या.
14 “ ‘बेथ-तोगर्माहचे लोक तुझ्या मालाच्या मोबदल्यात स्वाराचे घोडे, युद्धाचे घोडे आणि खेचरे देत असत.
15 “ ‘ददानच्यामूळ प्रतींनुसार ह्रोदेस लोकांनी तुझ्याबरोबर व्यापार केला आणि पुष्कळ समुद्रतट तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला मोबदला म्हणून हस्तिदंत आणि टेंबुरणीचे लाकूड दिले.
16 “ ‘तुझ्याकडील पुष्कळ उत्पादनांमुळे अरामने§मूळ प्रतींनुसार एदोम तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला नीलमणी, जांभळ्या तागाचे कापड, नक्षीकाम केलेले कापड, बारीक सूत, प्रवाळ व माणके दिली.
17 “ ‘यहूदाह व इस्राएलने तुझ्याबरोबर व्यापार केला; आणि तुझ्या मालाचे वेतन म्हणून त्यांनी तुला मिन्नीथचा गहू व मेवा, मध, जैतुनाचे तेल आणि मलम दिले.
18 “ ‘तुझ्या पुष्कळ उत्पादनांमुळे व महान संपत्तीमुळे दिमिष्कने तुझ्याबरोबर व्यापार केला. त्यांनी तुला हेल्बोनचा द्राक्षारस व झहारची लोकर 19 आणि यावान*वदान येथील खास घडविलेले लोखंड, दालचिनी व वेत या तुझ्या मालाबद्दल इझालच्या द्राक्षारसाची पिंपे त्यांनी तुला देऊ केली.
20 “ ‘ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला घोड्यावर पसरविण्यासाठी खोगीर देत असे.
21 “ ‘अरबी लोक व केदारचे सर्व राजपुत्र तुझे ग्राहक होते; त्यांनी तुला कोकरे, एडके व बोकडे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.
22 “ ‘शबा आणि रामाहच्या व्यापारांनी तुझ्याबरोबर व्यापार केला; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून त्यांनी तुला सर्वप्रकारचे उत्तम मसाले, मोलवान रत्ने व सोने दिले.
23 “ ‘हारान, कन्नेह आणि एदेन व शबा, अश्शूर व किलमाद येथील व्यापार्‍यांनी तुझ्याबरोबर व्यापार केला. 24 तुझ्या बाजारपेठेत त्यांनी सुंदर वस्त्रे, निळे कापड, नक्षीदार काम व दोर्‍यांनी वळवून घट्ट गाठ बांधलेले वेगवेगळ्या रंगाचे गालिचे देऊन तुझ्याबरोबर व्यापार केला.
25 “ ‘तार्शीशची जहाजे तुझा माल वाहून
तुझी सेवा करीत असत.
तू समुद्रावर प्रवास करीत असता
तू मालाने भरलेली असे.
26 तुझ्या वल्हेकर्‍यांनी
तुला खोल समुद्रात आणले.
परंतु त्या खोल समुद्रामध्ये
पूर्वेकडील वारा तुझे तुकडे करेल.
27 तुझी संपत्ती, माल व व्यापारी माल,
तुझे नावाडी, खलाशी व जहाज दुरुस्ती करणारे,
तुझे व्यापारी व तुझे सर्व सैनिक,
आणि ज्या दिवशी तुझे जहाज फुटेल
तेव्हा जहाजात असलेली प्रत्येक व्यक्ती
समुद्राच्या मधोमध बुडून जातील.
28 जेव्हा तुझे खलाशी मोठ्याने रडतील
तेव्हा समुद्रतटाचा कंप होईल.
29 सर्व वल्हेकरी
जहाज टाकून देतील;
नावाडी आणि सर्व खलाशी
किनार्‍यावर उभे राहतील.
30 आपला आवाज उंच करून
तुझ्यासाठी हेल काढून रडतील;
ते आपल्या डोक्यावर धूळ उडवतील
व राखेत लोळतील.
31 तुझ्यासाठी ते आपली डोकी मुंडून
गोणपाट नेसतील.
ते आपल्या जिवाच्या आकांताने व अति शोकाने
तुझ्यासाठी रडतील.
32 ते तुझ्यासाठी विलाप व शोक करीत असता,
ते तुझ्यासाठी विलापगीत गातील:
“सोर, जी समुद्रात निःशब्द झाली,
तिच्याप्रमाणे अजून कोण आहे?”
33 जेव्हा तुझा माल समुद्रावरून जात असे,
तेव्हा तू पुष्कळ राष्ट्रांना संतुष्ट केले;
तुझ्या महान संपत्ती व मालाने
पृथ्वीवरील राजांना तू समृद्ध केलेस.
34 आता तू समुद्राकडून
पाण्याच्या खोलीमध्ये तुटून गेली आहेस;
तुझा माल व तुझे साथीदार
तुझ्याबरोबर खाली बुडले आहेत.
35 समुद्रतटावर वसलेले
तुला पाहून घाबरून जातात;
त्यांचे राजे भीतीने कापतात
आणि त्यांचे चेहरे भयाने काळवंडले आहेत.
36 राष्ट्रांचे व्यापारी तुझा धिक्कार करतात;
तुझा भयंकर अंत झाला आहे
आणि तुझे अस्तित्वच नाहीसे होणार आहे.’ ”

*27:5 म्हणजेच हर्मोन पर्वत

27:9 किंवा त्याला बिब्लोसही म्हटले जात

27:15 मूळ प्रतींनुसार ह्रोदेस

§27:16 मूळ प्रतींनुसार एदोम

*27:19 वदान