48
भूमीची विभागणी
1 “यादीत दिलेल्या गोत्रांची नावे ही:
“उत्तरेकडील सीमेपासून दानला एक भाग असेल; तो हेथलोन मार्गापासून लेबो हमाथ, हाजार-एनानपर्यंत आणि हमाथ आणि हमाथनंतरची दिमिष्काची उत्तरेकडील सीमा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत.
2 दानच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा आशेरचा एक भाग असेल.
3 आशेरच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा नफतालीचा एक भाग असेल.
4 नफतालीच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत मनश्शेहचा एक भाग असेल.
5 मनश्शेहच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एफ्राईमचा एक भाग असेल.
6 एफ्राईमच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रऊबेनचा एक भाग असेल.
7 रऊबेनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत यहूदाहचा एक भाग असेल.
8 “यहूदीयाच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भाग तू विशेष भेट म्हणून द्यावा. तो पंचवीस हजार हात*म्हणजे 13 कि.मी. रुंद, आणि त्याची लांबी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत इतर गोत्रांना दिलेल्या भागासमान असावी; त्याच्या मधोमध पवित्रस्थान असेल.
9 “जो विशेष भाग तू याहवेहस अर्पण करावयाचा आहे, तो पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात†म्हणजे 5.3 कि.मी. रुंद असावा. 10 याजकांसाठी हा पवित्र भाग असणार. उत्तरेस त्याची लांबी पंचवीस हजार हात, पश्चिमेकडून रुंदी दहा हजार हात, पूर्वेकडून रुंदी दहा हजार हात आणि दक्षिणेकडून लांबी पंचवीस हजार हात. त्याच्या मधोमध याहवेहचे पवित्रस्थान असावे. 11 सादोकाच्या संतानातील पवित्र केलेले याजक, जे माझी सेवा करण्यात विश्वासू होते आणि जेव्हा इस्राएली लोक बहकून गेले, तेव्हा जसे लेवी लोक बहकले, तसे ते बहकले नाही. 12 देशाच्या पवित्र भागातून त्यांच्यासाठी ही एक विशेष भेट असेल, तो लेवी लोकांच्या सीमेला लागून आहे.
13 “याजकांच्या सीमेस लागून लेवी लोकांसाठी पंचवीस हजार हात लांबीचा व दहा हजार हात रुंदीचा प्रदेश द्यावा. त्याची एकूण लांबी पंचवीस हजार हात आणि रुंदी दहा हजार हात असावी. 14 त्यातील काहीही त्यांनी विकू नये किंवा बदलू नये. ही सर्वोत्तम भूमी आहे ती दुसर्या कोणाच्या हाती जाऊ देऊ नये, कारण ती याहवेहसाठी पवित्र आहे.
15 “उरलेला विभाग, जो पाच हजार हात‡म्हणजे 2.7 कि.मी. रुंदीचा आणि पंचवीस हजार हात लांबीचा आहे, तो शहराच्या सर्वसाधारण उपयोगासाठी म्हणजेच घरे आणि कुरणे यासाठी असेल. त्याच्या मधोमध शहर वसणार 16 आणि त्याचे माप असे असावे: उत्तरेची बाजू चार हजार पाचशे हात,§म्हणजे सुमारे 2.4 कि.मी. दक्षिणेची बाजू चार हजार पाचशे हात आणि पश्चिमेची बाजू चार हजार पाचशे हात. 17 शहराचे कुरण उत्तरेकडे दोनशे पन्नास हात*म्हणजे 135 मीटर दक्षिणेकडे दोनशे पन्नास हात पूर्वेकडे दोनशे पन्नास हात व पश्चिमेकडे दोनशे पन्नास हात असावे. 18 पवित्र भागाच्या सीमेला लागून जो उरलेला भाग जो त्याच्याच लांबीचा आहे, तो पूर्वेकडून दहा हजार हात आणि पश्चिमेकडून दहा हजार हात आहे. त्या भूमीचे उत्पन्न शहरातील काम करणार्यांसाठी अन्न होईल. 19 शहरातील शेतीकाम करणारे कामकरी इस्राएलच्या सर्व गोत्रातील असतील. 20 तो संपूर्ण भाग चौरस असून प्रत्येक बाजूने पंचवीस हजार हात असेल. एक विशेष भेट म्हणून हा पवित्र भाग शहराच्या मालमत्तेपासून वेगळा ठेवावा.
21 “पवित्र भागाच्या दोन्ही बाजूला जो उरलेला भाग आहे तो आणि शहराची मालमत्ता राजपुत्राच्या हक्काची असेल. पवित्र भागाच्या पंचवीस हजार हाताच्या पूर्वेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत आणि पंचवीस हजार हाताच्या पश्चिमेपासून पश्चिमेच्या सीमेपर्यंत वाढेल. हे दोन्ही भाग जे इस्राएलच्या गोत्रांच्या भागाच्या लांबीइतकेच आहे, ते राजपुत्राच्या हक्काचे होतील आणि मंदिराच्या पवित्रस्थानासहित पवित्र भाग या सर्वांच्या मधोमध असावे. 22 याप्रकारे लेवी लोकांची मालमत्ता आणि शहराची मालमत्ता राजपुत्राच्या विभागाच्या मधोमध असेल. राजपुत्राचा भाग यहूदाहची सीमा व बिन्यामीनची सीमा यामध्ये असणार.
23 “बाकीच्या गोत्रांसाठी:
“पूर्वेच्या बाजूपासून पश्चिमेकडे जाणारा एक भाग बिन्यामीनचा.
24 बिन्यामीनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग शिमओनचा.
25 शिमओनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग इस्साखारचा.
26 इस्साखारच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग जबुलूनचा.
27 जबुलूनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग गादचा असणार.
28 गादची दक्षिणेकडील वतनाची सीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत जाईल.
29 “हा देश तू इस्राएलच्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून द्यावे, आणि हे त्यांचे भाग असतील,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
नवीन शहराची द्वारे
30 “शहरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे असतील:
“उत्तरेकडील सुरुवात जी चार हजार पाचशे हात लांब आहे, 31 शहराची द्वारे इस्राएल गोत्रांच्या नावानुसार असतील. उत्तरेकडील तीन द्वारे असतीलः रऊबेनचे द्वार, यहूदाहचे द्वार आणि लेवीचे द्वार असणार.
32 पूर्वेची बाजू जी चार हजार पाचशे हात लांब आहे, तिथे तीन द्वारे असतील: योसेफाचे द्वार, बिन्यामीनचे द्वार आणि दानचे द्वार.
33 दक्षिणेची बाजू जिचे माप चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: शिमओनचे द्वार, इस्साखारचे द्वार आणि जबुलूनचे द्वार.
34 पश्चिमेची बाजू जिची लांबी चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: गादचे द्वार, आशेरचे द्वार आणि नफतालीचे द्वार.
35 “चोहीकडील अंतर अठरा हजार हात†म्हणजे 9.5 कि.मी. असणार.
“आणि त्या काळापासून शहराचे नाव, ‘याहवेह-शाम्माह’‡अर्थात् याहवेह तिथे आहे असे असणार.”