13
अब्राम आणि लोट विभक्त होतात
अशा रीतीने अब्रामाने आपली पत्नी, सर्व संपत्ती आणि लोटाला घेऊन इजिप्त देश सोडला आणि ते नेगेव, म्हणजे दक्षिण, येथे पोहोचले. अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता.
नंतर ते नेगेवहून बेथेलच्या रोखाने उत्तरेकडे गेले. बेथेल व आय यांच्यामध्ये त्यांनी पूर्वी तळ दिला होता व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली.
आता लोट, जो अब्रामासह फिरत होता, त्याच्याजवळही मेंढरे, गुरे आणि डेरे होते. परंतु ते एकत्र राहत असताना ती जमीन त्यांना पुरेशी होऊ शकत नव्हती, कारण त्यांची संपत्ती इतकी मोठी होती की ते एकत्र राहू शकत नव्हते. कनानी व परिज्जी हे लोक देखील तिथे राहत होते. अब्राम व लोट यांच्या गुराख्यामध्ये भांडणे होऊ लागली.
तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत. तुझ्यापुढे संपूर्ण देश नाही काय? आपण विभक्त होऊ या. जर तू डावीकडे गेला तर मी उजवीकडे जाईन आणि जर तू उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईन.”
10 तेव्हा लोटाने आपली नजर सभोवार फिरविली आणि यार्देन नदीकडील सोअरकडे पाहिले की भरपूर पाणी असलेले, याहवेहच्या बागेसारखे आणि इजिप्त देशासारखे ठिकाण होते. (ही घटना याहवेहने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधीची आहे.) 11 मग लोटाने यार्देनेची सगळी तळवट निवडली आणि तो पूर्वेकडे निघाला. अशा रीतीने लोट व अब्राम विभक्त झाले. 12 अब्राम कनान देशात राहिला आणि लोटाने यार्देनेच्या पूर्वतीरावरील तळवटीतील शहरांमध्ये मुक्काम करीत सदोम शहरापाशी तळ दिला. 13 सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते.
14 लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक. 15 जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन. 16 मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल. 17 आणि मी जो देश तुला देणार आहे, त्याच्या लांबी व रुंदीपर्यंत चालत जा.”
18 मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.