25
अब्राहामाचा मृत्यू
अब्राहामाने दुसरी पत्नी केली होती, तिचे नाव केटूराह होते. तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले. योक्षान हा शबा आणि ददान यांचा पिता; अश्शूरी, लटूशी आणि लऊमी हे ददानाचे गोत्र होते. एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.
अब्राहामाने आपली सर्व मालमत्ता इसहाकाच्या नावावर केली. परंतु अब्राहाम जिवंत असताना त्याने आपल्या दासीपुत्रांनाही देणग्या दिल्या आणि त्याने त्यांना इसहाकापासून दूर, पूर्वेकडे पाठवून दिले.
अब्राहाम एकशे पंचाहत्तर वर्षे जगला. मग अब्राहामाने अखेरचा श्वास घेतला आणि एका वृद्धावस्थेत, परिपूर्ण वयाचा होऊन मरण पावला; आणि मग तो त्याच्या लोकांना जाऊन मिळाला. त्याची मुले इसहाक आणि इश्माएल यांनी त्याला मम्रेजवळील मकपेलाच्या गुहेत, जोहर हिथीचा मुलगा एफ्रोनच्या शेतात पुरले, 10 हे अब्राहामाने हेथच्या लोकांकडून विकत घेतलेले शेत. तिथे अब्राहामाला त्याची पत्नी साराहजवळ मूठमाती देण्यात आली. 11 अब्राहामाच्या मृत्यूनंतर परमेश्वराने इसहाकाला आशीर्वाद दिला, जो नंतर बएर-लहाई-रोई या ठिकाणी राहवयास गेला.
इश्माएलाचे गोत्र
12 ही अब्राहामाचा पुत्र इश्माएलची वंशावळ आहे, जो साराहची इजिप्तमधील दासी हागारेपासून जन्मला.
 
13 ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी:
 
इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ,
नंतर केदार, अदबील, मिबसाम,
14 मिश्मा, दूमाह, मस्सा,
15 हदद, तेमा, यतूर,
नापीश आणि केदमाह.
 
16 हे इश्माएलाचे पुत्र होते आणि त्यांच्या गावांवरून आणि छावण्यांनुसार हे बारा वंशाचे प्रधान झाले.
 
17 इश्माएल एकशे सदतीस वर्षे जगला. त्याने आपला शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला आणि तो आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला. 18 त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले. हा देश इजिप्त देशाच्या सीमेवर अश्शूरच्या बाजूला आहे. ते एकमेकांशी वैराभावाने*किंवा त्यांच्या पूर्व दिशेकडे राहत होते.
याकोब व एसाव
19 अब्राहामाचा मुलगा इसहाक याची वंशावळ अशी आहे:
 
अब्राहाम हा इसहाकाचा पिता झाला, 20 जेव्हा इसहाकाने रिबेकाहशी विवाह केला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता. रिबेकाह पद्दन-अराम येथील अरामी बेथुएलाची कन्या आणि लाबानाची बहीण होती.
21 इसहाकाने याहवेहची प्रार्थना करून रिबेकाहला मूल देण्याची विनंती केली, कारण तिला मूल नव्हते. याहवेहने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची पत्नी रिबेकाह गर्भवती झाली. 22 तिच्या उदरात मुले एकमेकांशी भांडू लागली. तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” आणि याबाबत तिने याहवेहकडे विचारणा केली.
23 याहवेहने तिला सांगितले,
“तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत,
तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील;
एकजण दुसर्‍यापेक्षा बलवान होईल,
मोठा लहान्याची सेवा करेल.”
24 तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला तेव्हा पाहा, तिला जुळे पुत्र झाले. 25 पहिल्यांदा जन्मलेला तांबूस रंगाच्या केसांनी इतका व्यापलेला होता की, त्याने केसांचा झगाच घातला आहे असे वाटत होते; म्हणून त्यांनी त्याचे नाव एसावम्हणजे केसाळ असे ठेवले. 26 मग जुळ्यातील दुसरा पुत्र जन्मला. त्याचा हात एसावाच्या टाचेवर होता म्हणून त्यांनी त्याचे नाव याकोबम्हणजे फसविणारा असे ठेवले. जेव्हा रिबेकाहने यांना जन्म दिला, तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
27 हळूहळू ती मुले वाढली. एसाव एक तरबेज शिकारी झाला, खुल्या मैदानातील फिरणारा मनुष्य होता, पण याकोब तसा शांत स्वभावाचा असून त्याला तंबूतच राहण्यास आवडे. 28 इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता.
29 एकदा याकोब वरण शिजवित असताना एसाव शिकारीहून खूप थकूनभागून आला. 30 तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम§म्हणजे तांबडा असेही म्हणतात.)
31 याकोबाने उत्तर दिले, “प्रथम तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे.”
32 एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?”
33 परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
34 तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला.
अशा रीतीने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला.

*25:18 किंवा त्यांच्या पूर्व दिशेकडे

25:25 म्हणजे केसाळ

25:26 म्हणजे फसविणारा

§25:30 म्हणजे तांबडा