33
याकोब आणि एसाव यांची भेट
1 नंतर दूर अंतरावरून एसाव आपल्या चारशे माणसांबरोबर येत आहे असे याकोबाने पाहिले, तेव्हा त्याने लेआ व राहेल व दोघी दासी यांच्याजवळ मुले वाटून दिली. 2 सर्वात पुढे त्याने आपल्या दासी आणि त्यांची मुले; त्यांच्यामागे लेआ व तिची मुले आणि त्यांच्यानंतर राहेल व योसेफ अशा रीतीने त्यांना ठेवले. 3 तो स्वतः सर्वांच्या पुढे चालला आणि आपल्या भावाजवळ जाऊन पोहोचेपर्यंत त्याने त्याला भूमीपर्यंत लवून सात वेळा मुजरा केला.
4 एसाव हा याकोबास भेटण्यास धावत आला; त्याने त्याला आलिंगन दिले; त्याला कवेत घेऊन त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले. 5 एसावाने दृष्टी वर करून त्या स्त्रिया व मुलांकडे पाहिले तेव्हा त्याने विचारले, “तुजबरोबर हे लोक कोण आहेत?”
याकोब म्हणाला, “परमेश्वराने कृपा करून तुमच्या दासाला दिलेली ही माझी मुले आहेत.”
6 तेव्हा याकोबाच्या दासी आणि त्यांची मुले पुढे आली आणि त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला. 7 त्यानंतर लेआ व तिची मुले आली, शेवटी राहेल आणि योसेफ पुढे आली. त्यांनीही त्याला लवून नमस्कार केला.
8 एसावाने विचारले, “जी गुरे व कळप मला भेटले त्याचा उद्देश काय आहे?”
याकोब म्हणाला, “माझ्या धन्या, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावावे म्हणून.”
9 यावर एसाव म्हणाला, “भाऊ, माझ्याजवळ भरपूर आहे; तुझे आहे ते तुलाच राहू दे.”
10 “नाही, नाही!” याकोब म्हणाला, “जर तुमची माझ्यावर कृपा झाली असल्यास या भेटींचा तुम्ही स्वीकार करा. कारण तुम्ही आता मला स्वीकारले आहे म्हणून तुमचे मुख बघून परमेश्वराचे मुख बघितल्यासारखे वाटते. 11 माझ्या देणग्यांचा कृपया स्वीकार करा, कारण परमेश्वराने माझ्यावर दया केली आहे आणि त्यांनी मला सर्वकाही भरपूर दिले आहे.” याकोबाने फारच आग्रह केल्यामुळे एसावाने शेवटी त्या भेटींचा स्वीकार केला.
12 मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आता आपण वाटेस लागून पुढे जाऊ या. मी तुझ्यासोबत चालतो.”
13 पण याकोब त्यास म्हणाला, “काही मुले फार लहान आहेत हे माझ्या स्वामीला दिसतच आहे आणि दूध पाजणार्या शेळ्या, मेंढ्या व गाई यांचेही मला पाहिले पाहिजे. त्यांना मी दिवसभर असेच हाकीत नेले तर ती जनावरे मरून जातील. 14 म्हणून मी माझ्या स्वामींना विनंती करतो की, आपण आपल्या सेवकापुढे जावे. आम्ही त्यांच्यामागे त्यांना चालवेल तसे हळूहळू चालत येऊन सेईर येथे तुम्हाला भेटू.”
15 मग एसाव म्हणाला, “माझी काही माणसे तुमच्याबरोबर ठेवू द्या.”
“पण हे का करावे?” याकोब म्हणाला, “माझ्या स्वामींची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे.”
16 तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरला परत जाण्यास निघाला. 17 दरम्यान याकोब सुक्कोथ येथे गेला. तिथे त्याने स्वतःसाठी तंबू आणि आपल्या गुरांसाठी निवारा बांधला. म्हणूनच त्या ठिकाणाला सुक्कोथ*सुक्कोथ म्हणचे आश्रय असे नाव पडले.
18 यानंतर याकोब पद्दन-अरामचा प्रवास पूर्ण करून कनान देशातील शेखेम नावाच्या शहरात सुखरुपपणे पोहोचला आणि शहराच्या बाहेर त्याने आपला तळ दिला. 19 जिथे त्याने तळ दिला होता तेथील जमिनीचा काही भाग त्याने शेखेमचा पिता हमोर याच्याकडून शंभर चांदीची नाणी†मूळ भाषेत केसिताह या पैशाचे वजन किंवा मोल अज्ञात आहे देऊन विकत घेतला. 20 मग तिथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव त्याने एल एलोहे इस्राएल‡अर्थात् इस्राएलचे पराक्रमी परमेश्वर असे ठेवले.