इब्री लोकांस पत्र
1
परमेश्वराचे अंतिम शब्द: त्यांचा पुत्र
भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले. पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलले आहेत व त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे. पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत. अशा रीतीने ते देवदूतांपेक्षा अतिश्रेष्ठ झाले आणि जे नाव त्यांना बहाल केले ते देवदूतांच्या नावांहून अतिश्रेष्ठ आहे.
पुत्र दूतांपेक्षा सर्वश्रेष्ठ
कारण परमेश्वराने असे कोणत्या देवदूताला कधी म्हटले,
“तू माझा पुत्र आहेस;
आज मी तुझा पिता झालो आहे”*स्तोत्र 2:7?
आणि पुन्हा एकदा,
“मी त्याचा पिता होईन,
आणि तो माझा पुत्र होणार”2 शमु 7:14; 1 इति 17:13?
आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवर आणतो आणि म्हणतो,
“परमेश्वराचे सर्व दूत त्याची उपासना करोत.”अनु 32:43
परमेश्वर ते आपल्या दूतांविषयी बोलताना म्हणतात,
“तो वायूला आपले दूत,
व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.”§स्तोत्र 104:4
पण आपल्या पुत्राविषयी ते म्हणतात,
“हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल;
न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.
नीतिमत्व तुम्हाला प्रिय असून दुष्टाईचा तुम्ही द्वेष केला आहे.
म्हणूनच परमेश्वराने, तुझ्या परमेश्वराने, हर्षाच्या तेलाने तुझा अभिषेक करून
तुझ्या सोबत्यांपेक्षा तुला अधिक उंच ठिकाणी स्थिर केले आहे.”*स्तोत्र 45:6,7
10 ते असेही म्हणाले,
“हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला,
आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.
11 ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल;
ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील.
12 तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार;
आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील.
परंतु तुम्ही निरंतर समान राहणार,
आणि तुमची वर्षे कधीही संपुष्टात येणार नाहीत.”स्तोत्र 102:25‑27
13 आणि परमेश्वराने आपल्या कोणत्या दूतांविषयी असे म्हटले,
“मी तुझ्या शत्रूंना
तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत
तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा”स्तोत्र 110:1?
14 कारण ज्यांना तारण मिळणार आहे, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व देवदूत म्हणजे सेवा करणारे म्हणून पाठविलेले आत्मे नाहीत काय?

*1:5 स्तोत्र 2:7

1:5 2 शमु 7:14; 1 इति 17:13

1:6 अनु 32:43

§1:7 स्तोत्र 104:4

*1:9 स्तोत्र 45:6,7

1:12 स्तोत्र 102:25‑27

1:13 स्तोत्र 110:1