3
येशू मोशेहून श्रेष्ठ 
  1 यास्तव, पवित्र बंधू आणि भगिनींनो, तुम्ही जे स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहात, ते तुम्ही आपले विचार येशूंवर केंद्रित करा, त्यांना आम्ही आमचा प्रेषित आणि महायाजक म्हणून कबूल करतो.   2 कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते.   3 कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्याला, घराला लाभणार्या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत.   4 कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, परंतु सर्वकाही बांधणारे परमेश्वर आहे.   5 जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”*गण 12:7   6 परंतु विश्वासू पुत्र म्हणून परमेश्वराच्या घरावर ख्रिस्ताची नेमणूक झाली होती. जर आपण खरोखर आपला विश्वास आणि गौरवाची आशा शेवटपर्यंत टिकवून ठेवली तर आपण त्यांचे घर आहोत.   
अविश्वासाबद्दल इशारे 
  7 ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो:  
“आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,   
 8 तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका,  
जशी रानात परीक्षा होत असताना  
तुम्ही बंडखोरी केली होती.   
 9 जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती  
तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.   
 10 आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो;  
मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत,  
आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.   
 11 मी रागाने शपथ घेतली की,  
ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”†स्तोत्र 95:7‑11   
 12 बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा.   13 अद्यापि “आज” म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही.   14 जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तर ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभाग आहे.   15 ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे:  
“आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,  
तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली,  
तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”‡स्तोत्र 95:7, 8   
 16 ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का?   17 आणि चाळीस वर्षे ते कोणावर रागावले होते? तेच लोक होते ना ज्यांनी पाप केले आणि परिणामी त्यांचे शरीरे रानात विनाश पावली?   18 ते त्यांच्या विसाव्यात केव्हाही येणार नाहीत असे परमेश्वराने शपथ वाहून म्हटले, ते ज्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत, त्यांना नाही तर कोणाला बोलत होते?   19 आणि त्यांच्या अविश्वासूपणामुळे ते प्रवेश करू शकले नाहीत.