5
 1 प्रत्येक महायाजक परमेश्वर विषयक गोष्टींबाबत लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व पापांसाठी देणग्या आणि यज्ञे अर्पण करण्यासाठी निवडला जातो.   2 तो स्वतः निर्बलतेच्या अधीन असल्यामुळे अज्ञानी व भटकलेल्या लोकांबरोबर सौम्यतेने वागू शकतो.   3 या कारणासाठीच त्याला स्वतःच्या पापांसाठी आणि लोकांच्या पापांसाठी यज्ञ करावा लागत असे.   4 आणि कोणीही हा सन्मान स्वतःहून घेऊ शकत नाही, ज्यांना परमेश्वराने अहरोनासारखे पाचारण केले आहे त्यांनाच तो प्राप्त होतो.   
 5 त्याच प्रकारे ख्रिस्तानेही स्वतःला महायाजक होण्यासाठी गौरविले नाही. परंतु परमेश्वर त्याला म्हणाले,  
“तू माझा पुत्र आहे;  
आज मी तुझा पिता झालो आहे.”*स्तोत्र 2:7   
 6 आणखी दुसर्या ठिकाणी ते असे म्हणाले,  
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे  
तू सदासर्वकाळचा याजक आहे.”†स्तोत्र 110:4   
 7 येशू त्या दिवसात पृथ्वीवर देहामध्ये असताना, स्वतःला मृत्यूपासून वाचविण्यास जे समर्थ आहेत, त्यांच्याजवळ त्यांनी अश्रू गाळीत आणि आत्म्यात मोठ्या आक्रोशाने विनवणी करीत प्रार्थना केली आणि त्यांची प्रार्थना त्याच्या आदरयुक्त अधीनतेमुळे ऐकण्यात आली.   8 ते पुत्र होते, तरी त्यांनी सोसलेल्या दुःख सहनाद्वारे ते आज्ञापालन शिकले.   9 आणि परिपूर्ण केल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानणार्या सर्वांचे अनंतकाळचे तारणकर्ता झाले,   10 आणि परमेश्वराद्वारे मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे महायाजक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.   
मार्गभ्रष्ट न होण्याबाबत इशारा 
  11 याबाबतीत आम्हाला खूप सांगावेसे वाटते, परंतु हे तुम्हाला स्पष्ट करून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही.   12 वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे!   13 आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाच्या शिक्षणाविषयी अपरिचित आहे.   14 परंतु जड अन्नाचे सेवन परिपक्वांसाठी असते, जे सतत योग्य व अयोग्य यामधील फरक समजण्याचा सराव करून स्वतःला प्रशिक्षित करतात.