12
यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे. ज्यांनी आपणाविरुद्ध पाप करणार्‍यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा म्हणजे तुम्ही थकून न जाता तुमच्या मनांचा धीर सुटणार नाही.
परमेश्वर आपल्या लेकरांना शिस्त लावतात
पापाविरुद्ध तुमच्या संघर्षात, तुम्ही रक्त सांडेपर्यंत पापाशी झगडला नाही. आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले,
“माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस,
त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस,
कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात,
आणि ज्या प्रत्येकाला पुत्र म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात.”*नीती 3:11, 12
तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत. आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे! 10 त्यांनी थोडे दिवस त्यांना योग्य वाटली तशी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. 11 कोणतीही शिस्त तत्काली आनंदाची वाटत नाही, परंतु दुःखाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून प्रशिक्षण मिळाले आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्वाचे शांतिकारक फळ देते.
12 यास्तव, आपले गळणारे हात व निर्बल गुडघे सशक्त करा. 13 “आणि तुमच्या पावलांसाठी मार्ग सरळ करा,”नीती 4:26 म्हणजे लंगडे पडून अपंग होणार नाही, उलट बरे होतील.
सतर्कतेचा इशारा व प्रोत्साहन
14 सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व पवित्र होण्याचा झटून प्रयत्न करा; पवित्रतेशिवाय कोणीही प्रभूला पाहू शकत नाही. 15 परमेश्वराच्या कृपेला कोणी उणे पडू नये, व ज्यामुळे पुष्कळजण अशुद्ध व त्रास देणारे होतील असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊ नये, या विषयी दक्ष राहा. 16 कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपल्या ज्येष्ठत्वाच्या वतनाचा हक्क विकला, त्या एसावासारखे अनीतिमान होऊ नये, म्हणून लक्ष द्या. 17 तुम्हाला माहीत आहे की, त्यानंतर तो हा ज्येष्ठत्वाचा आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असतानाही त्याचा नकार झाला; त्याने जरी अश्रू ढाळून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी जे काही त्याने केले होते ते त्याला बदलता आले नाही.
भयाचा पर्वत आणि हर्षाचा पर्वत
18 पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही. 19 तिथे रणशिंगाचा इतका भयावह नाद झाला व भयप्रद संदेश देणारी एक वाणी ऐकू आली की लोकांनी परमेश्वराला त्यांचे बोलणे थांबविण्याची याचना केली.निर्ग 19:16‑25; 20:18‑20 पाहावे 20 “एखाद्या पशूने त्या पर्वताला स्पर्श केला, तर त्याला मरेपर्यंत धोंडमार करावी,”§निर्ग 19:12, 13 ही परमेश्वराची आज्ञा त्यांच्या सहनशक्ती पलीकडे होती. 21 स्वतः मोशे देखील ते दृश्य पाहून इतका घाबरला की तो म्हणाला, “मी भीतीने थरथर कापत आहे.”*अनु 9:19
22 परंतु तुम्ही सीयोन पर्वतावर, जिवंत परमेश्वराच्या शहरात, स्वर्गीय यरुशलेमात आणि असंख्य देवदूतांच्या आनंदी संमेलनात आला आहात. 23 मंडळीतील प्रथम जन्मलेले, ज्यांची नावे स्वर्गात नोंदलेली आहेत त्या मंडळीत तुम्ही आला आहात. सर्वांचा न्याय करणाऱ्या परमेश्वराजवळ, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांच्या आत्म्याजवळ तुम्ही आला आहात. 24 तुम्ही येशूंजवळ, जे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत आणि हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम वचन बोलणार्‍या, त्या शिंपडलेल्या रक्ताजवळ आला आहात.
25 तुमच्याशी जे बोलत आहेत, त्यांच्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळा. कारण जगातील संदेश देणार्‍याची आज्ञा न पाळल्यामुळे इस्राएली लोकांची शिक्षेपासून सुटका झाली नाही, मग स्वर्गातून ताकीद देणार्‍याचे आपण ऐकले नाही, तर आपण किती मोठ्या संकटात सापडू? 26 ते बोलले तेव्हा त्यांच्या आवाजाने पृथ्वी हलली, पण आता ते वचन देतात, “केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही पुन्हा हालविणार.”हाग्ग 2:6 27 “पुनः एकदा” चा अर्थ असाच दिसतो की अस्थिर—निर्माण केलेल्या—वस्तू ते काढून टाकतील व नाश होणार नाही अशाच अढळ गोष्टी टिकतील.
28 आपल्याला असे अविचल राज्य प्राप्त होणार आहे, तेव्हा कृतज्ञ अंतःकरणांनी आणि आदरयुक्त भय बाळगून आपण परमेश्वराची उपासना करू या. 29 कारण आपले “परमेश्वर भस्म करणारे अग्नी आहेत.”अनु 4:24

*12:6 नीती 3:11, 12

12:13 नीती 4:26

12:19 निर्ग 19:16‑25; 20:18‑20 पाहावे

§12:20 निर्ग 19:12, 13

*12:21 अनु 9:19

12:26 हाग्ग 2:6

12:29 अनु 4:24