2
 1 “तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक*माझे लोक म्हणजे अम्मी’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’†माझी प्रिय व्यक्ती म्हणजे रुहामा असे म्हणा.   
इस्राएलास शिक्षा आणि पुनर्स्थापना 
  2 “तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच,  
कारण ती माझी पत्नी नाही,  
आणि मी तिचा पती नाही.  
ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूप  
आणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो.   
 3 नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन,  
जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती;  
तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन,  
निर्जल भूमीसारखी ठेवेन  
व तिला तहानेने जिवे मारीन.   
 4 मी तिच्या मुलांच्या प्रती आपली प्रीती दाखविणार नाही,  
कारण ती मुले व्यभिचाराची आहेत.   
 5 कारण त्यांची आई अविश्वासू आहे  
आणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे.  
ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन,  
जे मला माझे अन्न आणि माझे पाणी,  
माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’   
 6 म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन;  
मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही.   
 7 ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही.  
ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत.  
मग ती म्हणेल,  
‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन,  
कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’   
 8 तिने ओळखले नाही की, तो मीच होतो  
ज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले,  
ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले;  
जे त्यांनी बआलसाठी वापरले.   
 9 “म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन,  
आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन.  
तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी,  
मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.   
 10 म्हणून मी आता तिची अश्लीलता  
तिच्या प्रियकरांसमोर उघडी करेन;  
माझ्या हातून तिला कोणीही वाचवू शकणार नाही.   
 11 मी तिचे सर्व उत्सव:  
तिचे वार्षिक सण, तिचे नवीन चंद्रदर्शन,  
तिचे शब्बाथाचे दिवस—नेमून दिलेले तिचे सर्व सण बंद करेन.   
 12 मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन,  
जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे;  
मी त्यांचे गर्द झाडी करेन  
व वनपशू ते खाऊन टाकतील.   
 13 जेव्हा तिने बआलसाठी धूप जाळला,  
तिला मी त्या दिवसांसाठी शिक्षा करेन;  
तिने स्वतःला अंगठ्यांनी आणि दागिन्यांनी सजविले,  
आणि तिच्या प्रियकरांच्या मागे गेली,  
परंतु मला मात्र ती विसरून गेली,” असे याहवेह घोषित करतात.   
 14 “म्हणून तिला मी भुलविणार;  
तिला रानात घेऊन जाईन  
आणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन.   
 15 तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन,  
आणि अखोरचे खोरे‡म्हणजे दुःखाची दरी तिला आशेचे द्वार असे देईन.  
जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात  
जसे उत्तर देत होती तसेच उत्तर§किंवा गीत गाईल देईल.   
 16 “त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल;  
यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल*धनी’ असे म्हणणार नाही,  
याहवेह असे घोषित करतात.   
 17 मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन;  
यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही.   
 18 त्या दिवशी मी त्यांच्यासाठी  
रानातील पशू, आकाशातील पक्षी  
आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन.  
धनुष्य आणि तलवार आणि लढाया  
मी देशातून काढून टाकेन,  
म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल.   
 19 मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन;  
मी तुम्हाला नीतिमत्व आणि न्याय,  
प्रीती आणि करुणा यामध्ये वाग्दत्त करेन.   
 20 विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन,  
आणि याहवेहची ओळख तुला होईल.   
 21 “त्या दिवशी मी प्रतिसाद देईन;  
मी आकाशाला प्रतिसाद देईन  
आणि ते पृथ्वीला प्रतिसाद देतील;”  
याहवेह अशी घोषणा करतात.   
 22 “आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेल  
यांना प्रतिसाद देईल,  
आणि ते येज्रीलास†म्हणजे परमेश्वर रोपण करतात प्रतिसाद देतील.   
 23 मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन;  
‘माझी प्रिया नाही‡मूळ भाषेत लो-रुहामाह’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन.  
जे ‘माझे लोक नाहीत,§मूळ भाषेत लो-अम्मी’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन;  
आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”