11
याहवेहची इस्राएलसाठी प्रीती 
  1 “इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली,  
आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले.   
 2 पण त्यांना जितके जास्त बोलाविले,  
तितके ते माझ्यापासून दूर गेले.  
त्यांनी बआलापुढे बळी दिले  
आणि त्यांनी मूर्तीला धूप जाळला.   
 3 मी तोच होतो ज्याने एफ्राईमला चालण्यास शिकविले,  
मी त्यांना कडेवर वागवले;  
तो मीच होतो ज्याने त्यांना आरोग्य दिले,  
परंतु हे त्यांना समजले नाही.   
 4 मी त्यांना मानवी दयाळूपणाच्या दोरीने  
आणि प्रीतीच्या बंधनाने चालविले.  
त्यांच्यासाठी मी एखाद्या लहान मुलाला  
गालापर्यंत उचलल्यासारखा होतो,  
आणि मी खाली वाकून त्यांना खायला घालत असे.   
 5 “ते इजिप्त देशात परत जाणार नाहीत काय  
आणि अश्शूर त्यांच्यावर राज्य करणार नाही काय  
कारण ते पश्चात्ताप करण्यास नकार देतात?   
 6 त्यांच्या शहरातून तलवार चमकेल;  
ती त्यांच्या खोट्या संदेष्ट्यांना मारून टाकेल  
व त्यांच्या योजनांचा अंत करेल.   
 7 माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे.  
त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी  
मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही.   
 8 “अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो?  
अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ?  
मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो?  
मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो?  
माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे;  
माझी सर्व करुणा जागृत झाली आहे.   
 9 मी माझ्या तीव्र रागाप्रमाणे वागणार नाही,  
मी एफ्राईमचा पुन्हा नाश करणार नाही.  
कारण मी तुमच्यामध्ये एक पवित्र परमेश्वर आहे.  
मनुष्य नाही.  
मी त्यांच्या शहरांविरुद्ध येणार नाही.   
 10 ते याहवेहला अनुसरतील;  
ते सिंहासारखी गर्जना करतील.  
जेव्हा ते गर्जना करतील,  
तेव्हा त्यांची मुले थरथर कापत पश्चिमेकडून परत येतील.   
 11 पक्ष्यांच्या थरथरणाऱ्या  
थव्याप्रमाणे ते इजिप्तकडून येतील,  
पारव्यांप्रमाणे पंख फडफडत अश्शूरहून येतील.  
आणि मी त्यांना त्यांच्या घरी स्थायिक करेन,”  
असे याहवेह घोषणा करतात.   
इस्राएलचे पाप 
  12 एफ्राईमने मला खोटेपणाने,  
इस्राएलने फसवेगिरीने वेढून टाकले आहे.  
आणि यहूदाह उद्धटपणाने परमेश्वराच्या विरोधात आहे,  
शिवाय जे परमेश्वर विश्वासू व पवित्र आहेत, त्यांच्याविरुद्ध आहे.