6
यशायाहचे पाचारण 
  1 उज्जीयाह राजा मरण पावला त्या वर्षी, मी प्रभूला सिंहासनावर बसलेले उच्चतम आणि गौरवी असे पाहिले; आणि त्यांच्या अंगरख्याच्या घोळाने मंदिर भरून गेले होते.   2 त्यांच्या वरच्या बाजूला सराफीम होते, प्रत्येकाला सहा पंख होते: दोन पंखांनी त्यांनी स्वतःचे मुख झाकले होते, दोन पंखांनी पाय झाकले होते आणि दोन पंखांनी ते उडत होते.   3 आणि ते एकमेकांना म्हणत होते:  
“पवित्र, पवित्र, पवित्र सर्वसमर्थ याहवेह आहेत;  
त्याच्या तेजाने सर्व पृथ्वी भरली आहे!”   
 4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले.   
 5 “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”   
 6 नंतर, सराफीम दूतांपैकी एकाने, वेदीवरील एक निखारा चिमट्याने उचलला व तो उडत माझ्याकडे आला.   7 माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, “हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे.”   
 8 नंतर मी प्रभूची वाणी ऐकली, “मी कोणाला पाठवावे? आणि आपल्यासाठी कोण जाईल?”  
मी उत्तर दिले, “हा मी इथे आहे, मला पाठवा!”   
 9 ते म्हणाले, “जा आणि या लोकांना सांग:  
“ ‘ते नेहमी पाहत राहिले, तरी त्यांना दिसत नाही,  
ते नेहमी कानांनी ऐकत असले, तरी त्यांना ऐकू येत नाही व ते ग्रहण करत नाहीत.’   
 10 या लोकांचे अंतःकरण असंवेदनशील करा;  
त्यांचे कान मंद  
आणि त्यांचे डोळे बंद करा.  
नाहीतर ते त्यांच्या डोळ्यांनी पाहतील,  
त्यांच्या कानांनी ऐकतील,  
अंतःकरणापासून समजतील,  
आणि ते मागे वळतील आणि बरे होतील.”   
 11 नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?”  
आणि त्यांनी उत्तर दिले:  
“शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत  
आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत,  
घरे ओसाड पडत नाहीत  
आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.   
 12 याहवेह सर्व लोकांना दूर पाठवून देईपर्यंत  
आणि देशाचा पूर्णपणे त्याग केला जाईपर्यंत.   
 13 आणि भूमीवर एक दशांश जरी राहिला तरी,  
तो पुन्हा उद्ध्वस्त होईल.  
परंतु जसे एला आणि अल्लोन  
जेव्हा कापून टाकल्यावर बुंधा उरतो,  
त्याचप्रमाणे पवित्र बियाणे हे भूमीमध्ये बुंध्याप्रमाणे होईल.”