9
 1 तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—   
 2 अंधारात चालणाऱ्या लोकांनी  
मोठा प्रकाश पाहिला आहे;  
गडद अंधकार असलेल्या देशात राहणाऱ्यांवर  
प्रकाश उदय पावला आहे.   
 3 तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे  
आणि त्यांचा आनंद वाढविला आहे.  
जसे लोक कापणीच्या वेळेस आनंद करतात,  
तसे ते तुमच्यासमोर आनंद करतात,  
लुटलेला माल वाटून घेतांना  
युद्ध करणारे आनंद करतात तसे.   
 4 कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये,  
तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड,  
त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई,  
त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी  
मोडून टाकली आहे.   
 5 लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे  
आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र  
जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल,  
जाळण्यासाठी इंधन असे होईल.   
 6 कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे,  
आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे,  
आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल.  
आणि त्यांना  
अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर,  
सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील.   
 7 त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा  
अंत होणार नाही.  
ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील  
आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील,  
ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत  
न्याय आणि धार्मिकता  
स्थापन करतील आणि टिकवतील.  
सर्वसमर्थ याहवेहचा आवेश  
हे पूर्ण करेल.   
इस्राएलविरुद्ध याहवेहचा क्रोध 
  8 प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे;  
तो इस्राएलवर पडेल.   
 9 सर्व लोकांना ते माहीत होईल—  
एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक—  
जे अभिमानाने  
आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,   
 10 “विटा खाली पडल्या आहेत,  
परंतु आम्ही ते घडविलेल्या दगडाने पुन्हा बांधू;  
उंबराची झाडे कापली गेली आहेत,  
परंतु आम्ही त्यांच्या जागी देवदारू लावू.”   
 11 परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे  
आणि त्यांच्या शत्रूंना प्रेरित केले आहे.   
 12 पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी  
इस्राएलला मोठा आ वासून गिळंकृत केले आहे.  
हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही,  
त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.   
 13 परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत,  
आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचा शोधही घेतला नाही.   
 14 म्हणून याहवेह एकाच दिवसात इस्राएलचे मस्तक आणि शेपूट,  
खजूराच्या फांद्या आणि लव्हाळा हे दोन्ही कापून टाकतील;   
 15 वडीलजन आणि मान्यवर लोक हे मस्तक आहेत,  
खोटे शिक्षण देणारे संदेष्टे हे शेपूट आहेत.   
 16 या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात,  
आणि ज्यांना मार्गदर्शन मिळाले, ते पथभ्रष्ट झाले आहेत.   
 17 म्हणूनच प्रभू त्यांच्या तरुण पुरुषांना पाहून प्रसन्न होणार नाहीत;  
त्यांना विधवांचा आणि अनाथांचा कळवळा येणार नाही;  
कारण हे सर्वच अधर्मी व दुष्ट असून,  
प्रत्येक मुख असत्य बोलणारे आहे.  
हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही,  
त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.   
 18 दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते.  
ती काटेरी झुडपे आणि काटेरी झाडे यांना भस्म करते,  
ती झाडेझुडपांचे रान पेटवून टाकते,  
त्यामुळे तो धुराचा एक स्तंभ होऊन गरगर फिरत वर जातो.   
 19 सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने  
भूमी होरपळून जाईल  
आणि लोक त्या आगीचे इंधन होतील;  
ते एकमेकांना वाचविणार नाहीत.   
 20 उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील  
परंतु ते भुकेले राहतील;  
डाव्या बाजूला असलेलेही खातील  
परंतु समाधानी होणार नाहीत.  
प्रत्येकजण स्वतःच्याच संततीचे मांस*किंवा बाहू खातील:   
 21 मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल;  
ते एकत्र मिळून यहूदीयाच्या विरोधात जातील.  
हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही,  
त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.