26
स्तुतिगान 
  1 त्या दिवशी सर्व यहूदीया देश हे गीत गाईल:  
आमच्याकडे एक भक्कम शहर आहे;  
परमेश्वर त्याचे तारण  
त्याच्या भिंती आणि तटबंदी करतात.   
 2 वेशी उघडा  
जेणेकरून नीतिमान राष्ट्र,  
जे राष्ट्र कायम विश्वास ठेवते, ते प्रवेश करेल.   
 3 ज्यांचे मन स्थिर आहे,  
त्या तुम्हाला परिपूर्ण शांती मिळेल,  
कारण ते तुमच्यावर भरवसा ठेवतात.   
 4 याहवेहवर कायम भरवसा ठेवा,  
कारण याहवेह, याहवेह स्वत: सनातन खडक आहेत.   
 5 जे उच्चस्थळी राहतात, त्यांना ते नम्र करतात  
वैभवशाली असलेले शहर ते खाली पाडतात;  
ते त्याला भुईसपाट करतात  
आणि त्याला धुळीत टाकून देतात.   
 6 पावलांनो ते तुडवा—  
पीडितांच्या पावलांनो,  
गरिबांच्या पावलांनो.   
 7 नीतिमानाचा मार्ग समतल असतो;  
तुम्ही जे परमनीतिमान आहात, नीतिमानांचा मार्ग सुकर करा.   
 8 होय, याहवेह, तुमच्या नियमांना*किंवा न्याय अनुसरून चालत असताना,  
आम्ही तुमची वाट पाहतो;  
तुमचे नाव आणि किर्ती  
हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.   
 9 रात्री माझ्या जीवाला तुमचा ध्यास लागतो;  
सकाळी माझा आत्मा तुमच्यासाठी आसुसलेला असतो.  
जेव्हा तुमचे न्याय पृथ्वीवर येतात,  
तेव्हा जगातील लोक धार्मिकता शिकतात.   
 10 परंतु जेव्हा दुष्टांवर कृपा दाखविली जाते,  
तेव्हा ते धार्मिकता शिकत नाहीत.  
प्रामाणिकपणा असलेल्या देशामध्येही ते दुष्कृत्ये करीत राहतात  
आणि याहवेहच्या प्रतिष्ठेची ते पर्वा करीत नाहीत.   
 11 याहवेह, तुमचा हात उगारलेला आहे,  
परंतु ते पाहात नाहीत.  
तुमच्या लोकांबद्दलचा तुमचा आवेश त्यांना पाहू द्या व लज्जित होऊ द्या;  
तुमच्या शत्रूंना भस्म करण्यासाठी अग्नी राखून ठेवा.   
 12 याहवेह, तुम्ही आमच्यासाठी शांती प्रस्थापित करता;  
जे सर्वकाही आम्ही साध्य केले, ते तुम्ही आमच्यासाठी केले आहे.   
 13 याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो.  
तुमच्याशिवाय इतर प्रभूंनी आमच्यावर राज्य केले आहे,   
 14 ते आता मरण पावले आहेत, ते आता जगणार नाहीत.  
त्यांचे मृतात्मे उठत नाहीत.  
तुम्ही त्यांना शिक्षा केली आणि त्यांचा नाश केला;  
तुम्ही त्यांच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या.   
 15 याहवेह, तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे;  
तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे.  
तुम्ही स्वतःसाठी गौरव प्राप्त केले आहे;  
तुम्ही देशाच्या सर्व सीमा वाढविल्या आहेत.   
 16 हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले;  
जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली,  
तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते.   
 17 जशी गर्भवती स्त्री प्रसूत होण्याच्या वेळेस  
तिच्या वेदनांनी गडाबडा लोळते आणि रडून ओरडते,  
याहवेह, तुमच्या उपस्थितीत आम्ही तसेच होतो.   
 18 आम्ही गरोदर होतो, प्रसूतीच्या वेदनांनी लोळलो,  
परंतु आम्ही वार्याला जन्म दिला.  
आम्ही देशात तारण आणलेले नाही,  
आणि जगातील लोक जीवनाकडे आले नाहीत.   
 19 याहवेह, परंतु तुमचे मेलेले जगतील;  
त्यांची शरीरे उठतील—  
जे धुळीमध्ये पडून राहतात  
त्यांना जागे होऊ द्या आणि हर्षनाद करू द्या—  
तुमचे दव प्रातःकाळच्या दवासारखे आहे;  
पृथ्वी तिच्या मृत लोकांना जन्म देईल.   
 20 माझ्या लोकांनो, जा, तुमच्या खोल्यांध्ये जा  
आणि तुमच्यामागे दारे बंद करा;  
थोडा वेळ पर्यंत तुम्ही स्वतःला लपवून ठेवा  
जोपर्यंत त्यांचा राग निघून जात नाही.   
 21 पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता,  
याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत  
तिच्यावर झालेला रक्तपात पृथ्वी प्रगट करेल;  
तिच्यावर वधलेले यापुढे पृथ्वी लपवून ठेवणार नाही.