31
इजिप्तवर अवलंबून राहणाऱ्यांचा धिक्कार असो 
  1 जे इजिप्तकडे मदतीसाठी जातात,  
जे घोड्यांवर अवलंबून असतात, त्यांचा धिक्कार असो,  
जे त्यांच्याकडील पुष्कळ रथांच्या संख्येवर  
आणि घोडेस्वारांच्या मोठ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात,  
परंतु इस्राएलचे जे पवित्र परमेश्वराकडे पाहात नाहीत,  
किंवा याहवेहकडून मदत घेत नाहीत.   
 2 तरीसुद्धा ते सुज्ञ आहेत आणि संकट आणू शकतात.  
ते त्यांचे शब्द मागे घेत नाहीत.  
जे दुष्टांना मदत करतात त्यांच्याविरुद्ध  
ते त्या दुष्ट राष्ट्राविरुद्ध उठाव करतील,   
 3 परंतु इजिप्तचे लोक केवळ नश्वर आहेत आणि ते परमेश्वर नाहीत;  
त्यांचे घोडे मांसाचे आहेत आणि आत्म्याचे नाहीत.  
जेव्हा याहवेह त्यांचा हात पुढे करतात तेव्हा  
जे मदत करणारे ते अडखळतील,  
ज्यांना मदत मिळाली आहे ते पडतील.  
सर्वजण एकत्र नाश पावतील.   
 4 याहवेह मला असे म्हणतात:  
“जसा सिंह गुरगुरतो,  
एक मोठा सिंह त्याच्या भक्ष्यावर—  
आणि त्याला विरोध करण्यासाठी  
जरी मेंढपाळांची संपूर्ण टोळी एकत्र बोलावली जाते,  
तरी तो त्यांच्या ओरडण्याने घाबरत नाही  
किंवा त्यांच्या मोठ्या गोंधळ्याच्या आवाजाने अस्वस्थ होत नाही,  
म्हणून सर्वसमर्थ याहवेह सीयोन पर्वतावर आणि त्याच्या उंचीवर  
युद्ध करण्यासाठी खाली येतील.   
 5 ज्याप्रमाणे पक्षी डोक्यावर घिरट्या घालतात,  
त्याप्रमाणे सर्वसमर्थ याहवेह यरुशलेमची ढाल होतील;  
ते तिला संरक्षण देऊन सोडवतील,  
ते त्यांना ओलांडून जातील आणि त्याला सोडवतील आणि त्याचा बचाव करतील.”   
 6 अहो तुम्ही इस्राएली लोकांनो, ज्यांच्याविरुद्ध तुम्ही फार मोठेपणाने बंड केले आहे त्याच्याकडे परत या.   7 कारण त्या दिवशी तुमच्यामधील प्रत्येकजण तुमच्या पापी हातांनी सोन्या-चांदीच्या ज्या मूर्ती तयार केल्या आहेत, त्यांना नाकारतील.   
 8 “अश्शूर मानवी तलवारीने पडणार नाही;  
एक तलवार, जी मर्त्य मानवांची नाही, ती त्यांना गिळून टाकेल.  
तलवार पाहून ते पळून जातील  
आणि त्यांच्या तरुणांना जबरदस्तीने मजुरीच्या कामाला ठेवले जाईल.   
 9 दहशतीमुळे त्यांचा किल्ला पडून जाईल;  
युद्धाच्या ध्वजाचे दृश्य पाहून त्यांचे सेनापती भयभीत होतील,”  
ज्या याहवेहचा अग्नी सीयोनमध्ये आहे,  
ज्यांची भट्टी यरुशलेममध्ये आहे,  
ते अशी घोषणा करतात.