33
अरिष्ट आणि मदत
1 हे विनाशका, तुझा धिक्कार असो,
तू, ज्याचा नाश करण्यात आला नाही!
हे विश्वासघातक्यांनो, तुमचा धिक्कार असो,
तुम्ही, ज्यांचा विश्वासघात करण्यात आला नाही!
जेव्हा तुम्ही नाश करणे थांबवाल,
तेव्हा तुमचा नाश होईल;
जेव्हा तुम्ही विश्वासघात करणे थांबवाल,
तेव्हा तुमचा विश्वासघात केला जाईल.
2 हे याहवेह, आम्हावर कृपा करा;
आम्ही तुमची आस धरलेली आहे.
रोज सकाळी तुम्ही आमचे सामर्थ्य व्हा,
संकटाच्या वेळी आमचे तारण व्हा.
3 तुमच्या सैन्याच्या रणगर्जनेने लोक पलायन करतात.
जेव्हा तुम्ही युद्धासाठी सज्ज होता, तेव्हा राष्ट्रांची पांगापांग होते.
4 अहो राष्ट्रांनो, तरुण टोळांनी तुम्ही केलेल्या लुटीची कापणी केली आहे.
टोळांच्या थव्याप्रमाणे लोक त्यावर झडप घालतात.
5 याहवेहना उच्च केले आहे, कारण ते उच्चस्थानी राहतात;
सीयोनला ते त्यांच्या न्यायाने आणि धार्मिकतेने भरून टाकतील.
6 तुमच्या वेळेसाठी ते निश्चित पाया असे असतील,
तारण, शहाणपण आणि सुज्ञान यांचे ते विपुल भांडार असतील;
याहवेहचे भय हेच या खजिन्याची चावी आहे.
7 पाहा, त्यांचे शूर लोक रस्त्यावर मोठ्याने आक्रोश करत आहेत.
शांतीचे दूत मोठ्या दुःखाने रडत आहेत.
8 नगरातील महामार्ग निर्जन झाले आहेत,
रस्त्यावर कोणी प्रवासी नाहीत.
करार मोडला आहे,
त्याचे साक्षीदार तुच्छ झाले आहेत,
कोणाचाही आदर केल्या जात नाही.
9 भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे,
लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे;
शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत,
आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.
10 याहवेह म्हणतात, “मी आता उठेन,
मी आता उच्च केल्या जाईन;
आता मला उंच केले जाईल.
11 तुम्ही भुशाची गर्भधारणा करता,
तुम्ही पेंढीला जन्म देता;
तुमचा श्वास हा अग्नी आहे, जो तुम्हाला भस्म करतो.
12 लोक जळून राख होतील;
कापलेल्या काटेरी झुडूपांप्रमाणे ते जाळले जातील.”
13 तुम्ही जे फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका.
तुम्ही जे जवळ आहात ते, माझे सामर्थ्य मान्य करा!
14 सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत;
देवहीन लोक थरथर कापत आहेत:
“भस्म करणाऱ्या अग्नीमध्ये आमच्यामधील कोण राहू शकेल?
सार्वकालिक अग्नीत आमच्यामधील कोण जळत राहू शकेल काय?”
15 जे नीतीने चालतात
आणि जे योग्य तेच बोलतात,
जे पिळवणूक करून मिळविलेला लाभ नाकारतात
आणि लाच घेण्यापासून त्यांचे हात लांब ठेवतात,
खुनाच्या कारस्थानाबाबत जे त्यांचे कान बंद ठेवतात
दुष्टतेचा बेत करण्याबाबत त्यांचे डोळे बंद करतात—
16 ज्यांचा आश्रय पर्वतावरील गड असेल,
तेच उच्चस्थानी वास करतील.
त्यांच्या भाकरीचा पुरवठा केला जाईल,
आणि त्यांना पाण्याची कमतरता पडणार नाही.
17 तुमची दृष्टी राजाला त्यांच्या सौंदर्यात पाहतील
आणि फार दूरवर पसरत असलेला देश पाहतील.
18 तुम्ही यापूर्वीच्या दहशत बसविणाऱ्या गोष्टीचा नीट विचार कराल:
“तो मुख्याधिकारी कुठे आहे?
ज्याने महसूल कर घेतला, तो कुठे आहे?
उंच बुरुजावरील प्रमुख अधिकारी कुठे आहे?”
19 ज्यांचे बोलणे अस्पष्ट आहे,
ज्यांची भाषा अनोळखी आणि न समजण्यासारखी आहे,
असे उर्मट लोक तुम्हाला इथूनपुढे दिसणार नाहीत.
20 आमच्या सणांचे शहर, सीयोनाकडे पहा;
तुमची दृष्टी यरुशलेम पाहतील,
शांत असलेले निवासस्थान, हालविल्या न जाणारा तंबू;
त्याच्या खुंट्या कधीही उपटल्या जाणार नाहीत,
किंवा त्याच्या कोणत्याही दोऱ्या तोडल्या जाणार नाहीत.
21 आमचे प्रतापी याहवेह तिथे असतील.
विस्तीर्ण नद्या आणि प्रवाह असलेले ते ठिकाण असेल.
कोणत्याही लहान जहाजाचे वल्हे त्यांच्यावर स्वार होणार नाही,
कोणतेही प्रचंड जहाज त्यांच्यावरून जाणार नाही.
22 कारण याहवेह आमचे न्यायाधीश आहेत,
याहवेह आम्हाला कायदा प्रदान करणारे आहेत,
याहवेह आमचे राजा आहेत;
तेच आम्हाला वाचविणार आहेत.
23 तुमच्या जहाजांना आधार देण्याऱ्या दोऱ्या सैल सोडलेल्या आहेत:
जहाजाची शीडकाठी सुरक्षित धरलेली नाही,
जहाजाचे शीड पसरलेले नाही.
तेव्हा लूट केलेल्या विपुल मालाची वाटणी केली जाईल
आणि लंगडेसुद्धा लूट घेऊन जातील.
24 सीयोनमध्ये राहणारा कोणीही असे म्हणणार नाही, “मी आजारी आहे;”
आणि तिथे जे राहणारे आहेत, त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल.