61
याहवेहच्या कृपेचे वर्ष 
  1 सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,  
कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी  
याहवेहने माझा अभिषेक केला आहे.  
भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,  
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी  
व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.   
 2 याहवेहच्या कृपेचे वर्ष  
आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास,  
आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.   
 3 सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना—  
राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट,  
विलापाऐवजी  
आनंदाचे तेल,  
निराशेच्या आत्म्याऐवजी  
स्तुतीचे वस्त्र  
बहाल करण्यासाठी.  
कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी  
ते नीतिमत्तेचे एला वृक्ष  
याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.   
 4 ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतील  
फार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील;  
ते पुरातन पडीक नगरांचा,  
जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील.   
 5 अपरिचित लोक तुमचे कळप राखतील;  
विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.   
 6 तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतील  
तुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल.  
राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल,  
व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल.   
 7 लज्जेच्या ऐवजी  
तुम्ही दुपटीने सन्मान मिळवाल,  
आणि अप्रतिष्ठे ऐवजी  
तुम्हाला तुमच्या वतनात आनंद प्राप्त होईल.  
आणि तुम्ही दुपटीने तुमच्या वतनभूमीचे वारसदार व्हाल,  
आणि तुम्ही अनंतकाळचा आनंद प्राप्त कराल.   
 8 “कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे;  
चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे.  
माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईन  
आणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन.   
 9 राष्ट्रांमध्ये त्यांच्या वंशजांचा लौकिक होईल,  
आणि त्यांची संतती लोकांमध्ये बहुमानीत होतील.  
जे सर्व त्यांना बघून हे कबूल करतील की  
ते याहवेहचे आशीर्वादित लोक आहेत.”   
 10 मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो;  
माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो.  
जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते,  
किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते,  
तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत  
आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.   
 11 जशी माती अंकुराला उगविते  
आणि बाग बीज वाढविते  
तसे सार्वभौम याहवेह नीतिमत्व  
आणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.