64
 1 अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते,  
तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते!   
 2 जसा अग्नी शाखांना जाळून भस्म करतो,  
व ज्यामुळे पाणी उकळले जाते,  
तुम्ही खाली या व तुमच्या नामाची महती तुमच्या शत्रूंना समजू द्या  
ज्यामुळे राष्ट्रे तुमच्यासमोर थरथर कापली जातील!   
 3 जेव्हाही आम्हाला अनपेक्षित असे अत्यंत अद्भुत चमत्कार करण्यास,  
तुम्ही खाली आले, पर्वतांनी तुम्हाला पाहताच ते भीतीने तुमच्यासमोर डळमळले.   
 4 प्राचीन युगापासून कोणी कधी ऐकले नाही,  
कोणत्याही कानावर ते पडले नाही,  
कोणीही तुमच्याशिवाय इतर कोणताही परमेश्वर कधी पाहिला नाही जो,  
जे त्यांची आशेने वाट पाहतात, त्यांच्यावतीने कार्य करतात.   
 5 जे आनंदाने चांगली कृत्ये करतात, व ज्यांना तुमच्या मार्गाचे स्मरण असते,  
त्यांच्या मदतीसाठी तुम्ही येता.  
परंतु जेव्हा आम्ही तुमच्याविरुद्ध सतत पाप करत राहिलो,  
तेव्हा तुमचा क्रोध आम्हावर भडकला.  
आता आमचा उद्धार कसा होणार?   
 6 आम्ही सर्वच अशुद्ध व्यक्तीसारखे झालो आहोत.  
आणि आमच्या नीतीची कृत्ये घाणेरड्या चिंध्या आहेत;  
आम्ही सर्व पानांप्रमाणे कोमेजतो,  
वाऱ्याने उडवून न्यावे, तशी आमची पापे आम्हाला दूर वाहून नेतात*किंवा आमच्या पापांमुळे आम्ही वितळून गेलो आहोत.   
 7 तरीही कोणी तुमच्या नावाचा धावा करीत नाही  
किंवा तुमचा ध्यास घेत नाही;  
कारण तुम्ही आमच्यापासून आपले मुख लपविले आहे  
आणि आम्हाला आमच्या पापांच्या स्वाधीन केले आहे.   
 8 परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात.  
आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात;  
आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत.   
 9 हे याहवेह, आमच्यावर प्रमाणाबाहेर रागावू नका;  
आमची पापे सदासर्वकाळ आठवू नका.  
हे याहवेह, आम्ही प्रार्थना करतो, आमच्यावर कृपादृष्टी करा,  
कारण आम्ही सर्व तुमचेच लोक आहोत.   
 10 तुमची पवित्र शहरे ओसाड झाली आहेत;  
सीयोनही ओसाड झाले आहे, यरुशलेम तर उजाड रान झाले आहे.   
 11 जिथे आमच्या पूर्वजांनी तुमची स्तुतिप्रशंसा केली,  
ते आमचे पवित्र व वैभवी मंदिर बेचिराख झाले आहे,  
आणि आम्ही जोपासलेल्या सर्व वस्तूंची राखरांगोळी झाली आहे.   
 12 हे सर्व होऊनही याहवेह, आम्हाला साहाय्य करण्यास तुम्ही स्वतःस रोखणार?  
तुम्ही स्तब्ध राहून आम्हाला प्रमाणाबाहेर शिक्षा करणार काय?