4
स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा
तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय? तुम्ही इच्छा करता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही वध करता. तुम्ही लोभ धरता, परंतु जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त होत नाही, यामुळे तुम्ही भांडता आणि लढता. तुमच्याकडे नाही कारण तुम्ही परमेश्वराकडे मागत नाही. जेव्हा तुम्ही मागता, तरी तुम्हाला ते मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य हेतूने, विलासाच्या गोष्टींवर खर्च करावा म्हणून मागता.
व्यभिचारी लोकांनो,*कराराच्या विश्वास घातकीपणाचा संदर्भ; पाहा होशे 3:1. जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे. त्याने जो आत्मा आपल्या ठायी ठेवला आहे तो सौम्य ईर्षेने आपल्यावर नजर ठेवतो, हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते का? परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते,
“परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात
परंतु नम्रजनावर कृपा करतात.”नीती 3:34
तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल; तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत. तुम्ही रडा, शोक आणि आकांत करा. तुमचे हसणे शोकात आणि तुमचा आनंद खिन्नतेमध्ये बदलू द्या. 10 प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.
11 प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकमेकांची चहाडी करू नका. जो कोणी आपल्या बंधू किंवा भगिनी विरुद्ध बोलतो अथवा त्यांचा न्याय करतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व न्याय करतो, जेव्हा तुम्ही नियमांविरुद्ध न्याय करता आणि ते पाळीत नाही, तर न्याय करणारे व्हाल. 12 नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहेत, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु आपल्या शेजार्‍याचा न्याय करणारा तू कोण?
उद्याची बढाई
13 आता ऐका, तुम्ही म्हणता, “आम्ही आज किंवा उद्या या किंवा त्या शहरात जाऊ, तिथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.” 14 तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. 15 याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, “जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू.” 16 जसे आता तुम्ही घमेंड करता आणि अभिमान बाळगता. अशा सर्व प्रकारची बढाई वाईट आहे. 17 जर कोणाला चांगले करणे कळत असूनही, ते करत नाही, तर ते त्यांना पाप गणले जाते.

*4:4 कराराच्या विश्वास घातकीपणाचा संदर्भ; पाहा होशे 3:1.

4:6 नीती 3:34