15
पलिष्ट्यांवर शमशोनाचा सूड
काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देईना.
“मला खात्री होती की तू तिचा तिरस्कार करतोस,” तो म्हणाला, “मी तिला तुझ्या सोबत्याला दिले. तिची धाकटी बहीण अधिक आकर्षक नाही का? तिच्याऐवजी हिला घेऊन जा.”
शमशोन त्यांना म्हणाला, “यावेळी मला पलिष्ट्यांवर चालून जाण्याचा अधिकार आहे; मी त्यांना शिक्षा करेन.” म्हणून शमशोन बाहेर पडला आणि त्याने तीनशे कोल्हे पकडले आणि जोडीजोडीने त्यांच्या शेपट्या एकत्र बांधल्या. प्रत्येक दोन शेपट्यांच्या जोडीमध्ये त्याने एकएक मशाल बांधली, मशाली पेटविल्या आणि कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात मोकळे सोडले. त्यांनी द्राक्षमळे आणि जैतुनाचे मळे आणि धान्य जाळून टाकले.
तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” त्यांना सांगण्यात आले, “हे तिम्नाहचा जावई शमशोनाने केले, कारण त्याची पत्नी त्याच्या सोबत्याला देण्यात आली आहे.”
तेव्हा पलिष्टी लोक आले व त्यांनी तिला व तिच्या पित्याला जाळून टाकले. शमशोन त्यांना म्हणाला, “आता तुम्ही याप्रकारे वागला आहात म्हणून, मी अशी शपथ घेतो की तुमच्यावर सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.” तेव्हा अतिशय क्रूरतेने त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी अनेकांना ठार केले. त्यानंतर तो खाली गेला आणि एटाम खडकातील गुहेत राहू लागला.
इकडे पलिष्टी लोक वर गेले आणि त्यांनी यहूदीयात तळ ठोकला व लेहीवर हल्ला केला. 10 तेव्हा यहूदीयाच्या लोकांनी विचारले, “तुम्ही आमच्यासोबत युद्ध करण्यास का आलात?”
त्यांनी उत्तर दिले, “आम्ही शमशोनाला कैदी करून घेऊन जाण्यास आलो आहोत, कारण जसे त्याने आमचे केले तसे आम्ही त्याचे करणार आहोत.”
11 तेव्हा यहूदाहचे तीन हजार लोक खाली एटाम खडकातील गुहेकडे गेले आणि ते शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी लोक आपल्यावर राज्य करतात हे तुला माहीत नाही काय? तू आमच्यासोबत हे काय केले?”
त्याने उत्तर दिले, “ज्याप्रकारे त्यांनी माझ्याशी वर्तन केले तसेच मीही त्यांच्याशी केले.”
12 ते त्याला म्हणाले, “आम्ही तुला बांधण्यासाठी आणि तुला पलिष्टी लोकांच्या हवाली करण्यासाठी आलो आहोत.”
शमशोन म्हणाला, “तुम्ही मला ठार मारणार नाही, अशी शपथ माझ्याजवळ घ्या.”
13 “आम्ही सहमत आहोत,” त्यांनी उत्तर दिले. “आम्ही फक्त तुला बांधणार आणि तुला त्यांच्या हवाली करणार. आम्ही तुला मारणार नाही.” तेव्हा त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधले आणि खडकाच्या कपारीतून बाहेर आणून वर नेले. 14 जेव्हा तो लेहीला पोहोचला, तेव्हा पलिष्टी लोक ओरडत पुढे आले. याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर उतरला. ज्या दोरांनी त्याच्या दंडांना बांधले होते ते दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि त्याच्या हातांवरून गळून पडले. 15 मग तिथे त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले, त्याने ते उचलले आणि एक हजार पलिष्ट्यांस ठार केले.
16 मग शमशोन म्हणाला,
“गाढवाच्या जाभाडाने
मी राशींवर राशी पाडल्या.
केवळ गाढवाच्या जाभाडाने
मी हजार माणसे वधली.”
17 आपले बोलणे संपविल्यावर त्याने आपल्या हातातील ते जाभाड फेकून दिले; आणि त्या ठिकाणाचे नाव त्याने रामाथ-लेही*रामाथ-लेही म्हणजे जाभाडाची टेकडी असे ठेवले.
18 त्याला अतिशय तहान लागली होती, तेव्हा त्याने याहवेहचा धावा केला, “तुम्ही आपल्या सेवकाला हा मोठा विजय दिला आहे. आता मी तहानेने मरावे काय आणि बेसुंती लोकांच्या हाती पडावे काय?” 19 तेव्हा परमेश्वराने लेहीतील खोलगट जागा दुभंगली आणि त्यातून पाणी बाहेर आले. जेव्हा शमशोन ते पाणी प्याला, तेव्हा त्याची शक्ती परत आली आणि तो ताजातवाना झाला. मग त्याने त्या ठिकाणाचे नाव एन-हक्कोरेएन-हक्कोरे म्हणजे हाक मारणार्‍या मनुष्याचा झरा असे ठेवले. आज देखील तो झरा लेही येथे आढळतो.
20 पलिष्टी लोकांच्या काळात शमशोनाने वीस वर्षे इस्राएलचे नेतृत्वकिंवा न्याय केला केले.

*15:17 रामाथ-लेही म्हणजे जाभाडाची टेकडी

15:19 एन-हक्कोरे म्हणजे हाक मारणार्‍या मनुष्याचा झरा

15:20 किंवा न्याय केला