6
यरुशलेमला वेढा पडतो 
  1 “बिन्यामीन वंशजानो, आपल्या सुरक्षेसाठी तुम्ही पलायन करा!  
यरुशलेममधून पळून जा!  
तकोवा इथून कर्ण्याचा आवाज येताच  
बेथ-हक्करेम येथे धोक्याची सूचना देणारे संकेत द्या!  
कारण उत्तरेकडून येणारा नाश पुढे दिसत आहे,  
भयंकर विनाश.   
 2 सीयोनाच्या सुंदर आणि सुकुमार कन्येला  
मी उद्ध्वस्त करेन.   
 3 मेंढपाळ त्यांचे कळप सोबत घेऊन तिच्याविरुद्ध येतील;  
ते तिच्या नगराभोवती त्यांचे तंबू ठोकतील,  
प्रत्येक कळपासाठी कुरणे विभागतील.”   
 4 “तिच्याविरुद्ध युद्धाची तयारी करा!  
उठा, चला दुपारच्या वेळी हल्ला करू!  
हाय हाय! परंतु आता दिवसाचा प्रकाश मंदावला आहे.  
आणि संध्याकाळची छाया लांब वाढत आहे.   
 5 चला, आता आपण रात्री हल्ला चढवू  
आणि तिच्या गडांचा नाश करू!”   
 6 कारण सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात:  
“झाडे तोडून टाका  
आणि यरुशलेममध्ये तटबंदीची बांधणी करा.  
या नगराला शिक्षा झालीच पाहिजे;  
तिच्यात जुलूम भरलेला आहे.   
 7 ज्याप्रमाणे विहिरीच्या झऱ्यातून पाणी बाहेर वाहते,  
तशी तिची दुष्टाई झर्याप्रमाणे उफाळून येते.  
तिच्या रस्त्यारस्त्यातून हिंसाचार व विनाशाचे आवाज घुमतात;  
तिचे रोग व तिच्या जखमा सदोदित माझ्या नजरेसमोर आहेत.   
 8 हे यरुशलेम, तुला हा इशारा आहे.  
नाही तर मी तुझ्यापासून दूर होईन  
आणि मी तुझ्या देशाला उजाड करेन  
जिथे कोणीही मनुष्य राहणार नाही.”   
 9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:  
“ज्या प्रकारे उरलेले थोडेथोडे द्राक्ष गोळा करण्यात येतात  
त्याचप्रमाणे इस्राएलमधून थोड्याफार उरलेल्या निवडक लोकांना एकत्र करण्यात येईल;  
ज्या प्रकारे द्राक्ष गोळा करण्यात येतात,  
त्याप्रकारे तुमचे हात पुन्हा फांद्यांवरून फिरवा.”   
 10 मी कोणाशी बोलू व सावधगिरीचा इशारा देऊ?  
माझे कोण ऐकेल?  
त्यांचे कान बंद झाले आहेत*किंवा बेसुंती  
त्यांना ऐकूच येत नाही.  
याहवेहचे वचन त्यांना संतप्त करते;  
त्यांना ते सुखद वाटत नाही.   
 11 परंतु मी याहवेहच्या क्रोधाने भडकलो आहे,  
हा क्रोध मला आवरून धरवत नाही.  
“मी हा क्रोध रस्तोरस्ती असलेल्या मुलांवर  
आणि तरुणांच्या गटांवर ओततो;  
दोघे पतिपत्नी त्यात अडकले जातील,  
आणि वयस्कर, जे वयातीत आहेत ते देखील.   
 12 त्यांची घरे दुसऱ्यांना देण्यात येतील,  
ते त्यांची शेते व त्यांच्या स्त्रियाही इतरांना दिल्या जातील,  
जेव्हा माझा हात मी या देशात राहणाऱ्या  
लोकांविरुद्ध उगारेन, तेव्हा हे घडेल,”  
असे याहवेह जाहीर करतात.   
 13 “त्यांच्यातील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत  
सर्वजण लोभी आहेत;  
संदेष्टे आणि याजक सर्व एकसारखेच,  
कपटी व्यवहार करतात.   
 14 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात  
की जणू ते फारसे गंभीर नाही.  
‘शांती, शांती आहे’ असे ते म्हणतात,  
परंतु शांती कुठेही नाही.   
 15 त्यांना त्यांच्या वाईट कृत्याबद्दल लाज वाटते का?  
नाही, त्यांना मुळीच लज्जा वाटत नाही;  
लाज वाटणे म्हणजे काय असते हे त्यांना माहीतच नाही.  
म्हणून ते पतन पावलेल्या लोकांमध्ये पतन पावतील;  
मी जेव्हा त्यांना शिक्षा देईल तेव्हा त्यांचे पतन होईल,”  
असे याहवेह म्हणतात.   
 16 याहवेह असे म्हणतात:  
“चौरस्त्यावर उभे राहा व पाहा;  
पुरातन मार्गाची विचारणा करा,  
तो चांगला मार्ग कुठे आहे ते विचारा आणि त्या मार्गाने जा,  
तसे केल्यास तुमच्या आत्म्याला शांती लाभेल.  
परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही त्या मार्गाने चालणार नाही.’   
 17 मी तुमच्यावर पहारेकरी नेमले आणि म्हटले,  
‘रणशिंगाच्या आवाजाकडे लक्ष द्या!’  
परंतु तुम्ही म्हटले, ‘आम्ही ऐकणार नाही.’   
 18 म्हणून माझ्या राष्ट्रांनो माझे ऐका;  
तुम्ही माझे साक्षीदार आहात,  
त्यांचे काय होईल ते समजून घ्या.   
 19 हे पृथ्वी तू ऐक:  
मी या लोकांवर महासंकट आणत आहे,  
त्यांच्याच कारस्थानाचे फळ,  
कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही  
आणि माझे नियम नाकारले.   
 20 शबाहून आणलेल्या सुगंधी धूपाचा मला काय उपयोग  
किंवा दूरदेशातील मोलाच्या द्रव्याचा काय उपयोग?  
तुमची होमार्पणे मला संतुष्ट करीत नाही;  
तुमचे यज्ञबली मला प्रसन्न करीत नाहीत.”   
 21 म्हणून याहवेह असे म्हणतात:  
“मी या लोकांच्या मार्गात अडथळे पाठवेन.  
त्यावर मातापिता आणि लेकरे सारखेच अडखळतील.  
शेजारी आणि मित्र नाश पावतील.”   
 22 याहवेह असे म्हणतात:  
“पाहा, उत्तरेकडील देशातून  
सैन्य येत आहे;  
पृथ्वीच्या शेवटापासून  
एक मोठे राष्ट्र भडकविले जात आहे.   
 23 त्यांचे सैनिक धनुष्य व भाल्यासहित सज्ज आहेत.  
ते अत्यंत क्रूर असून दया दाखवित नाही.  
ते घोड्यांवर स्वार झाले असता  
त्यांचा आवाज गर्जणाऱ्या समुद्राप्रमाणे आहे.  
हे सीयोनकन्ये तुझ्यावर हल्ला करण्यासाठी  
युद्धासाठी सुसज्जित असलेल्यांप्रमाणे ते येत आहेत.”   
 24 आम्ही त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे,  
आणि आमचे बाहू निखळले आहेत.  
बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीच्या क्लेशाप्रमाणे  
वेदनांनी आम्हाला ग्रासले आहे.   
 25 शेतातून बाहेर जाऊ नका,  
किंवा रस्त्यांवरून प्रवास करू नका,  
कारण शत्रूकडे तलवार आहे,  
आणि प्रत्येक बाजूला आतंक पसरलेला आहे.   
 26 माझ्या लोकांनो, गोणपाट धारण करा,  
आणि राखेत लोळा;  
एकुलत्या एका पुत्रासाठी आक्रोश करतो  
तसा आक्रोश कर.  
कारण संहारक सेना एकाएकी  
तुझ्यावर हल्ला करेल.   
 27 “मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे.  
आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू,  
जेणेकरून तू त्यांना पारखावे,  
व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी.   
 28 ते सर्व कठोर बंडखोर आहेत,  
निंदा करीत फिरत आहेत.  
ते कास्य आणि लोखंडासारखे;  
त्या सर्वांची वर्तणूक दूषित आहे.   
 29 भट्टीचा भाता भयानकपणे वाजत आहे.  
शुद्ध करणारा अग्नी शिसे भस्म करीत आहे,  
परंतु हे शुद्धीकरण व्यर्थ होत आहे,  
दुष्ट मार्गानी चालणारे पूर्णपणे शुद्ध होत नाहीत.   
 30 ते अशुद्ध चांदीसारखे नाकारलेले आहेत,  
कारण याहवेहने त्यांचा त्याग केला आहे.”