19
1 याहवेह मला असे म्हणतात: “जा व एक मातीचे मडके विकत घे आणि जाताना लोकांमधील काही वडीलजन आणि काही याजक यांना आपल्याबरोबर घे. 2 आणि बेन-हिन्नोमच्या खोर्यातून जा, तुटलेल्या मडक्याच्या व्दारा जवळ जा. तिथे जाऊन मी सांगेन त्या वचनाची घोषणा कर, 3 आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील. 4 कारण त्यांनी मला सोडले आहे आणि हे स्थान त्यांनी परक्या दैवताचे केले आहे; हे लोक अन्य दैवतांपुढे धूप जाळतात, जे त्यांच्या पूर्वजांना किंवा यहूदीयाच्या राजांना कधीही माहीत नव्हते, आणि त्यांनी ही जागा निर्दोष रक्ताने भरून टाकली आहे. 5 त्यांनी बआल दैवतासाठी होमार्पण म्हणून वेद्या बांधल्या आहेत आणि त्यावर ते आपल्या मुलांचा होम करतात—असे करण्याची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती किंवा कधी उल्लेखही केला नव्हता, अथवा विचारही केला नव्हता. 6 याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील.
7 “ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन. 8 मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील. 9 मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’
10 “यिर्मयाह, आता हे लोक पाहत असताना तू आणलेले ते मडके फोडून टाक, 11 आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्या ठिकर्या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही. 12 या ठिकाणी मी हेच करणार व इथे राहणाऱ्या लोकांनाही करेन, ही याहवेहची घोषणा आहे. मी या नगराला तोफेतासारखे करेन. 13 यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”
14 नंतर यिर्मयाह तोफेत येथे हा संदेश देऊन परतला, जिथे याहवेहने यिर्मयाहला भविष्यवाणी करण्यासाठी पाठविले होते, तिथे तो मंदिरापुढे थांबला व सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, 15 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, काय म्हणतात: ‘ऐका! मी या नगरावर आणि सभोवतालच्या गावावर मी शपथपूर्वक म्हटल्याप्रमाणे सर्व अरिष्टे आणणार आहे, कारण ते हट्टी होते व माझी वचने ऐकत नव्हते.’ ”