22
दुष्ट राजां विरुद्ध न्याय 
  1 याहवेह असे म्हणतात: “यहूदीयांच्या राजाच्या राजवाड्यात जा आणि या संदेशाची तिथे घोषणा कर:   2 ‘दावीदाच्या राजासनावर बसलेल्या हे यहूदीयाच्या राजा, याहवेहचा हा संदेश तुझ्यासाठी आहे—तू, तुझे अधिकारी आणि लोक जे या व्दारातून आत येतात या सर्वांसाठी.   3 याहवेहचे असे म्हणणे आहे: तुमचा न्यायनिवाडा न्यायी व यथायोग्य असो. ज्यांना लुबाडण्यात आले आहे, त्यांना जुलमी लोकांपासून सोडवा. परकीय, अनाथ आणि विधवा यांना अन्याय किंवा हिंसा करू नका, आणि या स्थानावर निरपराध्यांचे रक्त सांडवू नका.   4 जर तुम्ही या आज्ञेचे काळजीपूर्वक पालन केले, नंतर दावीदाच्या राजासनावर बसलेले राजे या महालाच्या व्दारातून रथ आणि घोड्यांवर स्वार होऊन, त्यांचे अधिकारी आणि लोक यांच्यासह प्रवेश करतील.   5 परंतु जर तुम्ही या आज्ञेचे पालन नाही केले तर, याहवेह जाहीर करतात, मी माझी शपथ घेऊन इशारा देतो की, हा राजवाडा ओसाड होईल.’ ”   
 6 कारण या यहूदीयांच्या राजवाड्यासंबंधी, याहवेह असे म्हणाले:  
“जरी तू मला गिलआद प्रांतासारखा आहे,  
व लबानोनच्या शिखरासारखा आहेस,  
मी निश्चितच तुझा विध्वंस करून तुला ओसाड  
आणि निर्जन नगरीसारखे करेन.   
 7 मी तुझ्याविरुद्ध विध्वंसकांची टोळी पाठवेन,  
प्रत्येक मनुष्य आपल्या शस्त्रांनी सुसज्ज असेल,  
ते तुझ्या सर्व उत्तम गंधसरूच्या तुळया कापतील  
आणि त्या तोडून अग्नीत टाकतील.   
 8 “अनेक राष्ट्रातील लोक या शहराजवळून जातील आणि येथील विध्वंस पाहून ते एकमेकांना म्हणतील, ‘याहवेहने हे एवढे भव्य शहर का बरे नष्ट केले?’   9 आणि याचे उत्तर मिळेल: ‘कारण त्यांना याहवेह परमेश्वराच्या कराराचा त्याग केला होता आणि त्यांनी दुसऱ्या दैवतांची आराधना व सेवा केली.’ ”   
 10 मेलेल्यां राजासाठी रडू नका किंवा त्यांच्या हानीकरिता शोक करू नका;  
त्याऐवजी, जो बंदिवासात गेला आहे त्याच्यासाठी विलाप करा,  
कारण तो मायदेशी परत येणार नाही  
किंवा मातृभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.   
 11 यहूदीयाचा राजा योशीयाह याचा पुत्र शल्लूम*किंवा यहोआहाज याच्यानंतर गादीवर बसला, पण त्याला या ठिकाणाहून नेण्यात आले, त्याबद्दल याहवेह म्हणाले: “पुन्हा तो कधीच परत येणार नाही.   12 त्याला ज्या ठिकाणी त्यांनी बंदी करून नेले, तिथेच मरण पावेल; तो ही भूमी पुन्हा कधी पाहणार नाही.”   
 13 “धिक्कार असो, जो आपला महाल अधर्माने बांधतो,  
अन्यायाने माळे बांधतो,  
त्याच्या स्वतःच्या लोकांना बिनपगारी कामासाठी लावतो,  
आणि त्यांच्या परिश्रमाचा मोबदला त्यांना देत नाही.   
 14 तो म्हणतो, ‘मी माझ्यासाठी एक भव्य राजवाडा बांधेन,  
ज्यामध्ये वरच्या मजल्यावर मोठमोठ्या खोल्या असतील.’  
तो त्याला अनेक मोठ्या खिडक्या बांधतो,  
गंधसरूची तक्तपोशी करतो  
आणि सुंदर लाल रंगाने सजवितो.   
 15 “तू गंधसरूचा जास्तीत जास्त वापर केला तर  
ते तुला राजा बनविल काय?  
तुझा पिता खातपीत नव्हता काय?  
त्याने जे योग्य आणि न्याय्य केले,  
म्हणून त्याचे सर्व चांगलेच झाले.   
 16 त्याने गोरगरीब, गरजवंताचे साह्य केले,  
म्हणून त्याचे सर्व भले झाले.  
मला जाणून घेणे म्हणजे हेच नाही काय?”  
असे याहवेह म्हणतात.   
 17 “परंतु तुझे डोळे आणि तुझे अंतःकरण  
केवळ अनीतीने धन कसे मिळवावे,  
निर्दोष्यांचे रक्त कसे वाहवे,  
आणि जुलूम व अन्यायाने कसे बळकावे याचाच शोध घेत असतात.”   
 18 म्हणून यहूदीयाचा राजा योशीयाहचा पुत्र यहोयाकीम याबद्दल याहवेह असे म्हणतात:  
“त्याच्यासाठी ते शोक करणार नाही:  
‘हाय, माझ्या भाऊ आणि बहिणींनो!’  
त्याच्यासाठी ते शोक करणार नाही:  
‘अहो, माझ्या धन्या! अहो, त्याची थोरवी!’   
 19 त्याला मेलेल्या गाढवासारखी मूठमाती देण्यात येईल—  
त्याला सिंहासनावरून फरफटत आणून  
यरुशलेमच्या द्वाराबाहेर फेकतील!”   
 20 “लबानोनात जा व विलाप करा,  
बाशानात तुमचा आवाज ऐकू आला पाहिजे,  
अबारीमाहून आरोळी मारा,  
कारण तुमचे सर्व मित्र चिरडले गेले आहेत.   
 21 तुम्हाला सुरक्षित वाटत होते, तेव्हाच मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा दिला होता,  
परंतु तुम्ही उत्तर दिले, ‘मी ऐकणार नाही!’  
लहानपणापासून तुम्ही असेच आहात;  
तुम्ही आज्ञापालन केलेच नाही!   
 22 आता वार्याच्या झोतासरशी तुझे मेंढपाळ उडून जातील,  
तुमच्या सर्व मित्रांना बंदिवासात नेण्यात येईल.  
मग तुम्ही शरमिंदे व्हाल व तुमच्या सर्व दुष्टपणामुळे  
तुम्ही तुमची प्रतिष्ठा घालवाल.   
 23 तुम्ही जे लबानोनच्या गंधसरूच्या राजवाड्यात†म्हणजेच यरुशलेमातील राजवाडा  
रहिवास करीत होते,  
जेव्हा तुम्हाला वेदना सहन कराव्या लागतील तेव्हा तुम्ही तळमळाल;  
एखादी स्त्री प्रसूती वेदनांनी व्याकूळ होऊन तळमळते तसे तुमचे होईल!   
 24 “मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,” असे म्हणून याहवेह जाहीर करतात, यहूदीयाचा राजा यहोयाकीम याचा पुत्र कोन्याह‡किंवा यहोयाकीन, तू माझ्या उजव्या हातातील मुद्रिकेसारखा असलास, तरीही मी तुला ओढून काढेन,   25 आणि तुझा वध करू पाहणार्यांच्या हाती देईन, ज्यांची तुला भयंकर भीती वाटते—जसे खास्द्यांचा राजा नबुखद्नेस्सर आणि बाबेलची प्रजा.   26 तू व तुझी माता, यांना मी अशा देशाबाहेर भिरकावून टाकेन, जिथे तुमचा जन्म झाला नव्हता आणि त्या देशात तुम्हाला मरण येईल.   27 ज्या देशात परत येण्याची तू उत्कट इच्छा करशील, त्या देशात तू कधीच परतणार नाहीस.   
 28 हा मनुष्य, कोन्याह, फुटक्या भांड्यासारखा  
कोणालाही नको असलेली वस्तू नाही का?  
तो व त्याच्या मुलांना  
त्यांना माहीत नसलेल्या देशात बंदिवान करून भिरकावून का टाकले गेले.   
 29 अगे, हे भूमी, हे भूमी, हे भूमी  
तू याहवेहचे वचन ऐक!   
 30 याहवेह असे म्हणतात:  
“कान्याह हा मनुष्य जणू अपत्यहीन आहे अशी नोंद करा,  
कारण त्याच्या जीवनात तो कधीही समृद्ध होणार नाही,  
त्याच्या मुलांपैकी कोणीही समृद्ध होणार नाही,  
त्याचा कोणताही वारस दावीदाच्या राजासनावर बसणार नाही,  
किंवा यहूदीया प्रांतावर राज्य करणार नाही.”