24
अंजिराच्या दोन टोपल्या
बाबिलोनचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीम याचा पुत्र, यकोन्याह*किंवा यहोयाखीन, याच्याबरोबरच यहूदीयाचे अधिपती, निष्णात सुतार व लोहार असे कारागीर यांना यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवासात नेले. या घटनेनंतर याहवेहने यरुशलेम येथील मंदिरासमोर अंजीर भरून ठेवलेल्या दोन टोपल्या मला दाखविल्या. एका टोपलीमध्ये उत्तम, आधी पिकलेले अंजीर होते, परंतु दुसर्‍या टोपलीतले अंजीर मात्र खराब झालेले होते, इतके खराब की ते खाण्यास योग्य नव्हते.
तेव्हा याहवेहने मला विचारले, “यिर्मयाह, तुला काय दिसते?”
मी उत्तर दिले. “अंजीर, काही जे चांगले आहेत ते अत्युत्तम आणि काही खराब, ते इतके खराब की खाण्यास अयोग्य.”
तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले: “याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘हे उत्तम अंजीर यहूदीयातून बंदिवासात पाठवलेल्यांचे प्रतीक आहे, ज्यांना मी या ठिकाणातून खास्द्यांच्या देशामध्ये रवाना केले आहे. त्यांचे बरे होईल याकडे माझे लक्ष राहील, आणि मी त्यांना इकडे परत आणेन, मी त्यांना उभारेन आणि त्यांना उद्ध्वस्त करणार नाही; मी त्यांना रोपीन, उपटून टाकणार नाही. मी त्यांना असे अंतःकरण देईन जेणेकरून ते मला ओळखतील, की मीच याहवेह आहे. ते माझे लोक होतील व मी त्यांचा परमेश्वर होईन, कारण ते पूर्ण अंतःकरणाने माझ्याकडे परत येतील.
“ ‘परंतु नासके अंजीर जे इतके नासके आहेत की ते खाण्यायोग्य नाहीत, हे यहूदीयाचा राजा सिद्कीयाह, त्याचे अधिकारी व या देशात उरलेले यरुशलेमचे सर्व लोक यांचे प्रतीक आहेत; मग ते यरुशलेमचे अवशिष्ट लोक असोत वा इजिप्तमध्ये वस्ती करून राहिलेले असोत, याहवेह म्हणतात. मी त्यांना असे करेन की पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्राला त्यांची घृणा येईल, आणि मी जिथे मी घालवून देईन, तिथे निंदा, कुचेष्टा, शापकिंवा शाप देण्यासाठी त्यांचे नाव उच्चारले जाईल आणि ते उपहासाचा विषय होतील. 10 त्यांना व त्यांच्या पूर्वजांना मी दिलेल्या या भूमीतून त्यांचा पूर्णपणे नायनाट होईपर्यंत, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन.’ ”

*24:1 किंवा यहोयाखीन

24:9 किंवा शाप देण्यासाठी त्यांचे नाव उच्चारले जाईल