29
बंदिवानांना पत्र
नबुखद्नेस्सरने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी अवशेष वडीलजनांना, याजकांना, संदेष्ट्यांना व इतर सर्व लोकांना यिर्मयाहने लिहिलेल्या पत्राचा हा मजकूर आहे. (राजा यकोन्याह, राजमाता, न्यायालयातील अधिकारी, यहूदाहचे व यरुशलेमचे अधिकारी व कारागीर अशा सर्वांना यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेण्यात आले होते.) यिर्मयाहने शाफानचा पुत्र एलासाह व हिल्कियाहचा पुत्र गमर्‍याह यांच्याकडे सुपूर्द ते केले, जे यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरकडे पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा:
यरुशलेमहून बाबिलोन येथे बंदिवान करून आणलेल्या सर्वांना सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर यांचा हा संदेश आहे: “बाबेलमध्ये घरे बांधा व तिथे वस्ती करा; मळे लावा व तेथील उत्पादन खा. लग्न करा, पुत्र व कन्याचा जन्म होऊ द्या; आणि तुमच्या पुत्रांसाठीही वधू शोधा व तुमच्या कन्यांचा विवाह करून द्या, म्हणजे त्यांनाही पुत्र व कन्या होतील. तिथे बहुगुणित व्हा; पण ऱ्हास नव्हे. ज्या खास्द्यांच्या नगरात तुम्हाला बंदिवान म्हणून नेण्यात आले आहे तिथे शांतता आणि समृद्धी नांदावी म्हणून प्रयत्न करा. खास्द्यांसाठी याहवेहकडे प्रार्थना करा, कारण तिथे समृद्धी आल्यास तुम्हासही समृद्धी लाभेल.” होय, सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “तुम्हामध्ये असलेल्या संदेष्टे व दैवप्रश्न करणारे त्यांच्या फसवेगिरीला बळी पडू नका. त्यांनी स्वप्ने बघावी म्हणून तुम्ही त्यांना प्रोत्साहित केले असेल तर ती स्वप्ने ऐकू नका. कारण माझ्या नावाने ते खोटे संदेश देतात. मी काही त्यांना पाठविले नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
10 याहवेह असे म्हणतात: “बाबेलमध्ये सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानंतर मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला दिलेल्या उत्तम अभिवचनानुसार पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आणेन.” 11 याहवेह असे जाहीर करतात, “कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत. 12 मग तुम्ही माझ्याकडे याल व माझी प्रार्थना कराल, तेव्हा त्या मी ऐकेन. 13 तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.” 14 याहवेह जाहीर करतात, “मी तुम्हाला आढळेन व तुमच्या दास्यातून तुम्हाला परत आणेन*किंवा तुमचे भविष्य बदलेन, तुम्हाला ज्या सर्व राष्ट्रातून व ठिकाणाहून इतर देशात बंदिवासात पाठविले, तर तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.
15 तुम्ही म्हणाल, “याहवेहने बाबेलमध्ये आपल्यासाठी संदेष्टे उभे केले आहेत,” 16 परंतु याहवेह असे म्हणतात, जो दावीदाच्या सिंहासनावर बसलेला राजा आणि या नगरात उरलेल्या लोकांबद्दल आहे, जे तुमचे बांधव म्हणून बंदिवासात गेले नाहीत— 17 होय, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन, व त्यांना नासक्या आणि खाण्यास अयोग्य अशा अंजिरासारखे करेन. 18 मी त्यांचा तलवार, दुष्काळ व मरीने पाठलाग करेन, जगभरातील सर्व राष्ट्राचे लोक त्यांची घृणा करतील, व त्यांना मी जिथेही हाकलून लावले तेथील लोक शाप देतील, त्यांची नाचक्की करतील, त्यांची चेष्टा करतील. 19 कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाही, माझी वचने घेऊन माझे सेवक संदेष्टे मी त्यांच्याकडे पुनः पुन्हा पाठविले, परंतु तुम्ही बंदिवानांनीही माझे ऐकण्यास नकार दिला,” असे याहवेह जाहीर करतात.
20 म्हणून यरुशलेम येथून बाबिलोन येथे मी पाठविलेल्या सर्व यहूदी बंदिवानांनो, आता याहवेहचे वचन ऐका. 21 सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर कोलायाहचा पुत्र अहाब व मासेयाहचा पुत्र सिद्कीयाह या तुमच्या खोट्या संदेष्ट्याविषयी असे म्हणतात: “त्यांचा तुमच्यासमोर जाहीरपणे वध व्हावा म्हणून मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हवाली करणार आहे. 22 ज्या लोकांना यहूदीयामधून खास्द्यांमध्ये बंदिवान म्हणून नेले, ते शाप देताना म्हणतील: ‘ज्याप्रमाणे बाबेलच्या राजाने सिद्कीयाह व अहाब यांना जिवंत जाळले, त्यांच्याप्रमाणेच याहवेह तुझे करो.’ 23 कारण त्यांनी इस्राएलमध्ये एक अति घृणास्पद कृत्य केले आहे; त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या स्त्रियांशी व्यभिचार केला, आणि माझ्या नावाने खोटे संदेश दिले—जो अधिकार मी त्यांना दिला नव्हता. हे मला माहीत आहे, कारण त्यांचे प्रत्येक कृत्य मी पाहिले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.
शमायाहसाठी संदेश
24 नेहेलामी शमायाह याला सांग, 25 “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तू स्वतःच्या नावाने मासेयाहचा पुत्र सफन्याह याजक याला, इतर सर्व याजकांना व यरुशलेममधील प्रत्येकाला पत्रे लिहिली आहेस. तू सफन्याहला असे म्हटले, 26 ‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. 27 मग तू या अनाथोथच्या यिर्मयाहला का फटकारले नाहीस, जो स्वतःला संदेष्टा म्हणवितो? 28 कारण त्याने आम्हाला येथे बाबेलमध्ये हा संदेश पाठविला आहे: आमचा बंदिवास दीर्घकाळचा आहे. आम्ही येथे पक्की खरे बांधून वसती करावी; मळा लावावा व त्यातील उत्पादन खावे.’ ”
29 याजक सफन्याह हे पत्र घेऊन यिर्मयाह संदेष्ट्याकडे गेला व त्याने त्याला वाचून दाखविले. 30 तेव्हा याहवेहचे यिर्मयाहला हे वचन मिळाले: 31 “खास्द्यांमध्ये बंदिवासात असलेल्या सर्वांना हा संदेश पाठव: ‘नेहेलामी शमायाहविषयी याहवेह असे म्हणतात: कारण त्याला मी पाठविले नसतानाही त्याने तुम्हाला संदेश दिला, आणि त्याच्या खोट्या वचनावर विश्वास ठेवण्यास तुम्हाला विवश केले, 32 याहवेह असे म्हणतात: मी नेहेलामी शमायाहला व त्याच्या वंशजांना निश्चितच शिक्षा करेन. त्याच्या लोकांपैकी कोणीही हयात राहणार नाही, माझ्या लोकांचे जे अभीष्ट मी करणार आहे, ते तो बघू शकणार नाही, असे याहवेह जाहीर करतात, कारण माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्याचा त्याने संदेश दिला आहे.’ ”

*29:14 किंवा तुमचे भविष्य बदलेन