47
पलिष्टी लोकांविषयी संदेश
गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:
 
2-3 याहवेह हे असे म्हणतात:
“पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे;
तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल.
जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल
म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे.
लोक किंकाळ्या मारतील;
त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील.
कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज,
शत्रूंच्या रथाचा आवाज
आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे.
त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत;
त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.
कारण सर्व पलिष्टी लोकांचा नाश करण्यास
आणि सर्व अवषेशांना बाहेर काढण्याचा,
सोर व सीदोन येथील लोकांना मदत करण्याचा
समय आला आहे.
याहवेह पलिष्टी लोकांचा नाश करणार आहेत,
कफतोरहून*म्हणजेच क्रीट बेट आलेल्या रहिवाशांचा निःपात करणार आहेत.
गाझा विलापाचे चिन्ह म्हणून आपले मुंडण करेल;
अष्कलोन पूर्णपणे निःशब्द होईल.
अहो तुम्ही घाटातील अवशिष्ट लोकहो,
तुम्ही केव्हापर्यंत स्वतःच्या देहास जखमी कराल?
 
“ ‘हाय रे, याहवेहच्या तलवारी,
तू पुन्हा केव्हा विसावा घेणार?
जा! आपल्या म्यानात परत जा;
शांत राहा व स्तब्ध हो.’
परंतु जर याहवेहने तिला आज्ञा दिली आहे,
तर ती स्वस्थ कशी बसेल,
त्यांनीच तिला आदेश दिला आहे ना
अष्कलोन व समुद्राकाठी राहणार्‍यांवर हल्ला कर?”

*47:4 म्हणजेच क्रीट बेट