3
इय्योबाचा संवाद
यानंतर, इय्योबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. तो म्हणाला:
“माझा जन्मदिवस नष्ट होवो,
आणि ‘पुत्र गर्भधारण झाले!’ असे ज्या रात्रीने म्हटले,
तो दिवस अंधकार असा होवो;
वर राहणाऱ्या परमेश्वरासही त्याचे ध्यान न राहो;
त्या दिवसावर प्रकाश न पडो.
होय, खिन्नता व संपूर्ण काळोख त्यावर पुन्हा आपला हक्क गाजवो;
त्यावर ढग वास्तव्य करून राहो;
काळोख त्यावर मात करो.
त्या रात्रीला अंधकार जप्त करो;
वर्षाच्या दिवसात त्याची गणती न होवो
कोणत्याही महिन्यांमध्ये त्याची गणती न होवो.
ती रात्र उजाड होवो;
आणि आनंदाचा गजर त्यातून ऐकू न येवो.
जे दिवसाला शाप देतात,
जे लिव्याथानाला चेतविण्यास तयार असतात, ते त्याला शापित करोत.
त्या रात्रीचे तारे अंधकारमय होवोत;
दिवसाच्या प्रकाशाची ती व्यर्थ वाट पाहो
आणि पहाटेचा पहिला किरण तिच्या दृष्टीस न पडो,
10 कारण तिने माझ्यावर गर्भाशयद्वार बंद केले नाहीत
आणि दुःखाला माझ्या डोळ्याआड केले नाही.
 
11 “मी जन्माला आलो तेव्हाच का नाश पावलो नाही?
गर्भाशयातून निघताच माझे प्राण का गेले नाहीत?
12 माझे स्वागत करण्यास मांड्या का तयार होत्या
आणि मला दुग्धपान करावे म्हणून स्तन का तयार होते?
13 कारण मी तर आता शांतपणे पडून निजलेला असतो;
मी झोपेत विश्रांती पावलेला असतो.
14 पृथ्वीवरील राजे आणि अधिकारी,
ज्यांनी स्वतःसाठी वाडे बांधले ते आता ओसाड पडले आहेत,
15 ज्या राजपुत्रांच्या जवळ सोने होते,
ज्यांनी आपली घरे रुप्यांनी भरली.
16 अकाली पतन पावलेल्या गर्भासारखे,
दिवसाचा प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखे मला जमिनीत गाडून का ठेवले नाही?
17 कारण तिथे दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात,
आणि थकलेले लोक विसावा पावतात.
18 तिथे बंदिवान देखील स्वस्थ असतात,
कारण तिथे गुलामाच्या अधिकार्‍याचे ओरडणे ऐकू येत नाही.
19 लहान आणि मोठे तिथे असतात,
आणि गुलाम आपल्या धन्यापासून मुक्त झालेले असतात.
 
20 “जे कष्टात आहेत त्यांना प्रकाश,
आणि जे आत्म्यात कडू आहेत त्यांना जीवन का द्यावे,
21 ते मृत्यूची उत्कट इच्छा करतात पण ते येत नाही,
गुप्त धनापेक्षा अधिक ते मृत्यूला शोधतात,
22 जेव्हा ते कबरेत पोहोचतात, तेव्हा ते आनंदाने भरतात,
आणि उल्हास पावतात.
23 ज्याचा मार्ग गुपित आहे,
ज्याला परमेश्वराने सुरक्षित ठेवले आहे
अशा मनुष्याला जीवन का दिले आहे?
24 उसासे हे माझे रोजचे अन्न झाले आहे;
माझे कण्हणे पाण्याप्रमाणे ओतले जात आहे.
25 ज्याचे मला भय वाटत होते, तेच माझ्यावर चालून आले आहे;
जे भयानक तेच माझ्याकडे आले आहे.
26 मला शांती नाही, स्वस्थता नाही;
मला विश्रांती नाही, पण केवळ अस्वस्थता आहे.”