5
“आता हाक मारून पाहा, परंतु तुला कोण उत्तर देणार?
पवित्र लोकांपैकी कोणाकडे तू वळशील?
क्रोध मूर्खाचा घात करतो,
आणि सामान्य मनुष्याचा मत्सराने घात होतो.
मी मूर्खाला मूळ धरताना पाहिले,
परंतु अचानक त्याचे घर शापित झाले.
त्यांची मुलेबाळे सुरक्षित नाहीत,
वेशीत ते चिरडली जातात व त्यांना सोडविणारा कोणी नाही.
त्यांच्या कापणीचा हंगाम भुकेले खाऊन टाकतात
काट्याकुट्यातून सुद्धा ते काढून नेतात;
आणि कारस्थानी त्याच्या धनाचा लोभ धरतात.
कारण कष्ट मातीतून वाढत नाही,
आणि संकट सुद्धा जमिनीतून उगवत नाहीत.
खरोखर जशा अग्नीच्या ठिणग्या वर उडतात
तसा मनुष्यही कष्टासाठी जन्मला आहे.
 
“मी तुझ्या जागी असतो तर मी माझी बाजू परमेश्वरासमोर सादर केली असती;
त्यांच्यापुढे मी आपला वाद मांडला असता.
आकलन होऊ शकत नाहीत अशी महान चिन्हे,
व मोजता येत नाहीत अशी अगणित अद्भुत कृत्ये ते करतात.
10 ते पृथ्वीला पावसाचा पुरवठा करतात;
आणि शेतांवर पाणी पाडतात.
11 नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात,
जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.
12 धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये,
म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात,
13 ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,
आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात.
14 दिवस असतानाच अंधकार त्यांच्यावर येतो;
आणि रात्र असल्याप्रमाणे भर दुपारच्या प्रहरी ते चाचपडतात.
15 परंतु गरजवंताला त्यांच्या मुखातील तलवारीपासून;
व बलवानांच्या तावडीतून वाचवितात.
16 म्हणून दीन लोकांस आशा आहे,
आणि अन्याय आपले तोंड बंद करेल.
 
17 “परमेश्वर ज्याची सुधारणा करतात तो धन्य;
म्हणून सर्वसमर्थाचे*मूळ भाषेत शद्दाय शासन तू तुच्छ मानू नको.
18 कारण ते जखम करतात आणि पट्टीसुध्‍दा तेच बांधतात;
ते दुखापत करतात, परंतु त्यांचाच हात आरोग्य देतो.
19 सहा संकटातून ते तुला वाचवतील;
आणि सातव्यात तुम्हाला कोणतेही अनिष्ट स्पर्श करणार नाही.
20 दुष्काळामध्ये परमेश्वर तुला मरणापासून वाचवतील;
युद्धकाळात ते तुला तलवारीच्या प्रहारापासून वाचवतील.
21 जिभेच्या तडाख्यापासून तू सुरक्षित राहशील,
विनाश आल्यावर तुला भय बाळगण्याचे नाही.
22 विनाश व दुष्काळ यांना तू हसशील,
आणि हिंस्त्र पशूंचे भय तुला वाटणार नाही.
23 कारण शेतातील पाषाणांशी तुझा करार होईल,
आणि वनपशू तुझ्याशी शांतीने राहतील.
24 तुझा तंबू सुरक्षित आहे हे तू जाणशील;
तपास करशील तेव्हा तुझ्या मालमत्तेतील काहीही गहाळ झालेले तुला आढळणार नाही.
25 तुला बरीच संतती झाली आहे हे तुला समजेल,
आणि तुझे वंशज पृथ्वीवरील गवतासारखे होतील.
26 जशा हंगामाच्या वेळी धान्याच्या पेंढ्या गोळा करण्यात येतात,
तसेच तू कबरेत जाईपर्यंत तुझ्या शौर्याचा ऱ्हास होणार नाही.
 
27 “हे सर्व अगदी सत्य आहे आणि याची आम्ही परीक्षा केली आहे.
म्हणून माझा हा सल्ला ऐकून त्याचा अंगीकार करून घे.”

*5:17 मूळ भाषेत शद्दाय