14
 1 “स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन,  
अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे.   
 2 अशा फुलासारखे, जे फुलते आणि सुकून जाते;  
क्षणभंगुर सावलीप्रमाणे ते जास्त काळ टिकत नाही.   
 3 अशा मानवांवर तुम्ही आपली नजर लावता का?  
त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांना आपल्या उपस्थितीत आणणार का?   
 4 अशुद्धतेतून जे शुद्ध ते कोण उत्पन्न करेल?  
कोणीही नाही!   
 5 मानवाचे दिवस ठरलेले आहेत;  
त्याच्या महिन्यांची संख्या तुमच्या स्वाधीन आहे  
आणि त्याची नेमलेली मर्यादा त्याला ओलांडता येत नाही.   
 6 रोजगाराच्या मजुराप्रमाणे त्याची वेळ पूर्ण होईपर्यंत,  
आपली दृष्टी त्याच्यावरून काढून त्याला एकटे असू द्या.   
 7 “झाडाला देखील आशा असते:  
की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार,  
आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत.   
 8 मातीत त्याची मुळे जुनी झाली असली,  
आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला,   
 9 तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते  
आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात.   
 10 परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते;  
तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो.   
 11 जसे सरोवराचे पाणी आटते  
किंवा नदीचे पात्र आटून कोरडे होते,   
 12 तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही;  
आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत,  
ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत.   
 13 “तुम्ही केवळ मला कबरेमध्ये लपविले असते  
तुमचा क्रोध संपेपर्यंत मला गुप्त ठेवले असते!  
आपण माझ्यासाठी समय नेमून ठेवावा  
आणि मग माझी आठवण करावी!   
 14 जर कोणी मेला तर पुन्हा जिवंत होईल का?  
माझ्या सर्व कठीण श्रमाच्या दिवसात  
माझ्या सुटकेची मी वाट पाहीन.   
 15 मग तुम्ही मला आवाज द्याल आणि मी तुम्हाला उत्तर देईन;  
आपली हस्तकृती पुन्हा पाहावी असे तुम्हाला वाटेल.   
 16 तेव्हा खचित आपण माझ्या पापांची नाही,  
तर माझ्या पावलांची मोजणी कराल.   
 17 तुम्ही माझे अपराध एका थैलीत बंद करून;  
माझ्या पापांवर पांघरूण घालाल.   
 18 “परंतु जसे पर्वत झिजतात व त्यांचा चुरा होतो,  
आणि जसे खडक आपल्या ठिकाणातून ढळविले जातात,   
 19 जल पाषाण झिजवून टाकते  
व पूर माती वाहून नेतो,  
त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता.   
 20 तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो;  
तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता.   
 21 जरी त्याच्या संतानाचा सन्मान झाला, तरी त्याला ते माहीत नसते;  
किंवा त्यांना नीच करण्यात आले, तरी ते त्याला दिसत नाही.   
 22 त्यांना फक्त त्यांच्या शरीरातील दुःख जाणवते  
आणि स्वतःसाठीच ते शोक करतात.”