31
 1 “मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे  
की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही.   
 2 कारण वरून परमेश्वराचा आमच्यासाठी वाटा,  
किंवा सर्वसमर्थ्याकडून आमचा वारसा काय आहे?   
 3 दुष्ट लोकांचा विनाश,  
आणि पापी लोकांचे अरिष्ट हा नाही काय?   
 4 माझे मार्ग परमेश्वर पाहात नाही का  
आणि माझे प्रत्येक पाऊल ते मोजत नाहीत काय?   
 5 “जर मी खोटेपणात चाललो आहे  
किंवा कपटाकडे माझा पाय घाईने उचलले;   
 6 तर परमेश्वर सत्याच्या तराजूत मला तोलून पाहो  
आणि मी निरपराधी आहे हे त्यांना समजेल—   
 7 जर माझे पाऊल मार्गातून भटकले असतील,  
जर माझ्या हृदयाने माझ्या डोळ्यांचे अनुसरण केले असेल,  
अथवा माझे हात भ्रष्ट झाले असतील,   
 8 तर ज्याची पेरणी मी केली, त्याची कापणी दुसरा कोणी करो,  
आणि माझे पीक उपटून टाकले जावो.   
 9 “जर माझे हृदय परस्त्रीद्वारे भुरळीत झाले असेल,  
अथवा मी शेजार्याच्या दाराशी दडून बसलो आहे,   
 10 तर माझी पत्नी परपुरुषाच्या घरातील धान्य दळो,  
आणि इतर माणसे तिच्या अंथरुणात निजो.   
 11 कारण ते तर खूपच दुष्ट,  
आणि दंडास पात्र असे पाप आहे.   
 12 हा भस्म करणारा अग्नी आहे;  
जो माझा हंगाम उपटून टाकेल.   
 13 “जेव्हा माझे सेवक माझ्याविरुद्ध गार्हाणे घेऊन आले,  
मग ते स्त्री असो वा पुरुष,  
तेव्हा मी त्यांना न्याय देण्याचे नाकारले असेल,   
 14 तर मी परमेश्वराला सामोरे कसे जाणार?  
मला जाब विचारावयास बोलाविले असता, मी काय उत्तर देणार?   
 15 कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय?  
एकाच परमेश्वराने आम्हा दोघांना आमच्या मातांच्या उदरात निर्माण केले नाही काय?   
 16 “जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्या असतील  
अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल,   
 17 जर मी माझे अन्न स्वतःपाशीच ठेवले,  
आणि ते मी अनाथांना वाटून दिले नाही—   
 18 परंतु माझ्या तारुण्याच्या दिवसांपासून पित्याने करावे तसे मी त्यांचे पोषण केले,  
आणि माझ्या जन्मापासून मी विधवांचे मार्गदर्शन केले.   
 19 मी जर कोणाला वस्त्राविना,  
आणि गरजवंत लोक ज्यांना पुरेसे कपडे नाहीत अशांचा नाश होताना पाहिले,   
 20 त्यांना ऊब यावी म्हणून माझ्या मेंढरांच्या लोकरीचे पांघरूण दिले  
तरीही त्यांच्या हृदयाने मला आशीर्वाद दिला नाही,   
 21 न्यायालयात मी प्रभावी आहे हे जाणून,  
मी जर एखाद्या अनाथावर हात उगारला असेन,   
 22 तर खांद्यापासून माझा हात गळून पडो,  
सांध्यापासून ते तुटून जावोत.   
 23 कारण परमेश्वरापासून आलेल्या विपत्तीने मला भयभीत केले आहे,  
आणि त्यांच्या वैभवाच्या भयनिमित्ताने या सर्वगोष्टी मी केल्या नाहीत.   
 24 “जर मी सोन्यावर भरवसा ठेवला असेन  
किंवा शुद्ध सोन्याला म्हटले असते की, ‘तू माझा रक्षक आहेस,’   
 25 जर मी माझे मोठे धन,  
आणि आपल्या हाताने मिळवलेल्या संपत्तीमध्ये आनंद बाळगला असेल,   
 26 जर आकाशात तळपणार्या सूर्याकडे पाहून,  
अथवा वैभवशाली वाटेने जाणार्या चंद्राकडे पाहून,   
 27 माझे अंतःकरण गुप्तपणे मोहित झाले असेल,  
आणि आपल्या हाताच्या चुंबनांने मी त्यांची उपासना केली असेन,   
 28 तर या पापांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे,  
कारण याप्रकारे सर्वोच्च परमेश्वराशी माझे अविश्वासूपण असते.   
 29 “माझ्या शत्रूंची आपत्ती पाहून मी जर कधी आनंद मानला असेन,  
किंवा त्याच्यावर अरिष्ट आले म्हणून मी समाधानी झालो असेन;   
 30 त्यांच्या जीवनाच्या विरोधात शाप उच्चारून  
मी आपल्या मुखाला पाप करू दिले नाही;   
 31 जर माझ्या सेवकांपैकी कधी कोणी म्हटले नाही की,  
‘असे कोण आहे ज्याने इय्योबाच्या घरी मांस खाल्ले नाही?’   
 32 परंतु कोणी अनोळखी व्यक्तीने देखील रस्त्यावर रात्र काढली नाही,  
कारण प्रवाशांसाठी माझ्या घराचे दार नेहमीच उघडे असे;   
 33 अथवा इतर लोकांप्रमाणे*किंवा आदामाप्रमाणे मी माझे अपराध झाकून ठेवले असते,  
व आपला दोष हृदयात लपवला असता   
 34 मी कधी मोठ्या जनसमूहाचे भय धरले काय,  
कुळाच्या तिरस्काराने मी भयभीत झालो काय,  
शांतपणे मी घराबाहेर पडलो नाही काय—   
 35 (“अहा, माझे ऐकणारे कोणी असते!  
आता माझ्या समर्थनावर मी सही करतो—सर्वसमर्थ मला उत्तर देवो;  
मला दोष देणार्याने लेखी दोषारोप द्यावा.   
 36 तो मी खचित खांद्यावर घेऊन वाहिला असता,  
आणि मी तो मुकुटाप्रमाणे डोक्याला बांधला असता.   
 37 मी सर्वसमर्थाला माझ्या प्रत्येक पावलांचा हिशोब दिला असता;  
एखाद्या राज्यकर्त्या समोर, तसे मी ते त्यांच्यासमोर सादर करेन.)   
 38 “किंवा माझी जमीन जर माझ्याविरुद्ध रडत आहे,  
आणि तिच्या खाचा जर अश्रूंनी ओल्या झाल्या आहेत,   
 39 मोल चुकते न करताच जर मी त्याचा उपज खाल्ला असेल  
किंवा भाडेकरूंचे मन मोडले असेल,   
 40 तर मग गव्हाऐवजी वनझुडूप उगवोत  
आणि सातूऐवजी तिथे दुर्गंधी गवत येवो.”  
येथे इय्योबाचे भाषण संपले.