37
 1 “हे ऐकून माझे हृदय धडधडते  
ते आपल्याच ठिकाणी झेप घेते.   
 2 ऐका! परमेश्वराच्या डरकाळीचा आवाज ऐका,  
ती गर्जना जी त्यांच्या मुखातून येते.   
 3 संपूर्ण आकाशाच्या खालून ते लखलखीत वीज मोकळी सोडतात  
आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवितात.   
 4 त्यानंतर त्यांच्या डरकाळीचा आवाज येतो;  
त्यांच्या राजेशाही आवाजात ते गडगडतात.  
जेव्हा त्यांचा आवाज सगळीकडे घुमतो,  
तेव्हा ते काहीही मागे धरून ठेवीत नाहीत.   
 5 परमेश्वराची वाणी आश्चर्यकारकरित्या गर्जना करते;  
आमच्या बुद्धीपलीकडील महान कार्य ते करतात.   
 6 हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’  
आणि पावसाच्या सरींना, ‘मुसळधार वृष्टी होवो’ असे सांगतात.   
 7 त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येकाने परमेश्वराचे कार्य ओळखावे,  
म्हणून ते सर्व लोकांचे कामकाज बंद करतात.   
 8 वनपशू लपून राहतात;  
अथवा त्यांच्या गुहांमध्येच राहतात.   
 9 त्यांच्या भवनामधून तुफान येते,  
आणि वादळी वार्यातून थंडी येते.   
 10 परमेश्वराचा श्वास बर्फ तयार करते,  
आणि मोठ्या पाण्याचा प्रवाह गोठून जातो.   
 11 ते मेघांना दहिवराने भरून टाकतात;  
आणि त्यातूनच त्यांची लखलखीत वीज पसरवितात.   
 12 परमेश्वर जे काही त्यांना मार्गदर्शन करून सांगतात  
ते संपूर्ण पृथ्वीवर करण्यासाठी  
त्यांच्या दिशेने ते चोहीकडे फिरतात.   
 13 लोकांना शासन करावे म्हणून,  
किंवा पृथ्वीला पाणी देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करावे म्हणून ते मेघ आणतात.   
 14 “हे इय्योबा, लक्षपूर्वक ऐक;  
थांब आणि परमेश्वराची आश्चर्यकर्मे समजून घे.   
 15 परमेश्वर मेघांवर कसे नियंत्रण करतात  
आणि त्यांची वीज कशी चमकवितात हे तुला माहीत आहे का?   
 16 मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का  
त्यांच्या त्या अद्भुत कृत्यांचे परिपूर्ण ज्ञान कोणाला आहे?   
 17 जेव्हा तुझ्या वस्त्रांमध्ये तुला घाम फुटतो  
आणि दक्षिणेच्या वार्यामुळे भूमी स्तब्ध होते,   
 18 आकाश जे साच्यात असलेल्या कास्य आरशाप्रमाणे आहे,  
ते परमेश्वराबरोबर तू पसरवशील काय?   
 19 “आपण त्यांच्याशी काय बोलावे ते आम्हाला सांग;  
आपल्या अंधकारामुळे आपला वाद आपण त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही.   
 20 मला बोलायचे आहे असे त्यांना सांगावे काय?  
आपणास गिळून टाकावे म्हणून कोणी विचारतील काय?   
 21 आता सूर्याकडे कोणीही बघू शकत नाही,  
तो आकाशांमध्ये किती प्रखर आहे  
वार्याने त्या मेघांना साफ पुसून टाकले आहे.   
 22 उत्तरेकडून ते सोनेरी वैभवाने येत आहे;  
होय, परमेश्वर अप्रतिम ऐश्वर्याने येत आहेत.   
 23 सर्वसमर्थ आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत आणि ते सामर्थ्याने उन्नत आहेत;  
त्यांच्या न्यायात आणि महान नीतिमत्वात ते जुलूम करीत नाही.   
 24 म्हणून लोक त्यांची श्रद्धा बाळगतात,  
कारण जे सर्व हृदयाने ज्ञानी आहेत त्यांच्याप्रती परमेश्वराला आदर नाही काय?”