13
जिंकावयाचे राहिलेले आणखी प्रदेश
1 जेव्हा यहोशुआ उतार वयाचा झाला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “तू आता खूप वयस्कर झाला आहेस आणि देशाचा बराच भाग ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे.”
2 जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे:
पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश; 3 पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते;
अव्वी लोकांचा प्रदेश: 4 दक्षिणेकडे कनानी लोकांचा सर्व प्रदेश;
सीदोनी लोकांचा माराह, अफेक आणि अमोर्यांची सीमा इथपर्यंत आहे;
5 गिबली लोकांचा प्रदेश;
बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन.
6 “लबानोनपासून मिसरेफोत-मयिम डोंगराळ प्रदेशात राहणारे सर्व रहिवासी, म्हणजे सर्व सीदोन्यांना मी स्वतः इस्राएली लोकांपुढून घालवून देईन. मी तुला सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना हा देश त्यांचे वतन म्हणून विभागून देण्यात येईल याची खात्री कर. 7 इस्राएलचे नऊ गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला तो वतन म्हणून तू विभागणी करून दे.”
यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेशाची विभागणी
8 मनश्शेहचे बाकीचे अर्धे गोत्र, रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना यार्देनेच्या पूर्वेकडे आपले वतन मिळाले होते, याहवेहचा सेवक मोशेने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे तो प्रदेश त्यांना वाटून दिला होता.
9 आर्णोन नदीच्या खोर्याच्या सीमेवर असलेले अरोएर व खोर्यांमधील शहरापासून दिबोनपर्यंतचा मेदबाचा सर्व पठाराचा प्रदेश, 10 अम्मोन्यांच्या सीमेपर्यंतची हेशबोनात राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन याची सर्व नगरे.
11 आणि गिलआद देश, गशूरी व माकाथी या लोकांचा सर्व प्रदेश; सर्व हर्मोन पर्वत; सलेकाहपर्यंत सर्व बाशान; 12 म्हणजे अष्टारोथ व एद्रेईवर ज्याने राज्य केले त्या ओग राजाचे बाशानातील संपूर्ण राज्य. (रेफाईम लोकांपैकी तो शेवटचा होता.) मोशेने त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना वतनातून बाहेर घालवून दिले. 13 परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत.
14 परंतु लेवीच्या गोत्रास त्याने कोणतेही वतन दिले नाही, कारण याहवेहने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, इस्राएलचे परमेश्वर याहवेहना वाहिलेली अन्नार्पणे हे त्यांचे वतनभाग आहेत.
15 रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही:
16 आर्णोन खोर्यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार, 17 हेशबोन व दिबोन, बामोथ-बआल, बेथ-बआल-मेओनसह पठारावरील त्याची सर्व इतर नगरे, 18 याहसाह, केदेमोथ, मेफाथ, 19 किर्याथाईम, सिबमाह, खोर्यातील टेकडीवरील जेरेथ-नगर. 20 बेथ-पौर, पिसगाची उतरण व बेथ-यशिमोथ. 21 पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला. 22 या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते.
23 यार्देनच्या किनार्यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.
24 मोशेने गाद गोत्रास त्यांच्या कुळानुसार हे वतन दिले:
25 गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती. 26 आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत; 27 व खोर्यातील बेथ-हाराम, बेथ-निमराह, सुक्कोथ, साफोन म्हणजे हेशबोनचा राजा सीहोनच्या राज्याचे हे उरलेले राज्य होते (यार्देन नदीच्या पूर्वबाजूपासून किन्नेरेथ समुद्रापर्यंत त्यांची सीमा होती).
28 ही नगरे व गावे गादच्या गोत्राला त्यांच्या कुळानुसार वतन म्हणून दिली होती.
29 मोशेने मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला, म्हणजेच मनश्शेहच्या कुटुंबाच्या अर्ध्या वंशजांना त्यांच्या कुळानुसार हे प्रदेश दिले:
30 त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे, 31 अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे).
मनश्शेहचा पुत्र माखीरच्या वंशजांना; माखीरच्या पुत्रांपैकी अर्ध्यांना त्यांच्या कुळाप्रमाणे हे देण्यात आले.
32 यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली. 33 परंतु लेवी गोत्राला मोशेने कोणतेही वतन दिले नाही, कारण त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, याहवेह इस्राएलचे परमेश्वरच त्यांचे वतन आहेत.