21
लेव्यांची नगरे 
  1 आता लेवीचे कुटुंबप्रमुख कनानातील शिलोहमध्ये असताना एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या इतर गोत्राच्या कुटुंब प्रमुखांकडे आले   2 आणि कनानातील शिलोह येथे त्यांना म्हणाले, “याहवेहने मोशेद्वारे आज्ञा दिली होती की तुम्ही आम्हाला राहण्यासाठी नगरे व आमच्या गुरांसाठी कुरणे द्यावीत.”   
 3 तेव्हा याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे, इस्राएली लोकांनी स्वतःच्या वतनभागातून लेवी लोकांना नगरे आणि कुरणे दिली, ती ही:   
 4 पहिली चिठ्ठी कोहाथी लोकांच्या कुळांप्रमाणे निघाली. लेवी जे अहरोन याजकाचे वंशज होते त्यांना यहूदाह, शिमओन आणि बिन्यामीन गोत्रांच्या वतनातून तेरा नगरे दिली गेली.   
 5 बाकीच्या कोहाथी वंशजांना एफ्राईम, दान व मनश्शेहचा अर्धा वंश या गोत्रांच्या प्रदेशातील दहा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.   
 6 गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार, आशेर, नफताली व बाशानातील मनश्शेहच्या अर्धा वंशाच्या गोत्रातील कुळांच्या वतनातून तेरा नगरे देण्यात आली.   
 7 मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांनुसार रऊबेन, गाद आणि जबुलून गोत्रातून बारा नगरे मिळाली.   
 8 याहवेहने मोशेद्वारे जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी चिठ्ठ्या टाकून लेवी लोकांना नगरे व त्यांची कुरणे नेमून दिली.   
 9 त्यांनी यहूदाह आणि शिमओनच्या गोत्रांना त्यांच्या नावानुसार नगरे दिली.   10 अहरोनाचे वंशज जे लेवीच्या गोत्रातील कोहाथी कुळाचे होते, त्यांची चिठ्ठी पहिली निघाली होती. त्यांना जी नगरे मिळाली ती ही:   
 11 त्यांना यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) व त्याची सभोवतालची कुरणे दिली. (अर्बा हा अनाकाचा पूर्वज होता.)   12 परंतु त्या शहराच्या सभोवतालची शेती आणि गावे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला त्याचे वतन म्हणून देण्यात आले होते.   13 म्हणून अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांनी हेब्रोन (हत्या केलेल्या व्यक्तीसाठी एक आश्रयाचे शहर), लिब्नाह,   14 यत्तीर, एशतमोआ,   15 होलोन, दबीर,   16 एईन, युत्ताह आणि बेथ-शेमेश व त्यांची कुरणे, ही एकूण नऊ नगरे या दोन गोत्रांकडून दिली.   
 17 बिन्यामीनच्या गोत्राकडून त्यांना:  
गिबोन, गेबा,   18 अनाथोथ आणि अलमोन अशी त्यांच्या कुरणांसह चार नगरे दिली.   
 19 अहरोन याजकाच्या वंशजांना त्यांच्या कुरणासहित मिळालेल्या नगरांची एकूण संख्या तेरा झाली.   
 20 कोहाथाच्या कुळांतील राहिलेल्या लेव्यांना एफ्राईम गोत्राच्या वतनातून नगरे देण्यात आली:   
 21 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्यांना दिलेली नगरे ही:  
शेखेम (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) आणि गेजेर,   22 किबसाईम आणि बेथ-होरोन ही त्यांच्या कुरणांसह एकूण चार नगरे.   
 23 दानच्या गोत्राकडून त्यांना मिळालेली नगरे ही:  
एल्तेकेह, गिब्बथोन,   24 अय्यालोन व गथ-रिम्मोन; त्यांच्या कुरणासह ही चार नगरे होती.   
 25 मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून:  
तानख व गथ-रिम्मोन त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे.   
 26 ही सर्व एकूण दहा नगरे व त्यांची कुरणे राहिलेल्या कोहाथी कुळाला मिळाली.   
 27 लेवी कुळातील गेर्षोनाच्या गोत्राला:  
मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राकडून:  
बाशानातील गोलान (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर) व बीशतेराह त्यांच्या कुरणासह ही दोन नगरे देण्यात आली.   
 28 इस्साखारच्या गोत्राकडून:  
किशोन, दाबरथ,   29 यर्मूथ व एन-गन्नीम व त्यांच्या कुरणासह चार नगरे देण्यात आली.   
 30 आशेरच्या गोत्राकडून:  
मिशाल, अब्दोन,   31 हेलकथ व रहोब ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली;   
 32 नफतालीच्या गोत्राकडून:  
गालीलातील केदेश (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), हम्मोथ-दोर व करतान ही तीन नगरे त्यांच्या कुरणासह देण्यात आली.   
 33 गेर्षोन कुळाच्या वाट्याला तेरा नगरे व त्यांची कुरणे आली.   
 34 मरारी कुळास (बाकीच्या लेवी गोत्राला):  
जबुलूनच्या गोत्राकडून:  
योकनाम, करताह,   35 दिमनाह व नहलाल ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.   
 36 रऊबेनच्या गोत्राकडून:  
बेसेर, याहसाह,   37 केदेमोथ व मेफाथ ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली.   
 38 गादच्या गोत्राकडून:  
गिलआद मधील रामोथ (हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीसाठी आश्रय शहर), महनाईम,   39 हेशबोन व याजेर ही चार नगरे त्यांच्या कुरणांसह देण्यात आली.   
 40 लेवीच्या उर्वरित कुळांना, म्हणजे मरारी कुळास एकूण बारा नगरे चिठ्ठ्या टाकून देण्यात आली.   
 41 इस्राएली लोकांच्या हद्दीत लेवी लोकांची सर्व मिळून अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची कुरणे होती.   42 यातील प्रत्येक नगराच्या सभोवती कुरणे होती. असेच सर्व नगरांचे होते.   
 43 याप्रमाणे याहवेहने इस्राएलाच्या पूर्वजांना जो देश देण्याची शपथ घेतली होती, तो सर्व त्यांना दिला आणि त्यांनी त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती केली.   44 याहवेहने त्यांच्या पूर्वजांना शपथ दिल्याप्रमाणे त्यांना सर्वस्वी विसावा दिला. त्यांचा एकही शत्रू त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही; याहवेहने इस्राएली लोकांच्या प्रत्येक शत्रूला त्यांच्या हाती दिले.   45 याहवेहने इस्राएली लोकांना दिलेली जी चांगली अभिवचने होती त्यातील एकही निष्फळ झाले नाही; त्यातील प्रत्येक अभिवचन पूर्ण झाले.