12
प्रसूतीनंतर शुध्दीकरणाविषयी नियम
याहवेह मोशेला म्हणाले, “इस्राएली लोकांना सांग: एखादी स्त्री गरोदर राहिली आणि तिला पुत्र झाल्यास, ती आई विधीनियमाप्रमाणे सात दिवस अशुद्ध राहील. मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते, तशीच ती अशुद्ध समजावी. आठव्या दिवशी तिच्या पुत्राची सुंता करावी. नंतर पुढील तेहतीस दिवस संपेपर्यंत ती बाळंतपणात होणार्‍या आपल्या रक्तस्त्रावाच्या अशुद्धतेपासून शुद्ध होत असताना, तिने कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये अथवा पवित्रस्थानात जाऊ नये. जर ती कन्येला जन्म देईल, तर ती स्त्री जशी तिच्या मासिक पाळीच्या वेळेस अशुद्ध राहते तशी ती चौदा दिवस अशुद्ध राहील. नंतर रक्तस्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तिने सहासष्ट दिवस वाट पाहावी.”
हे शुद्ध होण्याचे दिवस संपल्यानंतर तिला पुत्र झालेला असो की कन्या, तिला पुढील नियम लागू आहेत: तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरू आणावे व पापार्पणासाठी होला किंवा पारव्याचे पिलू सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे घेऊन जावे. याजक याहवेहला ते अर्पण करून तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे बाळंतपणात होणार्‍या रक्तस्त्रावापासून ती विधिपूर्वक शुद्ध होईल.
पुत्र किंवा कन्या झालेल्या स्त्री विषयी हा विधिनियम आहे. जर कोकरू आणण्याइतकी तिची ऐपत नसेल, तर तिने एक होमार्पणासाठी व दुसरे पापार्पणासाठी दोन कबुतरे किंवा पारव्याची दोन पिल्ले आणावी. त्याचे अर्पण करून याजक तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल, म्हणजे ती पुन्हा विधिपूर्वक शुद्ध होईल.